संगमनेरच्या मुख्याधिकार्‍यांकडून पालकमंत्र्यांचाही मानभंग! आठमाजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; हक्कभंगाची कारवाई अन्यथा आंदोलनाचा इशारा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासनाने वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकांकडे दुर्लक्ष करुन सत्ताधारीगटाच्या दबावातून परस्पर उरकलेला ‘नाट्यगृहा’चा उद्घाटन सोहळा संगमनेरच्या मुख्याधिकार्‍यांसाठी गळ्यात अडकलेल्या हाडासारखा बनला आहे. या प्रकरणावरुन स्थानिक लोकप्रतिनिधी आगामी हिवाळी अधिवेशनात हक्कभंग मांडणार असल्याची चर्चा असतानाच आता पालिकेतील आठ माजी नगरसेवकांनीही या वादात उडी घेत शासनाच्या विविध परिपत्रकांचा हवाला देवून संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संसद सदस्यांना जाणीवपूर्वक राजकीय हेतूने या सोहळ्यापासून दूर ठेवल्याचा गंभीर आरोप करुन हा प्रकार शासनाच्या आदेशाचे भंग करण्यासह पालकमंत्री व लोकप्रतिनिधींचा अवमान करणारा असल्याचे निदर्शनास आणून हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली आहे. हजारों लोकांनी मतदान करुन निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा अशाप्रकारे राजकीय अवमान संगमनेरची स्वाभीमानी जनता स्वीकारणार नाही, त्यामुळे सरकारकडून अपेक्षित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही या आठजणांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात संगमनेरचे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.


राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या विकासनिधीतून संगमनेर नगरपालिकेने साकारलेल्या कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा सोमवारी (ता.23) मोठ्या थाटात लोकार्पण सोहळा पार पडला. जयहिंद युवा मंचने सोमवार व मंगळवार अशा दोन दिवसांसाठी नाट्यगृह आरक्षीत करावे या संदर्भात सेक्रेटरी नामदेव गुंजाळ यांच्या सहीनिशी 17 नोव्हेंबररोजी पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यावर त्याच दिवशी आरोग्य विभागाने कारवाई करीत मुख्याधिकार्‍यांना दोन दिवसांसाठी 20 हजार भाड्यासह पाच हजार रुपये अनामत रक्कम, तीन हजार 600 रुपये जीएसटी आणि सोळाशे रुपये सफाई असे एकूण 30 हजार 200 रुपये जमा करुन नाट्यगृह भाडेतत्वावर देण्यास हरकत नसल्याची टीपणी सोपवली. मुख्याधिकार्‍यांच्या मंजूरीनंतर संबंधित संस्थेने त्याचा भरणाही केला होता.


जयहिंद ही सामाजिक संस्था आहे, त्यांच्याकडून आरक्षीत झालेल्या या दोन दिवसांत दोन नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तिकिटांची विक्रीही केली गेली आणि पालिकेच्या कर्मचार्‍यांचाही वापर केला गेला. नाट्यप्रयोगासह कवी अनंत फंदी नाट्यगृहाची वैशिष्ट्य आणि सोबतच त्याचा उद्घाटन सोहळा यांची जाहिरातबाजीही जोरदारपणे पार पडली. ज्येष्ट रंगकर्मी प्रशांत दामले यांच्या शुभहस्ते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे, माजी नगराध्यक्षा दूर्गा तांबे अशा एकाच पक्ष व विचाराच्या मंडळींनी एकत्र येवून नाट्यगृहाच्या दर्शनीभागात लावलेल्या कोनशिलेवरील पडदा हटवून या वास्तूचे लोकार्पण जाहीर केले. मात्र हा पडदा सरकताच महानगरांच्या धर्तीवर साकारलेल्या या सर्वांगसुंदर नाट्यगृहात राजकीय वादाचे रंगही उधळायला सुरुवात केली.


अगदी प्रवेशद्वारावरील सुरक्षेपासून ते नाट्यगृहात प्रवेशलेल्या नाट्यप्रेमींच्या स्वागतापर्यंत सर्वत्र पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची लगबग व खुद्द मुख्याधिकारी दयानंद गोरेंसह संपूर्ण यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसत होते. त्यामुळे नाट्यगृहातील कार्यक्रमाचे आयोजन जरीही जयहिंद या सामाजिक संस्थेने केले असले तरीही उद्घाटनाचा कार्यक्रम मात्र पालिकेने अधिकृतपणे उरकवल्याचेच दर्शवत होता. त्यात आगडोंब उसळला तो कोनशिलेवरील नामोल्लेखातून, निमंत्रण पत्रिका, बॅनरबाजी, जाहिराती यात कोठेही अक्षराचा उल्लेख न झालेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे व लोकनियुक्त आमदार अमोल खताळ यांच्या नावाचा कोनशिलेवरही उल्लेख आढळला नाही. येथूनच राजकीय ठिणगी पेटली आणि मुख्याधिकार्‍यांना त्याच दिवशी सायंकाळी घाईघाईने उपरती झाली आणि त्यांनी या कार्यक्रमाशी पालिकेचा संबंध नसल्याचा कांगावा करीत डोळे झाकण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पर्यंत बर्‍याच गोष्टी चव्हाट्यावर आल्या होत्या.


त्यातून स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये आपल्या अवमानासह विशेषाधिकाराचे उल्लंघन आणि शासकीय आदेशाचा भंग केल्याची भावना असताना त्यात आता संगमनेर नगरपालिकेच्या आठ माजी नगरसेवकांनीही उडी घेतल्याने आगामी हिवाळी अधिवेशनात संगमनेर नगरपालिकेच्या कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा गाजण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक अविनाश थोरात, शरीफ शेख, बादशाह कुरेशी, सिद्राम दिड्डी, प्राजक्ता बागूल, प्रकाश राठी, कैलास वाकचौरे व अप्पा पवार यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला असून त्यात वरीलप्रमाणे घटनाक्रमासह पालकमंत्री, खासदार व आमदारांचा अवमान झाल्याची भावना निर्माण झाल्याने संगमनेरात नाराजीचे वातावरण असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.


या कार्यक्रमापासून लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचा आरोप करीत पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांवर हक्कभंगाच्या कारवाईसह खासगी संस्थेने आयोजित केलेल्या नाट्यप्रयोगाची तिकिटे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी का विकत होते? याचीही सखोल चौकशी व नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास संगमनेरकर रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत सर्वांना पाठवण्यात आल्या आहेत. सात डिसेंबरपासून सुरु होणार्‍या हिवाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांच्याकडून हक्कभंग प्रस्ताव दाखल होणार असल्याची चर्चा असताना आता आठ माजी नगरसेवकांनीही मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार केल्याने या राजकीय विषयातील रंगत वाढली आहे.


कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कार्यक्रमात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, संसद सदस्य, निधानसभा व विधान परिषदेचे सदस्य यांचा योग्य सन्मान राखला जावा. राजशिष्टाचारानुसार कार्यक्रमाच्या पत्रिका, फलक आदींवर त्यांच्या पदाप्रमाणे त्यांच्या नावाचा उल्लेख करावा. कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांच्या बसण्याची व्यवस्थाही शिष्टाचाराप्रमाणे करावी, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा अभिप्राय मागवण्याचा सल्लाही राज्य सरकारकडून वेळोवेळी देण्यात येतो. त्यासाठी शासनाकडून अधिकृत परिपत्रकेही काढली जातात. मात्र त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करुन राजकीय ‘शह’ देण्याच्या नादात संगमनेर नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांनी खेळलेली खेळी मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर उलटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 6 Today: 6 Total: 2404403

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *