लग्नाचे अमिष दाखवून सेनेच्या माजी जिल्हाध्यक्षाचा 15 वर्ष अत्याचार! आठवेळा गर्भपात करणारे डॉक्टरही आरोपी; श्रीरामपूरातील घटनेने राज्यातील राजकारणात खळबळ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्थानिक कलाकेंद्रात नर्तिकेचे काम करणार्‍या तरुणीशी जवळीक साधून तिला लग्नाचे आश्‍वासन देत राज्यातील विविध ठिकाणी तब्बल 15 वर्ष शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूरातून समोर आला आहे. या दरम्यान आरोपीने राहुरीतील दोघा डॉक्टरांच्या मदतीने आठवेळा गर्भपात घडवून आणल्याने आजच्या स्थितीत आपण शारीरिक अत्यवस्थ असल्याच्या 40 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्याच पदाच्या लालसेने शिंदेगटात प्रवेश केलेल्या रावसाहेब खेवरे याच्यासह बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी राहुरीतील दोघा डॉक्टरांवर भारतीय दंडसंहितेच्या गंभीर कलमान्वये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला, त्याच दिवशी शिर्डीत पक्षाच्या निरीक्षकांकडून भावी पदाधिकार्‍यांच्या मुलाखती सुरु होत्या. त्यातून शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता होती, मात्र आता ती कायमस्वरुपी हिरावली गेली आहे. या घटनेने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून जिल्ह्यातील राजकारणही तापले आहे.


याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सध्या श्रीरामपूरातच 20 वर्षीय मुलगा व आईसह वास्तव्यास असलेल्या 40 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार राहुरीतील जवळपास 16 प्रतिष्ठीत नागरिक पांढरीपूल येथील तत्कालीन कलाकेंद्रावर नियमितपणे हजेरी लावत असल्याचे सांगत दोघा डॉक्टरांसह त्या सर्वांची नावे आणि पदंही तक्रारीत नोंदवण्यात आली आहेत. नेहमी येणारे ग्राहक म्हणून या सर्वांशी परिचय असल्याने संबंधित व्यक्तिंचे तक्रारदार महिलेच्या श्रीरामपूरातील राहत्या घरीही येणं-जाणं होतं. त्यातूनच त्या सर्वानी रावसाहेब खेवरे याच्याशी लग्न लावून देण्याचे अमिष दाखवून पीडितेला आरोपी रावसाहेब खेवरे सोबत राहण्यास तयार केले.


तेव्हापासूनच रावसाहेब खवरे याने सुरुवातीला तीन महिने तिला तळेगाव दाभाडे येथील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये, त्यानंतर मुंबईतील मालाड परिसरातील सदनिकेत दोन वर्ष, तेथून पीडितेच्या आई व मुलासह दीड वर्ष छत्रपती संभाजीनगर, तेथून सहा महिने अहिल्यानगर शहरातील सावेडी भागात आरोपीच्या मित्राच्या सदनिकेत, पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे भाड्याच्या सदनिकेत वर्षभर ठेवले व दर चार-पाच दिवसांनी येवून पीडितेकडून वारंवार लग्नाची मागणी होत असतानाही राजकारणाचे, पदाचे कारण देत त्याकडे दुर्लक्ष करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याच दरम्यान तिला दिवस गेल्याने पीडितेने पुन्हा लग्नाचा तगादा सुरु केला, मात्र आरोपी खेवरेने राजकीय पद धोक्यात येईल असे कारण देत राहुरीच्या डॉ.संजय म्हसे व डॉ.अनंत शेकुकर यांच्या मदतीने पीडितेचा विरोध डावलून बळजबरीने तिचा गर्भपात घडवून आणला.


या घटनेने भेदरलेल्या पीडितेला त्यानंतर चाकणमध्ये सदनिका घेतल्याचे सांगून वर्षभर ठेवले. या कालावधीत आरापी खेवरे व त्याचे मित्र कधिही सदनिकेवर येवून दारुपार्ट्या आणि धिंगाणाही घालीत त्यावरुन दोघांमध्ये वाद होत असल्याने खेवरेने पुन्हा पीडितेला मुंबईतील मीरारोड भागातील एका सदनिकेत ठेवले. त्यावेळी आरोपीने पुन्हा वाद घालणार नाही, दारुपार्ट्या करणार नाही, वागणुकीत बदल करेल असे सांगत पीडितेला पुन्हा चाकणमधील एका गावात आणून अडिच वर्ष ठेवले. या कालावधीत त्याचे व त्याच्या मित्रांचे घरी येवून दारुपार्ट्या करण्याचे प्रकार सुरुच राहील्याने पीडितेला परिस्थितीत बदल होणार नसल्याची खात्री पटली. दरम्यानच्या एकूण कालावधीत पीडिता सात ते आठवेळा गर्भवती राहीली, मात्र प्रत्येकवेळी आरोपी खेवरेने राहुरीतील ‘त्या’ दोघा डॉक्टरांच्या मदतीने तिचा गर्भपात घडवून आणला.


वारंवारच्या या प्रकाराने पीडितेच्या शरीरातील रक्ताची मात्रा कमी होत जावून तिची प्रकृती खालावली. गर्भपिशवीत गाठ तयार झाल्याने वारंवार रक्त पिशव्या देण्याची वेळ आली, अन्यथा गर्भपिशवी काढण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र आरोपीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पीडितेच्या 20 वर्षीय मुलासह आईने तिला चाकणहून श्रीरामपूरात आणले व एका खासगी रुग्णालयात उपचार करुन तिची गर्भपिशवी अखेर काढून टाकली. त्यामुळे पीडितेची प्रकृती अतिशय खालावली असून शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने एकाप्रकारे आपणास शारीरिक व्यंधत्व आल्याने आपण वयाच्या चाळीशीतच अधू झाल्याचे आणि आपले संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाल्याचे पीडितेने दाखल तक्रारीत म्हटले आहे.


आरोपी रावसाहेब खवरे याने माझे आयुष्य उध्वस्त केले असून वारंवार लग्नाचे खोटे अमिष दाखवून 15 वर्ष मनाविरुद्ध शारीरिक अत्याचार केले व या दरम्यान सात ते आठवेळा गर्भवती झाल्यानंतर डॉ.संजय म्हसे व डॉ.अनंत शेकुकर यांच्या मदतीने माझ्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून जीवितास धोका निर्माण केल्याचे दाखल तक्रारीत नमूद असल्याने वरील तिघांवर भारतीय दंडसंहितेतील अत्याचाराच्या कलम 376 सह बळजबरी बेकायदा गर्भपात घडवून पीडितेच्या जीवास धोका निर्माण केल्याच्या कलम 313 व 336 प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत मोठ्या कालावधीत गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक ठिकाणांचा वापर झाल्याने आणि गर्भपातही अनेकदा करण्यात आल्याचा आरोप असल्याने तिघाही आरोपींना कोठडीत जावेच लागण्याची दाट शक्यता आहे. या घटनेने अहिल्यानगरचे राजकारण ढवळून निघाले असून अत्याचार आणि बेकायदा गर्भपातासारख्या गंभीर प्रकरणात सेनेच्या माजी जिल्हाध्यक्षासह दोघा वैद्यकीय व्यावसायिकांचे नाव आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.


हिंदूहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होवून झपाटल्यागत काम करणार्‍या रावसाहेब खेवरे (पहिलवान) यांची 2008 मध्ये संयुक्त शिवसेनेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदावरुन उत्तर नगरजिल्हाध्यक्षपदी निवड झाली. 2009 मध्ये त्यांनी कोपरगाव मतदारसंघाचे विभाजन होवून आकाराला आलेल्या शिर्डी मतदारसंघातून पहिल्यांदाच भाऊसाहेब वाकचौरे आणि त्यानंतर सदाशिव लोखंडे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्यासाठी थेट मातोश्रीची कवाडेही खुली झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याशी थेट संपर्क असल्याने शिवसेनेतील त्यांचे स्थान बळकट होत राहीले. या दरम्यान त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचीही पद्धतशीर विल्हेवाट लावली.


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षात मोठी पडझड होत असतांनाही त्यांनी आपल्या 38 वर्षांच्या निष्ठेचा हवाला देत ‘मातोश्री’च्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर त्यांनी राहुरीतून अपक्ष उमेदवारी केल्याने ठाकरे पिता-पूत्रांपासून त्यांचा दुरावा वाढला होता. पक्षादेश डावलून उमेदवारी केल्याने निवडणुकीपासून त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते. मात्र गेल्या वर्षभरात जिल्ह्यासह राज्यातील राजकारणात अनेक उलटफेर होवून शिर्डीसह ठाकरेगटाच्या सहा खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडेही संशयाने पाहीले जात होते. तो संशय खरा ठरवताना दोन महिन्यांपूर्वीच खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी 38 वर्षांच्या निष्ठेला तिलांजली वाहून शिंदेसेनेत प्रवेश केला होता.


त्यावेळी त्यांना शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाचे आश्‍वासन देण्यात आले होते. गेल्या सोमवार (ता.23) व मंगळवारी (ता.24) शिंदेसेनेच्या संपर्कप्रमुख खासदार ज्योती वाघमारे, भाऊसाहेब वाकचौरे व पक्षाचे सचिव राम रेपाळे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुखापासून पंचायत समितीच्या गणप्रमुखापर्यंत सर्व पदांच्या शिर्डीत मुलाखती सुरु होत्या. जिल्हाप्रमुखपदी रावसाहेब खेवरे यांना अश्‍वस्थ करण्यात आल्याने या पदावर त्यांचीच वर्णी लागणार असे दिसत असताना त्याच दिवशी त्यांच्यावर अत्याचारासह बेकायदा गर्भपाताचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने जिल्हाध्यक्षपद त्यांच्यापासून हिरावले गेले आहे. गुन्हा दाखल होण्याच्या वेळेवरही आता प्रश्‍न विचारले जात असून दाखल तक्रारीत करण्यात आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सविस्तर वर्णनाचा विचार करता त्यांची पुन्हा या पदावर निवड होण्याची शक्यताही आता मावळली आहे. 38 वर्षांच्या राजकीय निष्ठेचा अशाप्रकारे अंत झाल्याने एकीकडे जिल्ह्यात हळहळही व्यक्त होत आहे.


शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या दोन-अडिच दशकांपासून उत्तर नगरजिल्ह्यात स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करणार्‍या रावसाहेब खेवरे यांची सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यापासूनच या प्रकरणाची सुरुवात झाल्याचे दाखल तक्रारीवरुन दिसते. पीडित महिलेने खेवरे यांच्यावर गंभीर आरोप करताना राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्यास ठेवून झालेल्या शारीरिक अत्याचाराचा इमारती व ठिकाणांच्या नावांसह उल्लेख केला असून सात ते आठवेळा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप करताना राहुरीतील डॉ.संजय म्हसे व डॉ.अनंत शेकुकर यांनीच तो घडवून आणल्याचा गंभीर आरोपही केला आहे. या तक्रारीवरुन दाखल गुन्हा अतिशय गंभीर असून तो सिद्ध झाल्यास काळ्यापाण्याची शिक्षाही होण्याची शक्यता आहे. त्यातून रावसाहेब खेवरे यांच्या राजकीय जीवनासह दोघांचे वैद्यकीय जीवनही उध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 2389109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *