मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागण्याची चर्चा कपोलकल्पितच! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा.; राज्याला शिंदे-फडणवीसांचे सक्षम नेतृत्व..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकनाथ शिंदेंचा सत्तेला रामराम, राधाकृष्ण विखे पाटलांच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रीपदाची माळ? अशा आशयाची बातमी सोमवारी व्हायरल झाली आणि राज्यात राजकीय अफवांचे जणू पेवच फुटले. त्याचे सर्वाधिक लोण अहमदनगर जिल्ह्यात दिसून आले. मात्र या कपोलकल्पित बातमीतील हवा फारकाळ तग धरु शकली नाही आणि सायंकाळ होताहोता हा कोणीतरी जाणीवपूर्वक केलेला खोडसाळपणा असल्याचा खुलासा खुद्द महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच केला आणि अवघ्या काही तासांतच या वृत्तामागील ‘सत्य’ प्रखरपणे समोर आले. माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे यांनी राज्याच्या नेतृत्वाचा निर्णय केंद्रीय पातळीवरुन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असताना आणि राज्याला शिंदे व फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व लाभलेले असताना मुख्यमंत्री पदाबाबत उठवलेल्या वावड्या केवळ आपली बदनामी करण्यासाठीच असल्याचा घणाघातही त्यांनी केला आणि त्यातून जवळपास दोन तास हवेत संचारणार्या राजकीय अफवांचे फुगे फुटले.

रविवारी (ता.9) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना गटाच्या बहुतेक मंत्री व आमदारांनी अयोध्येत जावून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. सुरुवातीला हा संपूर्ण दौरा केवळ शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांसाठीच आयोजित केल्याच्या बातम्या येवून धडकलेल्या असताना त्यात अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश झाल्याने आणि तत्पूर्वी ते व्हाया दिल्ली अयोध्येत पोहोचल्याने राजकीय जाणकारांच्या तर्कवितर्कातून राज्यातील नेतृत्त्व बदलाची अफवा चर्चेत आली आणि एका वृत्तपत्राने प्रश्नचिन्हाचा अधिकार वापरुन त्याला बातमीचे कोंदण देत ती समाज माध्यमात व्हायरल केल्याने राज्यात राजकीय उलथापालथीच्या चर्चांना जणू पेवच फुटले.

याच व्हायरल वृत्तात सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरु असलेल्या शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करुन न्यायालयाचा निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने लागणार असल्याचे संकेतही देण्यात आले आणि त्यासाठीच मुख्यमंत्री रामलल्लाच्या दर्शनाला जावून सत्तेला रामराम ठोकणार असल्याचे व त्यांच्या जागी भाजपाचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील नेते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यातून सत्तेपोटीच्या महत्त्वकांक्षेमुळे फडणवीस यांनी शिंदे व चाळीस आमदारांचा बळी दिल्याचे बालंट अंगावर येवू नये यासाठी विखेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली जाणार असल्याचा गौप्यस्फोटही करण्यात आला.

सोमवारी (ता.10) दुपारी व्हायरल झालेल्या या वृत्तानंतर सायंकाळी उशिराने अवकाळग्रस्त भागांची पाहणी करुन शिर्डीत पोहोचलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माध्यमांनी त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा प्रकारच खोडसाळपणाचा आणि जाणीवपूर्वक बदनामीसाठी रचलेले कुंभाड असल्याचे सांगत राज्यात खळबळ उडवणार्या ‘त्या’ वृत्ताची हवाच काढून टाकली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, यामागे कोणीतरी माझ्या बदनामीचे सोयीस्कर षडयंत्र रचले आहे. अशाप्रकारच्या वावड्या उठवण्याचे काम जी मंडळी करीत आहे त्यातून त्यांचा हेतू दिसून येतो. राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने सक्षम नेतृत्व लाभले आहे. राज्याच्या नेतृत्वाचा निर्णय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असल्याने अशाप्रकारच्या चर्चा केवळ खोडसाळपणाच्या आणि बदनामीकारक असल्याचे सांगत त्यांनी दोन तास राज्यातील राजकीय हवा तापवणारा हा विषय बासनात गुंडाळला.

