लांडेवाडी-दवणगाव रस्त्याची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी
लांडेवाडी-दवणगाव रस्त्याची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील दवणगाव येथील चारी क्रमांक एकवरील लांडेवाडी-दवणगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात लहान-मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून प्रवास करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.
लांडेवाडी-दणगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वसलेली आहे. येथील लोकांचा शेती, दुग्ध व्यवसाय हे मुख्य उद्योग आहेत. राहुरी बाजारपेठेशी शेतकर्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र दुरवस्था झाल्यामुळे शेतकर्यांना आपला माल वेळेवर बाजारात नेता येत नसल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यावर्षी सततच्या पावसाने आधीच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहतुकीला ‘ब्रेक’ लावत असून वाहनचालकांचे कंबरडे मोडत आहेत. त्यामुळे ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे’ हे वाहनधारकांना समजेनासे झाले आहे. शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, दिव्यांग, रुग्ण यांना दळणवळणासाठी याच रस्त्याचा नियमित वापर करावा लागतो. असे असतानाही मागील काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम खाते, जलसंपदा विभाग व लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे कायमच डोळेझाक केलेली दिसून येते. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रोजच छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. तसेच या भागात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने बिबट्याचा नित्य संचार असतो. त्यामुळे या खराब रस्त्यावरून प्रवाशांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. सदर रस्ता हा श्रीरामपूर मतदारसंघात येत असल्याने आमदार लहू कानडे यांना या भागाने मताधिक्य दिले आहे. आता तरी नव्या कारभार्यांच्या हस्ते या रस्त्याचे भाग्य उजळावे अशी अपेक्षा आप्पासाहेब खपके, नाथाभाऊ जर्हाड, नंदकुमार पागिरे, संजय होन, दिनकर पाळंदे, नानासाहेब लोखंडे, शिवाजी होन, मधुकर गिरमे आदी शेतकरी, नागरिक व प्रवाशांनी व्यक्त केली आहे.