पाया जितका मजबूत तितकं भविष्य उज्वल : जागकर

नायक वृत्तसेवा, आश्वी
अंगणवाडी हे बालशिक्षणाची पहिली शाळा असून, येथूनच मुलांमध्ये संस्कार, अनुशासन आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण होते.शिक्षणाचा पाया जितका मजबूत तितकं बालकाचं भविष्य उज्ज्वल, असे प्रतिपादन आश्वी बुद्रुकचे ग्रामपंचायत अधिकारी गौतम जागकर यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील अंगणवाडी केंद्रात झालेल्या ‘आनंद बाजार’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक गौतम जागकर बोलत होते. आंगणवाडी केंद्रात शिक्षण आणि आनंद यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. केंद्रातील बालगोपालांनी ‘आनंद बाजार’चा मनसोक्त आनंद घेतला. हा उपक्रम केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवाधारित शिक्षणाची प्रभावी साधना ठरला.

पुढे बोलतांनी त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाण आणि व्यवहारकौशल्य विकसित होते. हेच खरे बालशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.या उपक्रमात मुलांनी स्वतःच लहान दुकाने उभारली. भाजीपाला, फळे, खेळणी, मिठाई आणि दैनंदिन वस्तूंची विक्री करून व्यवहार कौशल्याचा सराव केला. अंगणवाडी सेविका अलका ताजणे यांनी सांगितले की, बालकांना खेळत-खेळत शिकवणे ही शिक्षणाची सर्वोत्तम पद्धत आहे. ‘आनंद बाजार’सारखे उपक्रम मुलांच्या निरीक्षणशक्ती, आत्मविश्वास आणि सहकार्य वृत्ती वाढवतात.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व बालगोपाळांना फळे व मिठाई वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचा आत्मविश्वास आणि शिकण्याची उमेद यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय बनले.यावेळी पालक राणी ताजणे,अर्पणा मांढरे, महेश मांढरे, विक्रांत ताजणे,शोभा शिंदे, कुलथे,अर्शद शेख, सागर जऱ्हाड या अंगणवाडी सेविका,पालक उपस्थित होते.

यावेळी पालकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आपल्या बालकांना खरेदी-विक्री करताना पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. पालक वर्गाने अशा उपक्रमांद्वारे मुलांमध्ये स्वावलंबन आणि सामाजिक शिस्त रुजविण्याचे प्रयत्न केल्याबद्दल अंगणवाडी शिक्षिकांचे कौतुक केले.

Visits: 73 Today: 2 Total: 1108489
