महात्मा फुले विद्यालयाची क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी

नायक वृत्तसेवा, अकोले
येथील श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील महात्मा फुले विद्यालयाने युवा व क्रीडा सेवा संचालनालय अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी दाखवत वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात शाळेला यश मिळवून दिले.

शासनाच्या वतीने दरवर्षी तालुकास्तर, जिल्हास्तर, राज्यस्तर आणि विभागीय पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.यावर्षीही तालुकास्तरावर क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.या स्पर्धेत महात्मा फुले विद्यालय सुगाव बु विद्यालयाने फुटबॉल १७ वर्षे वयोगट मुले प्रथम, १७ वर्षे वयोगट मुली द्वितीय,१४ वर्षे वयोगट मुली द्वितीय तर व्हॉलीबॉल १७ वर्षे वयोगट मुली द्वितीय व मुले तृतीय,१४ वर्षे वयोगट मुले व मुली द्वितीय क्रमांक पटकावला.रिंग टेनिस या क्रीडा प्रकारात मुलींचा जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक व बुद्धिबळ स्पर्धेत आराध्या चौधरी हिने तालुकास्तरावर चतुर्थ क्रमांक मिळवत जिल्हास्तरावरील निवडीस पात्र ठरली.एथलेटिक्स उंच उडी स्पर्धेत अलिना पठाण हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला.रिंग टेनिस स्पर्धेत राज्य पातळीवर नांदेड येथे विद्यालयाचा ओम शिवदास देशमुख याने चतुर्थ क्रमांक पटकावत राज्य पातळीवर विद्यालयाला बहुमान मिळवून दिला व यश मंगेश देशमुख याने राज्यस्तरावर सहभाग नोंदवला.तर रिंग टेनिस राज्य पातळीवर निवड चाचणीसाठी श्रावणी महेंद्र देशमुख, खुशी रमेश आवारी यांची निवड झाली आहे.एस एस सी परीक्षेत जिल्हा व राज्य पातळीवर विशेष कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूस अधिक गुण मिळत असतात.यावर्षीही काही विद्यार्थ्यांना अतिरिक्त क्रीडा विभागाचे गुण मिळणार असल्याने विद्यार्थी सहभाग वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रचंड मेहनत करुन प्रतिकूल परिस्थितीत आपल्या क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्ये आत्मसात करत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतात.संस्थेने वेळोवेळी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देऊन नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे व याकामी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय घुले यांनी वेळोवेळी विविध क्रीडा प्रकारची कौशल्ये शिकवत मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर,कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, मुख्याध्यापक प्रकाश सोनवणे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, सरपंच डॉ. अनुप्रीता शिंदे, उपसरपंच महेश देशमुख, पोलीस पाटील राजेंद्र शिंदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 28 Today: 2 Total: 1108784
