… अखेर नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
… अखेर नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
वाहनचालकांसह नागरिकांतून समाधान; शासनाकडून चाळीस कोटींचा निधी उपलब्ध
नायक वृत्तसेवा, राहाता
नगर-मनमाड महामार्गावरील मोठमोठे खड्डे वाहनचालकांसाठी नित्याचीच डोकेदुखी ठरत होती. पावलोपावली खड्डेच खड्डे असल्याने कोणता खड्डा हुकवायचा हाच मोठा यक्षप्रश्न वाहनचालकांना पडत असे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे हा रस्ता म्हणजे ‘मृत्यूचा सापळा’ म्हणून लवकरच उदयास येत होता. परंतु आता या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असल्याने वाहनचालकांसह नागरिकांमधून सध्यापुरते का होईना समाधान व्यक्त केले जात आहे.
नगर-मनमाड महामार्गावरील राहाता शहराच्या मुख्य चौकात, बसस्थानक, पोलीस ठाणे, सिद्ध संकल्प मंगल कार्यालय व बाजार समितीसमोर मोठमोठे खड्डे पडलेले होते. रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल मात्र खड्डे केव्हा बुजविणार? रस्त्याची डागडुजी केव्हा होईल? यांसह अनेक प्रश्न उपस्थित होत होते. तसेच तातडीने खड्डे बुजवणे अत्यंत गरजेचे असल्याचा सूर वाहनचालकांसह नागरिकांतून जोर धरुन होता. याप्रश्नी अनेकदा आंदोलन झाली. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी याप्रश्नी लक्ष घालून नगर-मनमाड राज्य महामार्गावरील खड्डे बुजवणे व डागडुजीकरिता चाळीस कोटी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध केला आहे. सध्या रस्त्याच्या डागडुजीचे काम जलद गतीने सुरू झाले असून राहाता, शिर्डी, बाभळेश्वर या परिसरात खड्डे बुजवण्याच्या कामाला मोठी गती असल्याचे दिसून येत आहे.
सदर काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असल्याचा सूरही नागरिकांतून उमटत आहे. यापूर्वी अनेकदा महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर केला जात होता. मात्र यावेळी खडी व डांबर टाकून खड्डे बुजवून डागडुजी केली जात आहे. परिणामी वाहनचालकांना काहीसा का होईना दिलासा मिळणार आहे. मुरूम टाकून बुजविलेले खड्डे पावसाच्या पाण्याने आणि अवजड वाहनांच्या वर्दळीने लवकरच उखडली जात होती. परंतु, आता खडी व डांबर एकत्र करून खड्डे बुजविले जात असल्याने मुरूम टाकून बुजविलेल्या खड्ड्यांच्या तुलनेत सध्याच्या खड्ड्यांचे आयुष्य किमान जास्त राहिल अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. तर ही नुसती मलमपट्टी असून कायमस्वरुपी उपाय म्हणून नागरिकांना नूतनीकरणाची प्रतीक्षा लागली आहे.