इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱे दोघे गजाआड

नायक वृत्तसेवा, लोणी
आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्रामवर टाकणाऱ्या श्रीरामपूरच्या दोघांवर लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या.

शनिवार दि.४ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रीरामपूर येथून शाहिद हुसेन शेख (वय २१, रा. श्रीरामपूर), सात हशम सय्यद (वय २०, रा. वार्ड नंबर १ श्रीरामपूर) हे दोन तरुण लोणी परिसरामध्ये गेले होते. तेथे त्यांनी एक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये हे दोन्ही तरुण श्रीरामपूर वरून लोणी येथे महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या मुलींची टिंगल टवाळी करण्यासाठी आल्याबाबत परस्परांशी बोलत असल्याचे दिसून येत आहे.त्यांचा उद्देश हा दुसरा तिसरा कोणताही नसून केवळ मुलींची छेड काढणे हा असल्याचे इंस्टाग्रामवरील व्हिडिओ वरून दिसून आल्यावर पोलिसांनी या दोघाही तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

या दोघाही आरोपींविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर नंबर ५४८/२०२५ भारतीय न्याय संहिता ६२, ७९ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२,११७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वाघ करत आहे. या कारवाईत पोलिसांनी या दोन आरोपींचे मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
सोशल मीडिया अर्थात फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यावर प्रसारित होणाऱ्या विविध पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत असून जर कोणी अशा प्रकारे गैरवर्तन करून आपत्तीजनक पोस्ट प्रसारित करत असल्यास त्यांच्यावर पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करत आहेत. महिला, मुली यांच्याशी संबंधित गैरप्रकार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींनी असे कोणाकडूनही गैरप्रकार किंवा गैरवर्तन होत असल्याचे दिसून आल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. जेणेकरून गैरवर्तन करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल असे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

Visits: 20 Today: 2 Total: 1111615
