अमृतवाहिनीच्या पवित्र परिसरावर नशेबहाद्दरांचे वर्चस्व!

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असलेला गंगामाई घाट परिसर गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे. एकेकाळी शांत, पवित्र आणि निसर्गरम्य असलेला हा घाट सध्या कचरा, झाडांची सुकलेली पाने, प्लास्टिकच्या पिशव्या, दारू व बियरच्या बाटल्यांच्या खचाने व्यापला आहे. गंगामाई घाट हा फक्त नदीकाठ नाही, तर शहराच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि निसर्गसौंदर्याचा अविभाज्य भाग आहे. अशा ठिकाणी अस्वच्छता आणि नशेच्या संस्कृतीला मुळातून आळा बसणे ही काळाची गरज बनली आहे.
गेल्या काही महिन्यापासून शहरातील गंगामाई घाट परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव जाणवतो आहे. एकेकाळी शांत, पवित्र आणि निसर्गरम्य असलेला हा परिसर सध्या कचरा, दारूच्या व बियरच्या बाटल्या, झाडांची सुकलेली पाने आणि दुर्गंधीयुक्त अवशेषांनी येथे येणाऱ्या प्रत्येकालाच नाक मुरडायला भाग पाडत आहे.दररोज सकाळ-संध्याकाळ या परिसरात अबालवृद्ध, महिला आणि मुली फिरण्यासाठी, प्राणायामासाठी आणि देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, वाढत्या अस्वच्छतेमुळे आणि असुरक्षित वातावरणामुळे येथे येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. हा घाट परिसर प्राचीन देवालयांनी वेढलेला असून, धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे दरवर्षी अनेक उत्सव, धार्मिक विधी असे कार्यक्रम पार पडतात. परंतु सध्या या ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या कचऱ्याचे दृश्य पाहून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
अलीकडच्या काही दिवसात प्रवरा नदीकाठच्या परिसरात वाळू तस्करांसोबतच नशेबाजांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या अंधारात अनेक टोळ्या  घाट परिसरात बसून दारू पितात, अश्लील वर्तन करतात आणि नंतर लहान-मोठ्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होतात, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून, परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून गंगामाई घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्यात यावी, धार्मिक व सांस्कृतिक ठिकाणांचा सन्मान राखावा, येथे येणाऱ्या नशेबाज व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करून गंगामाई परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी केली जात आहे. त्याचबरोबर जवळपास गेल्या महिनाभरापासून नगरपालिकेचे झाडू कर्मचारी व मुकादम घाट परिसरात फिरकलेले नाहीत. ठिकठिकाणी साचलेला कचरा व दारूच्या बाटल्या पाहून नागरिक संतप्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
गंगामाई घाट हा फक्त नदीकाठ नाही, तर शहराच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि सामाजिक एकतेचा आरसा आहे.पालिकेने आणि पोलिस प्रशासनाने आता तरी जागे होऊन या पवित्र परिसराचे सौंदर्य व पवित्रता पुनर्स्थापित करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक आठवड्यांपासून नगरपालिकेचे झाडू कर्मचारी किंवा मुकादम घाट परिसरात दिसतच नाहीत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
गंगामाई घाट हा परिसर प्राचीन मंदिरांनी वेढलेला, धार्मिक विधी, उत्सव आणि स्नानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या तिथे पडलेल्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा ही अव्यवस्था पाहून भाविकांमध्ये संताप उसळला आहे.
धार्मिक महत्त्व असलेल्या या ठिकाणी नागरिक व महिला भक्तांनी येणे कमी केले आहे, हे चिंताजनक चित्र आहे.
हे पवित्र ठिकाण असून सुद्धा अशा प्रकारे दुर्लक्ष होणे संतापजनक असल्याची भावना शहरातून व्यक्त होत आहे. 
Visits: 22 Today: 1 Total: 1113918

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *