साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार : ना.शहा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव 
सहकार क्षेत्रात सीएनजी व पोटॅश निर्मितीच्या माध्यमातून व त्याची विक्री व्यवस्था करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला आहे. याच पद्धतीने देशात १५ सहकारी साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचे युनिट उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्रातील अधिकाधिक कारखान्यांचा त्यात सहभाग असेल, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. केंद्र सरकार निश्चितपणे त्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
केंद्रीय मंत्री  शाह यांच्या हस्ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना येथे देशातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी.) प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री  शाह म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. स्वदेशीच्या वापरातून देशाला स्वयंपूर्ण करण्याचे व देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पहिल्या तीन क्रमांकात आणण्याचे उद्दिष्ट आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने याची सुरुवात केली आहे. याचप्रमाणे इतर कारखान्यांनी पुढे येण्याची गरज आहे. प्रास्ताविक विवेक कोल्हे यांनी केले. यावेळी संजीवनी उद्योग समूहाची वाटचाल दर्शविणारी चित्रफीत दाखवण्यात आली.
Visits: 55 Today: 3 Total: 1098685

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *