पोलीस प्रशिक्षणाचे हब म्हणून संगमनेर नावारूपास आले : रूपनवर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुका हा सुसंस्कृत व विकसित तालुका म्हणून राज्यात ओळखला जात आहे. जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम हे संगमनेरकरांचे वैशिष्ट्य असून शैक्षणिक केंद्राबरोबर संगमनेर हे पोलीस प्रशिक्षणाचे हब म्हणून राज्यात नावारूपास आले असल्याचे गौरवोद्गार बारामतीच्या सह्याद्री अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी काढले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आय लव संगमनेर चळवळीच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी रूपनवर बोलत होते. या सराव परीक्षेमध्ये २०२२ युवक व युवतींनी सहभाग घेतला.यावेळी व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आयोजक आ. सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, डॉ. मैथिली तांबे, तसेच रॉयल अकॅडमी, साई करिअर अकॅडमी, आर्यस अकॅडमी नाशिक, शौर्य अकॅडमी, जयहिंद अकॅडमी, ज्ञानराज अकॅडमी, आर्या अकॅडमी, एस.के अकॅडमी व मातोश्री अकॅडमीचे संचालक उपस्थित होते.यावेळी सर्व विद्यार्थ्यांची लेखी सराव परीक्षा घेण्यात आली.

यावेळी आ. सत्यजित तांबे म्हणाले, विविध अकॅडमीमुळे संगमनेर हे पोलीस भरती केंद्र ठरले आहे. राज्यभरातून विद्यार्थी येथे येत आहेत. नागपूर ते मुंबई असे राज्यातून सुमारे सात हजार विद्यार्थी संगमनेर मध्ये अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे शिक्षणाचे व सहकाराचे केंद्र बनले आहे. येथील जिव्हाळा आणि प्रेम यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपलं कौटुंबिक नातं निर्माण झाल आहे. संगमनेर बद्दल तुम्हा सर्वांना वाटणारा आदर हा नक्कीच संगमनेरकरांसाठी आनंदाचा आहे. पोलीस भरतीसाठी सामान्य कुटुंबातील मुले येत असतात. प्रतिष्ठा, स्थैर्य आणि पगाराची शाश्वती ही सरकारी नोकरीतील वैशिष्ट्य असून प्रत्येकाने नोकरीत लागल्यानंतर आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवा. भ्रष्टाचारापासून दूर राहा. चुकीचे काम कोणी करत असेल तर त्याला थांबवा. चुकीचे काम करण्यासाठी तुमच्यावर दबाव आला तर तुमच्या आई-वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा, म्हणजे भ्रष्टाचार आणि चुकीचे काम होणार नाही असे सांगताना कष्ट करा, प्रामाणिक रहा जीवनामध्ये सर्वात समाधानी तुम्ही राहाल असे ते म्हणाले.

माजी आ. डॉ तांबे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा देशाला आदर्शवत ठरला आहे. याचबरोबर शिक्षणामध्ये मोठी क्रांती झाली आहे. अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथे काम होत आहे.
यावेळी आय लव संगमनेर चळवळीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक आ. सत्यजित तांबे यांनी केले. आभार दुर्गा तांबे यांनी मानले.

Visits: 52 Today: 1 Total: 1099580
