शेखर शेळके यांचे अपूर्ण स्वप्न  पूर्ण करणार : आ.खताळ 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
तरुणांना क्रिकेटच्या माध्यमातून मोठे स्वप्न दाखवणाऱ्या शेखर शेळके यांचे अपघाती निधन ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मात्र गावातून एक सक्षम क्रिकेटपटू घडविण्याचे त्यांचे अपूर्ण स्वप्न ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या प्रयत्नांतून नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास आ.अमोल खताळ यांनी व्यक्त केला. 
तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील क्रिकेटर शेखर शेळके यांचे काही महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बोटा येथे क्रिकेटचे मैदान उभारण्यात येणार आहे. या मैदानाचा शुभारंभ आ.अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, सुहास वाळुंज, आंबीदुमालाचे सरपंच जालिंदर गागरे, रामभाऊ शेळके, पांडुरंग शेळके, मुन्ना शेख, महेश शेळके, तौसिफ शेख, रवी काशिद, शेखरची आई नंदा शेळके, बहीण उर्मिला शिंदे, तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. खताळ म्हणाले, शेखर शेळके यांनी  गावातील युवकांसाठी एक दर्जेदार मैदान असावे यासाठी एक नवीन प्रकल्प सुरू केला होता.परंतु त्याच्या अपघाती निधनानंतर काही काळासाठी हे काम थांबले होते. मात्र आता त्यांच्या मित्रांनी आणि ग्रामस्थांनी मिळून पुन्हा क्रिकेटचे मैदान उभारण्याचे काम सुरू केले आहे. या माध्यमातून गावातील तरुण खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर, पुढील काळामध्ये शेखर शेळके यांच्या स्मृती जागृत राहाव्यात म्हणून जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करावी असा सल्ला देत आ. खताळ म्हणाले की, नेहमी तुमच्या सोबत आहे. पुढील काळात या भागात ज्या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातील, त्या शेखर शेळके या प्रतिभावंत क्रिकेट पटूच्या नावाने घेण्यात याव्यात. यासाठी मी देखील पुढाकार घेईल. तसेच क्रीडा विभागाच्या माध्यमातून यासंदर्भात काय करता येईल, यावरही मी प्रयत्नशील राहील. असाही विश्वास आ. अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
Visits: 72 Today: 2 Total: 1110209

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *