ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये द्या!

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात ॲड.आंबेडकर यांची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झाले आहे. शेतपिके वाहून गेली आहेत.घरे, शेत व मालमत्ता नष्ट झाली आहे.शासन केवळ तुटपुंजी मदत करत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांना द्या तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेल्या या पत्रात वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की,महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले नाही, तर जनावरे देखील मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत. बांधावर नुसतं पिकच नाही, तर शेतकऱ्यांचे स्वप्नं, दिवाळीला घरात येणारे पीक देखील वाहून गेले. या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. हा महापूर महाप्रलय आहे. या अतिवृष्टीने केवळ शेतकरी वर्ग बाधित झाला नसून, गावातील लहान मोठे व्यावसायिक, कारागीर आणि शेत मजुरांना देखील फटका बसला आहे. बारा बलुतेदार, मागासवर्गीय समुदायावर देखील हे संकट कोसळले आहे.

राज्य सरकारने २,२०० कोटींची केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून करोडो रुपयांचा वसूल केलेला सेस राज्याच्या सकल उत्पन्नात कृषीचे १२ टक्के पैसे केव्हा कामात येतील? शासनाने दिलेली मदत कोणत्या दराने दिली, हे देखील स्पष्ट झाले पाहिजे. असे या पत्रात नमूद करत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी,या संकटसमयी सरकारने तातडीने आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या असून शासनाने वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या तातडीने मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून म्हटलेआहे .

मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करतांना, त्यांना मदत करतांना सरकार कुठलेच सर्व्हे, पंचनामे करत नाही मग, शेतकऱ्यांसाठी हे सोपस्कार का आहेत? ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नको, तर सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.

Visits: 70 Today: 5 Total: 1110663
