धार्मिक कार्यातूनच ऊर्जा मिळते : आ.खताळ

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे
अखंड हरिनाम सप्ताह, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव यासारख्या धार्मिक कार्याच्या माध्यमातूनच जनतेची कामे करण्यास खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन आ.अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आभिजीत महाराज गिरी यांची कथा सुरू आहे.या कथेसाठी उपस्थित असलेल्या भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते.

यावेळी भाऊसाहेब महाराज झुरळे, देवस्थानचे भगत संतोष झुरळे, योगेश मुळे, दत्तात्रय घोलप, नवनाथ मुळे,भाऊसाहेब काळे,सतीश मुळे,सोमनाथ ढवळे,बबन काळे, दर्शन झुरुळे,आदींसह गावातील गायक,वादक महिला, भगिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

आ. खताळ म्हणाले की, संगमनेर तालुक्यासह आसपासच्या परिसराचे एक जागृत देवस्थान म्हणून काकडवाडीचे महालक्ष्मी देवस्थान ओळखले जाते. या देवीच्या दर्शनासाठी मी नित्यनेमाने येत असतो. ज्यावेळी मी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेत होतो, तेव्हा येथेच मला विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली असल्याचे समजले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला, अन् तिच्या कृपाआशीर्वादानेच या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली आहे. भविष्यात तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी देवीने शक्ती देवो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी महालक्ष्मी मातेच्या चरणी केली.

Visits: 127 Today: 2 Total: 1108782
