बालब्रह्मचारी महाराजांचा समाधी सोहळा संपन्न ओमचा उच्चार करत हजारो भाविकांनी केले अभिवादन
नायक वृत्तसेवा, नेवासा
वेदमंत्राच्या जयघोषात नेवासा तालुक्यातील टोका येथील श्री सिध्देश्वर देवस्थानचे महंत ब्रम्हलिन बालब्रम्हचारी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा समाधी पूजनाने भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी ओमचा उच्चार करत उपस्थित हजारो भाविकांनी बालब्रम्हचारी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केले.
देवगड दत्त मंदिर संस्थानचे महंत भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी देवगडचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, शनि धामचे महंत योगेशानंदगिरी महाराज, महंत सोमेश्वरगिरी महाराज, बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधीची विधीवत पूजा करण्यात आली.
यावेळी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराजांचे कीर्तन झाले. बालब्रम्हचारी महाराजांनी भक्तांच्या उद्धारासाठी येथे कार्य केले. लहान बालकांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व भक्तांची ते आपुलकीने चौकशी करत व त्यांना उपासनेच्या माध्यमातून भक्तीचा मार्ग दाखवत. निर्जन स्थळ असलेल्या या भागाचा त्यांनी कायापालट केला प्रभू रामचंद्र भगवंताचा पदस्पर्श येथे झाला असल्याची महती ते भक्तांना सांगत म्हणून हे तीर्थक्षेत्र नावारूपाला आले. आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांची कृपादृष्टी भक्तांवर कायमच बरसत राहील असे सांगून त्यांनी त्यांचे जीवन कार्य कीर्तनात बोलताना विषद केले.
यावेळी बालब्रम्हचारी बाबांचे वंशज जम्मू येथील भाजपचे खासदार जुगलकिशोर शर्मा, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, रामनाथ महाराज पवार, मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विजय करे, ज्ञानेश्वर शिंदे, भाजपचे अहमदनगर जिल्हा संघटन चिटणीस व बाबांचे सेवेकरी नितीन दिनकर, संजय सुखदान, उद्योजक प्रभाकर शिंदे, संचालक बाळासाहेब शिंदे, सोहळा समितीचे सदस्य वसंत डावखर, रमेश गंगुले यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. शेवटी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.