खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद !
आ. सत्यजीत तांबे यांनी उपलब्ध करुन दिले व्यासपीठ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आय लव संगमनेरच्या वतीने नवरात्रीनिमित्त आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

बुधवार दि.२४ ते शनिवार दि. २७ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत रात्री ७ ते १० या वेळेत शहरातील तब्बल १६ ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये हजारो महिलांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील महिलांना खेळ, स्पर्धा, प्रश्नोत्तरे आणि लकी ड्रॉ अशा मजेदार उपक्रमांचा आनंद घेता आला. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने राजेशाही पैठणी, कुकर, मिक्सर, गृहउपयोगी साहित्य व इतर आकर्षक भेटवस्तू यांचा समावेश होता. यावेळी शहरातील सर्व कार्यक्रमांना माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कांचन थोरात, शरयू देशमुख, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे आवर्जून उपस्थित राहिले.आ.सत्यजित तांबे यांनी खेळ पैठणीच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य महिला आणि तरुणींना सन्मानाने सहभागी होण्याची संधी मिळाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. खेळ पैठणीच्या निमित्ताने महिलांना केवळ आनंदच नाही, तर आत्मविश्वास व एकोपा वाढवण्याची संधी मिळाली.सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तसेच आपुलकीची ओढ निर्माण करणारा जनमानसातील माणुसकी असलेला नेता म्हणून सत्यजित तांबे यांचे नाव आज घराघरांत पोहोचले असल्याचे महिलांनी सांगितले. शहरात विकासासोबत सांस्कृतिक परंपरेला चालना देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आय लव संगमनेरच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नवरात्रीच्या उत्साहात भर घालणारा हा खेळ पैठणीचा सांस्कृतिक सोहळा संगमनेर शहरासाठी अविस्मरणीय ठरला.

गेल्या ३०-३५ वर्षांपासून लोकसेवेतील तांबे परिवार संगमनेरकरांच्या सुख-दुःखात, सामाजिक आणि सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांत नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, आ. सत्यजित तांबे आणि डॉ. मैथिली तांबे यांच्या सततच्या उपस्थितीमुळे तांबे परिवाराने जनतेच्या मनात आपलेपणाचे घर केले आहे.

Visits: 68 Today: 2 Total: 1114868
