पत्रकारांना अपघाती विमा कवच मिळणार : गडाख 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य असणाऱ्या पत्रकारांना लवकरच अपघाती विमा कवच मिळणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी दिली. गुरुवारी संध्याकाळी व्हॉइस ऑफ मीडियाची आढावा बैठक शहरातील विश्रामगृहात पार पडली, त्यावेळी गडाख बोलत होते.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य कोअर कमिटीचे पदाधिकारी गोरक्षनाथ मदने, राज्य विंग प्रमुख अमोल मतकर,  तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, शहराध्यक्ष महेश पगारे, अश्विन मुथा, चंद्रकांत शिंदे पाटील, सचिन जंत्रे, गोरक्ष नेहे, चंद्रकांत महाले, विश्वनाथ घुले, अण्णासाहेब काळे, संजय अहिरे, सुखदेव गाडेकर, सुभाष भालेराव, आनंद गायकवाड नवनाथ वावरे, सोमनाथ डोळे, ओंकार सस्कर, नितीन कोकणे आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष गडाख म्हणाले, ऑक्टोबर महिन्यात पंढरपूर येथे संघटनेचे दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. या अधिवेशनासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती बंधनकारक असून, आयोजकांना नियोजन सोयीस्कर व्हावे, कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत संघटनेतर्फे संगमनेर शहरात स्वागत फलक उभारण्यात येणार असून, त्यासाठी योग्य जागा शोधण्याचे ठरविण्यात आले.  तसेच प्रत्येक सदस्याला लवकरच ओळखपत्र वितरित करण्यात येणार आहे. आगामी काळात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना संगमनेर शहरातच ५० टक्के सवलतीत उपचार उपलब्ध करून देण्याचा संघटनेचा मानस असून लवकरच त्यासंदर्भात नियोजन केले जाणार आहे, तसेच भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून पत्रकारांचा अपघाती विमा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गडाख यांनी दिली.
बैठकीत राज्य कोअर कमिटीचे पदाधिकारी गोरक्षनाथ मदने व राज्य विंग प्रमुख अमोल मतकर यांनी संघटनेची ध्येयधोरणे मांडून मार्गदर्शन केले. व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेची कार्यपद्धती आणि पंचसूत्री तसेच संघटनेचे महत्व या विषयावर गोरक्षनाथ मदने यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी राज्य कोअर कमिटीवर गोरक्षनाथ मदने, राज्य विंग प्रमुख अमोल मतकर, उर्दू विंग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी इद्रीस शेख यांची, तर जिल्हा सचिवपदी नवनाथ वावरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.  उपस्थितांचे स्वागत शहराध्यक्ष महेश पगारे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू यांनी मानले.
Visits: 47 Today: 2 Total: 1114503

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *