17 तारखेच्या मोर्चात समाजातील सर्व नेत्यांसह बांधवांनी सहभागी व्हावे ः गायकर
17 तारखेच्या मोर्चात समाजातील सर्व नेत्यांसह बांधवांनी सहभागी व्हावे ः गायकर
मराठा आरक्षण मागणीबाबत व्यापक मोर्चाच्या नियोजनासाठी अकोलेत बैठक
नायक वृत्तसेवा, अकोले
मराठा समाजाने नेहमी मोठ्या भावाची भूमिका निभावली असून आता सामाजाच्या आरक्षणासाठी व्यापक मोर्चा शनिवारी, 17 तारखेला अकोलेत काढण्यासाठी सर्व समाजातील नेते व बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी केले.
मराठा आरक्षण प्रश्नी येत्या शनिवारी (ता.17) सकल मराठा समाजाच्यावतीने तहसील कार्यालयावर व्यापक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी सोमवारी (ता.12) येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन गायकर बोलत होते. या बैठकीस माजी आमदार वैभव पिचड, नगराध्यक्षा संगीता शेटे, माजी सभापती विठ्ठल चासकर, जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, भाऊपाटील नवले, डॉ.संदीप कडलग, रावसाहेब वाकचौरे, अरुण शेळके, भाऊपाटील नवले, गोरक्ष मालुंजकर, राजेंद्र डावरे, यशवंत आभाळे, रोहिदास धुमाळ, रेश्मा गोडसे, अशोक देशमुख, सोमनाथ नवले, राजेंद्र कुमकर, अॅड.अनिकेत चौधरी, सुरेश नवले, जालिंदर बोडके, ज्ञानेश पुंडे, शिवाजी कदम, शाहीर मुकूंदा भोर, नीलेश तळेकर, विकास बंगाळ, गणेश तोरमल, अशोक आवारी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मराठा समाजाचे तीन पक्षांचे तालुकाध्यक्ष असा उल्लेख गायकर यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. त्यानंतर गायकर म्हणाले, सुमारे दहा हजार लोकांचा मोर्चा अकोलेत झाला पाहिजे. यासाठी उद्यापासून तालुकाभर विभागवार बैठक आयोजित करण्यात येणार आहे. मराठा समाजातील शेतकर्यांनी काबाड कष्ट करून महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्या शेतकर्यांची आज काय अवस्था आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले ही आनंदाची बाब थोडे दिवस राहिली. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने अस्वस्थता पसरली आहे. मराठा समाजाने नेहमी इतर समाजातील नेत्यांना मोठेपणा दिला आहे. अनेकांनी मोठा त्याग करुन आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. तरी देखील आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही.
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लाखो लोकांचे मोर्चे निघाले. सकल मराठा समाजाला इतर समाजांप्रमाणे न्याय मिळावा यासाठी आपण पाठिंबा देण्यासाठी या बैठकीस उपस्थित असल्याचे माजी आमदार पिचड यांनी सांगून, राजकारण विरहित आपण सर्व एकत्रित असताना समाजातील गोरगरीबांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. कोरोना असला तरी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी आपण संघटित झालो नाही तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. हा समाजाचा संदेश सरकार व न्यायालयापर्यंत पोहचवू यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असेही पिचड यांनी सांगितले.
तत्पूर्वी बैठकीत उपस्थित असणार्या विविध पदाधिकार्यांनी मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका मांडली. शहरातील महात्मा फुले चौकापासून शनिवारी (ता.17) सकाळी 10 वाजता मोर्चास सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर मोर्चा नेत तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याचे असल्याचे जाहीर केले. प्रास्ताविक राज गवांदे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तर आभार अमोल वैद्य यांनी मानले.