सावळीविहीर ते नगर अंतरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जानेवारीत ः खा.डॉ.विखे

सावळीविहीर ते नगर अंतरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जानेवारीत ः खा.डॉ.विखे
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष सुखबीरसिंग संधू यांची दिल्ली येथे घेतली भेट
नायक वृत्तसेवा, शिर्डी
नगर-मनमाड महामार्गाला तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. मात्र राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होताना त्याचे दोन तुकडे झाले. सावळीविहीर ते अहमदनगर या अंतरातील रस्त्याला 160 क्रमांक तर सावळीविहीर ते येवला अंतरातील रस्त्याला 752-जी असा क्रमांक मिळाला आहे. नुकतीच खासदार डॉ.सुजय विखे यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष सुखबीरसिंग संधू यांची भेट घेतली. यावेळी सावळीविहीर ते नगर अंतरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या जानेवारीत सुरू होईल असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सावळीविहीर ते नगर राज्यमार्ग सात महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतला. मात्र राज्य सरकारने काम केलेला कोपरगाव ते नगर दरम्यान हा रस्ता निकृष्ट झाल्याने दर पावसाळ्यात खड्ड्यांत जातो. यंदा त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या पाठपुराव्यानंतर खास बाब म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी 40 कोटी रुपये मंजूर केले. त्यातून खड्डे कसेबसे बुजविण्याचे काम सुरू आहे. ते येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करतात.

सिन्नर, सावळीविहीर, शिर्डी तनगर या अंतरातील 160 क्रमांकाचा हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग पुढे दौंड, बारामतीमार्गे थेट चिक्कोडीपर्यंत (कर्नाटक) जातो. सिन्नरपासून त्याचे काम वेगात सुरू आहे. ते कोपरगाव तालुक्याच्या हद्दीपर्यंत आले आहे. या संपूर्ण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशीच परिस्थिती सावळीविहीर ते मालेगाव या 752-जी या राष्ट्रीय महामार्गाचीही आहे. हा रस्ताही चौपदरी होईल. त्याचीही निविदा प्रक्रिया सुरू आहे.

कोपरगाव ते नगर या निकृष्ट रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आजवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची पडले. मात्र, रस्ता व्यवस्थित होत नाही. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला. मात्र, त्याची अवस्था एवढी दयनीय झाली आहे की तीन महिन्यांसाठी दुरुस्तीसाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्चण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे.

 

Visits: 236 Today: 1 Total: 2167299

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *