संगमनेरच्या आमदारांवरील हल्ला प्रकरणाला कलाटणी! माजीमंत्र्यांच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल; मोबाईल संभाषणासह संदेशाचीही देवाण-घेवाण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवड्यात संगमनेरच्या आमदारांवर झालेल्या हल्ला प्रकरणाचे धागेदोरे जोडण्यात यशस्वी झाल्याचा दावा करीत शहर पोलिसांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय्य सहाय्यक भास्कर खेमनर यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या तांत्रिक तपासात खेमनर यांचे आरोपी प्रसाद गुंजाळशी मोबाईलवर संभाषण होण्यासह संदेशाची देवाण-घेवाण झाल्याचेही तपासातून समोर आल्याने पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 49 अन्वये अपप्रेरणा दिल्याचा ठपका ठेवून त्यांनाही दाखल गुन्ह्यात आरोपी केले असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सुरुवातीला आर्थिक व्यवहाराचे कारण असल्याचे समोर आणण्यात आले होते, आरोपीच्या आईसह ज्याच्यासोबत पैशाचा व्यवहार झाला अशा दोघांनीही समोर येवून या प्रकरणात राजकारण आणू नये असे आवाहनही केले. मात्र, त्यानंतर अवघ्या 24 तासांतच पोलिसांनी या प्रकरणाचे धागे थेट माजीमंत्र्यांच्या सहाय्यकाशी जोडल्याने येणार्या कालावधीत जिल्ह्याचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

गेल्या गुरुवारी (ता.28) संगमनेरचे आमदार अमोल खताळ एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मालपाणी लॉन्स येथे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर तेथून जात असताना प्रेक्षकांमधील काहींनी त्यांच्याशी हस्तांदोलनासह सेल्फी घेण्यासाठी गर्दी केलेली असतानाच आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ (वय 22, रा.खांडगाव) याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार खताळ यांच्या अंगरक्षकासह मालपाणी उद्योग समूहाच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हल्लेखोराच्या मुसक्या आवळीत त्याला जेरबंद केले. या घटनेनंतर ऐन गणेशोत्सवात संगमनेरातील राजकारण तापले. त्यातून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष रंगला असतानाच या प्रकरणाला ‘आर्थिक’ बाजू असल्याची चर्चा सोशल माध्यमातून घडवण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 109 (खुनाचा प्रयत्न) आणि 351 (1) फौजदारी धाकदपटशा निर्माण करुन आगळीक केल्याप्रकरणी आरोपीला अटक करीत त्याची आजपर्यंत (ता.2) पोलीस कोठडीही मिळवली. या दरम्यान या प्रकरणावरुन राजकारण तापले असतानाच महायुतीच्यावतीने हा सगळाप्रकार पूर्वनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप करीत शुक्रवारी (ता.29) निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जमलेली गर्दी आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सर्वच् वक्त्यांनी केलेल्या भाषणाचा रोखही त्याच दिशेने असल्याने आगामी कालावधीत संगमनेरच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होण्यासह या प्रकरणाचे गांभीर्यही वाढले होते.

त्यातच आरोपी प्रसाद गुंजाळ याच्या आईनेही शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करताना सदरचे प्रकरण दोघांमधील आर्थिक व्यवहारातून घडल्याचे सांगत काही कागदपत्रेही समोर आणली. त्यात रवींद्र ज्ञानदेव देशमुख या इसमाकडून 2023 मध्ये आरोपीने 32 लाख 50 हजार रुपयांची रक्कम घेतल्याचे व 2024 मध्ये राहिलेल्या रकमेची फेड करण्यासाठी नोटरीद्वारा अमोल खताळ यांच्या खासगी कार्यालयात करार झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या करारात खताळ यांचा कोठेही उल्लेख नसून त्यांची स्वाक्षरीही दिसून येत नाही. मात्र आरोपीच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या अर्जात अमोल खताळ यांनाही दोष दिल्याचे दिसून येते. आरोपीच्या आईने केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाबाबत काहीसा संभ्रम निर्माण झालेला असतानाच आरोपीने ज्याच्याकडून रक्कम घेतली व त्याला करारनामा लिहून दिला त्या रवींद्र देशमुख यांनीही सोमवारी पत्रकार परिषद घेत दोघांमधील व्यवहाराचा दाखला देत या प्रकरणात आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.

त्यातून विविध राजकीय तर्क-वितर्क लढवले जात असतानाच या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रसाद गुंजाळ याच्या चौकशीसह त्याच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून त्याने 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे खासगी स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांच्याशी मोबाईलद्वारा संभाषण झाल्यासह व्हॉट्सअॅप या सोशल प्लॅटफॉर्मवर संदेशाची देवाण-घेवाण झाल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणात खेमनर यांच्यावर संशय व्यक्त करीत पोलिसांनी त्यांना दाखल गुन्ह्यात आरोपी केले असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. हा प्रकार या संपूर्ण घटनेला कलाटणी देणारा ठरला असून संगमनेर तालुक्यात विविध राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आले आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे काम घेवून येणार्यांची संख्या मोठी आहे, त्यातील अनेकजण फोन करीत असतात. 22 ते 25
ऑगस्ट दरम्यान आमदार हल्ला प्रकरणातील आरोपी प्रसाद गुंजाळ यानेही एक-दोनवेळा ‘साहेब आहेत का?, कुठे भेटतील?’ अशी विचारणा करणारे फोन केले होते. या प्रकरणातील आरोपीशी आपली कोणतीही पूर्वओळख नसून त्याचा कोणताही मेसेज माझ्या पाहण्यात आलेला नाही. आरोपीचा मोबाईल क्रमांकही माझ्याकडे सुरक्षित नसून पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर दररोज असंख्य संदेश येत असल्याने आपल्याकडून कधीही ते बघितले जात नाहीत. दोघांमधील व्यक्तिगत व्यवहारातून घडलेल्या या प्रकरणाला नाहक राजकीय स्वरुप देवून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे, संगमनेरकर सूज्ञ आहे, आणि न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे.
भास्कर खेमनर
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे
स्वीय सहाय्यक

