सांधणदरीत कोसळून मुंबईच्या तरुणीचा मृत्यू! मैत्रिणींचा समूह आला होता पर्यटनाला; राजुर पोलीस घटनास्थळी..

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सांधन व्हॅलीतून दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास या परिसरात निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या तरुणींच्या समूहातील एका तरुणीचा पाय घसरल्याने दगडावर डोके आपटून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची तरुणी मुंबईतील दहिसरची आहे. घटनेची माहिती मिळताच राजुर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केला आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील साम्रदजवळील सांधणदरीत घडली. या घटनेत मुंबई येथून भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी मुंबईतील तरुणींचा समूह सकाळीच दाखल झाला होता. भंडारदरा धरणाचा परिसर पाहिल्यानंतर ते सर्वजण सांधण दरीत गेले. निसर्गाचा चमत्कार न्याहाळीत असतानाच त्यातील ऐश्वर्या खानविलकर (वय 24 वर्षे, रा.दहिसर, मुंबई) या तरुणीचा एका खडकावरुन पाय घसरला. त्यामुळे ती सुमारे दहा ते पंधरा फूट खाली पडली. दुर्दैवाने एका खडकावर तिचे डोके आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर तिच्यासोबतच्या मैत्रिणींसह अन्य पर्यटकांनी स्थानिक लोकांच्या मदतीने तिला दरीतून बाहेर काढले. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला होता. याबाबत राजुर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे आपल्या पथकासह सांदणदरीत दाखल झाले. मयत तरुणीचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Visits: 262 Today: 3 Total: 1103471

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *