पुनर्वसन कॉलनीतील नागरिकांना घरकुल देण्यासाठी प्रयत्न करू : आ.खताळ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील सुकेवाडी रस्त्यावरील पुनर्वसन कॉलनीतील नागरिकांना घरकुल मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन आ. अमोल खताळ यांनी या कॉलनीतील नागरिकांना दिले.

संगमनेर शहरातील नगररोड परिसरात झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे दि. १ जानेवारी १९९८ रोजी सुकेवाडी रस्त्यावर पुनर्वसन करण्यात आले होते. माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या सूचनेनुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सुकेवाडी रोड परिसरातील २० गुंठे जागेमध्ये पुनर्वसन केले होते. या जागेमध्ये आम्हाला घरकुल मिळावे अशी मागणी कॉलनीतील नागरिकांनी अनेकदा केली आहे, मात्र याबाबत कार्यवाही झाली नाही. घरकुलासोबतच या नागरिकांना नगरपालिकेकडून कुठल्याही सुविधा मिळाल्या नाही.

पुनर्वसन कॉलनी मध्ये घरकुल मिळावे, नगरपालिकेकडून या कॉलनीमध्ये विविध सुविधा मिळाव्यात यासाठी या कॉलनीतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार खताळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या प्रभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते विलास गुंजाळ यांनी पुनर्वसन कॉलनीतील नागरिकांसह आमदार खताळ यांच्यासोबत चर्चा केली. पुनर्वसन कॉलनी मधील नागरिक गेल्या २७ वर्षांपासून विविध सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्या घरकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे असे गुंजाळ यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नात आपण लक्ष घालून या नागरिकांना घरकुल मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी नागरिकांना दिले.
याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते संभाजी आव्हाड, अल्ताफ कुरेशी, रमजान पठाण, मुजफ्फर सय्यद,बशीर सय्यद, समीर अमीर शेख, हुसेन फकीर मोहम्मद शेख, जावेद तांबोळी, गफूर पिंजारी, इंतजा शेख, मेहबूबा शेख, अरमान शेख, सलमान शेख, समीर शेख, हिरा जेडगुले, पार्वता जेडगुले आदींसह कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Visits: 67 Today: 2 Total: 1107715
