घराच्या अंगणातच विवाहितेवर अत्याचार! पठारभागातील धक्कादायक घटना; पोलिसांकडून आरोपीला अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
व्यसनी असलेल्या पतीकडे आर्थिक व्यवहारातील शिल्लक रक्कम मागण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या नराधमानेे 26 वर्षीय विवाहितेला एकटीच पाहुन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पठारभागातून समोर आली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकरणाची तक्रार सोमवारी सायंकाळी दाखल झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी आरोपी किसन गफले याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या घटनेने पठारभागात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता.10) रात्री आठच्या सुमारास पठारभागातील एका वाडीवर घडला. पोखरी बाळेश्वर परिसरात राहणार्या किसन देवराम गफले याचा पठारभागातील एका वाडीवर राहणार्या तरुणाशी आर्थिक व्यवहार होता. त्याच्या वसुलीसाठी तो त्या तरुणाच्या घरी येत असतं. सदरील तरुणाला दारुचे व्यसन असल्याने त्याच्याकडून त्या पैशांची परतफेड झाली नव्हती. हा धागा पकडून किसन गफले त्याच्या घराकडे चकरा मारीत, मात्र प्रत्यक्षात त्याची नजर त्या तरुणाच्या 26 वर्षीय पत्नीवर होती. त्याचा थोडाफार अंदाज आल्याने पीडित महिला नेहमीच त्याच्यापासून सावध राहत होती.

घटनेच्या दिवशी रविवारी (ता.10) रात्री आठच्या सुमारास आरोपी किसन गफले पैसे मागण्याच्या बहाण्याने पुन्हा त्याच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्याची पत्नी घरात एकटीच स्वयंपाक करीत होती. त्याला समोर पाहताच मनात शंकेची पाल चुकचुकलेल्या त्या विवाहितेने ‘तु इथे कशाला आला आहेस?’ अशी विचारणा केली असता त्याने ‘तुझा नवरा कोठे आहे?’ असा प्रतिसवाल केला. त्यावर त्या विवाहितेने ‘माझे पती घरी नाहीत, तु येथून निघून जा’ असे सांगताच त्याच्या मनातील सैतान जागला आणि त्याने पीडितेचा हात धरुन तिला ओढण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीत तिने हिसका मारीत आपली सुटका केली व तेथून घराबाहेर पळ काढला.

मात्र अंगात वासनेचा सैतान संचारलेल्या त्या नराधमाने घराच्या अंगणातच तिच्या साडीचा पदर ओढीत तिला खाली पाडले आणि उघड्यावरच तिचे तोंड दाबून बळजबरीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. त्याची वासना शमल्यानंतर त्याने पीडितेला वाईट शब्दात शिवीगाळ करीत कोणाला काही सांगितल्यास तुझ्यासह तुझ्या नवर्याकडे पाहून घेईल अशी धमकी भरुन तो निघून गेला. या घटनेनंतर काही वेळाने पीडितेचा मोठा दीर दारुच्या नशेत तर्राट झालेल्या तिच्या पतीला घेवून घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्याची तक्रार सोमवारी (ता.11) सायंकाळी दाखल करण्यात आली.

त्यावरुन घारगाव पोलिसांनी आरोपी किसन देवराम गफले याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 64, 329 (1), (3), 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीला तत्काळ अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर करुन पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. या धक्कादायक घटनेने तालुक्याच्या पठारभागात एकच खळबळ उडाली असून आरोपी नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

