आमदार खताळ यांचा शुभेच्छा फ्लेक्स फाडला! संगमनेरात राजकीय तणाव; अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकांच्या निकालापासूनच संगमनेर शहरातील राजकारण वेगळ्या वळणावर गेले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपासह कुरघोड्या काढण्याचे प्रकारही समोर येत आहेत. त्यातच आता प्रत्येक सण-उत्सवाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून जागोजागी फ्लेक्स लावण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली असून त्यातून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या श्रावणमासाच्या निमित्तानेही तालुक्यातील सर्वच महादेव मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर फ्लेक्सचा महापूर बघायला मिळत असून त्यातील आमदार अमोल खताळ यांचा खांडगाव शिवारातील फ्लेक्स फाडला गेल्याने संगमनेरात राजकीय तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सदरचा प्रकार समोर आल्यानंतर खताळ समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला असून अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंदही करण्यात आली आहे.

तब्बल चार दशकानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघात बदल झाल्याने सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यातच आगामी कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही दृष्टीपथात आहेत. त्यामुळे मतदारांच्या मनात आपली प्रतिमा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही बाजूने आवश्यक त्या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याने कधीनव्हे ते संगमनेरचे राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघत आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवायलाही मिळत आहे.

शुक्रवारपासून (ता.25) हिंदू धर्मियांच्या पवित्र श्रावणमासाला सुरुवात झाली. संगमनेर तालुक्यात खांडगाव, धांदरफळ, निझर्णेश्वर व बाळेश्वर अशी महादेवाची चार प्रसिद्ध आणि प्राचिन देवालये आहेत. दरवर्षी श्रावणामासात महिनाभर या देवालयांचा परिसर गजबजलेला असतो. महिन्यात येणार्या चारही श्रावणी सोमवारच्या निमित्ताने परिसरात जत्राही भरत असल्याने तालुक्यातील खूप मोठा वर्ग ठिकठिकाणच्या या देवालयांमध्ये गर्दी करतो. त्यामुळे साहजिकच शहरापासून या देवालयांकडे जाणार्या रस्त्यांना अचानक अनन्य महत्व प्राप्त झाले असून श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वीच दोन्ही गटांनी मोक्याच्या जागांवर ‘शिवभक्तांना शुभेच्छा’ अशा आशयाचे असंख्य फ्लेक्स लावले आहेत.

त्यातही शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेले खांडेश्वर देवालय तर संगमनेरकरांच्या भक्तिचे प्रमुख ठिकाण. असंख्य संगमनेरकर महिनाभर खांडेश्वराच्या दर्शनाला पायी जाण्यासह दर श्रावणी सोमवारी या ठिकाणी हजारों भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळेच संगमनेर ते खांडगावपर्यंतच्या रस्त्यावर महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यासह माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सर्मथकांनी असंख्य फ्लेक्सद्वारे भाविकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यातील खांडगाव शिवारातील आमदार अमोल खताळ यांचा एक फ्लेक्स आज सकाळी फाटलेल्या अवस्थेत आढळल्याने संगमनेरात काहीसा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरुन खाली उतरल्यानंतर खांडेश्वराच्या कमानीजवळ लावलेला हा फ्लेक्स नेमका आमदार खताळ यांच्या चेहर्याजवळच फाटल्याचे दिसून आल्याने महायुतीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यातुन सकाळी काहीकाळ तणावही निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत वादळ-वार्यामुळेही अशा घटना घडण्याची शक्यता वर्तवताना कारवाईचा शब्द दिल्याने तणाव निवळला.

त्यानंतर माध्यान्नाच्या सुमारास खांडगावच्या विकास काशिनाथ अरगडे यांनी दीपक गुंजाळ व सुनील रुपवते यांच्यासह शहर पोलीस ठाण्यात येवून गेल्या गुरुवारी (ता.24) सकाळी दहा वाजता सदर ठिकाणी लावलेला फ्लेक्स कोणीतरी अज्ञात व्यक्तिने फाडल्याची तक्रार दाखल केल्यावरुन पोलिसांनी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 324 (2) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या घटनेने महायुती आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

