राजकीय महत्त्वकांक्षांपेक्षा परिवार खूप महत्त्वाचा! आमदार सत्यजीत तांबे यांची स्पष्टोक्ती; मामासोबत राजकीय कटुतेच्या चर्चांना पूर्णविराम..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नऊ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांच्या संशयीत भूमिकेतून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. तेव्हापासून थोरात-तांबे परिवारातील राजकीय कटुताही शिगेला गेल्याच्या वेगवेगळ्या वावड्या उठवण्यात आल्या. मात्र यासर्व गोष्टी ‘वायफळ’ असल्याचे आता ठळकपणे स्पष्ट झाले असून खूद्द आमदार सत्यजीत तांबे यांनीच याबाबत सविस्तर मतप्रदर्शन करताना तांबे पिता-पूत्राचा राजकारणातील प्रवेशच बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय मदतीसाठी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यातील मामा-भाच्याच्या या दिग्गज जोडीतील राजकीय कटुतेवरुन सुरु असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.


याबाबत एका यू-ट्यूबवाहिनीशी बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांना विचारलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्याभोवती जमवले गेलेले संशयाचे मळभ दूर सारले. आपल्यात आणि आपले मामा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात कोणताही पारिवारीक अथवा राजकीय दुरावा नसल्याचे ठासून सांगताना त्यांनी आपण कधीही मामांच्या पुढे गेलो नाही आणि जाणारही नाही हे आपल्या जीवनाचे तत्त्व असल्याचे स्पष्ट केले.


आपल्या राजकीय महत्त्वकांक्षेपेक्षाही आपला परिवार खूप महत्वाचा आहे. ज्या दिवशी राजकारणात पाऊल ठेवले त्या दिवशीच ही गोष्ट स्पष्ट होती. त्यामुळे आपण यापूर्वी कधी आणि यानंतरही कधी ‘लाईन क्रॉस’ करणार नाही असे त्यांनी सांगितले. मुळातच आपले वडील डॉ.सुधीर तांबे आणि आपला राजकारणातील प्रवेश माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय मदतीसाठीच झाला आहे. त्यामुळे साहजिकच आमच्यापेक्षा त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेला अधिक महत्त्व असून या गोष्टी आमच्या मनात सुरुवातीपासूनच स्पष्ट असल्याने आमच्यात कोणत्याही प्रकारचा दुरावा निर्माण होवू शकत नाही असेही आमदार तांबे यांनी ठासून सांगितले.


काहीवेळा राजकीय टीका-टिपणीतून काही गोष्टी घडत असतील, तो वेगळा भाग आहे. मात्र त्याचा आमच्या पारिवारीक अथवा राजकीय संबंधावर कोणताही परिणाम झालेला नाही. थोरात साहेब आपल्या वडीलांच्या स्थानी असून त्यांच्याशी अतिशय प्रेमाचे संबंध आहेत व भविष्यातही ते तसेच कायम राहतील असेही त्यांनी ठळकपणे नमूद केले. 2023 मध्ये पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून राजकीय ‘संशय’ बळावलेल्या आमदार तांबे यांनी यामागील सर्व चर्चांना धुडकावत राजकीयदृष्ट्या आपण आजवर कधीही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची ‘लाईन क्रॉस’ करुन काही केले नाही आणि यापुढील काळातही आपल्याकडून असे काहीच घडणार नाही याचा पुनरुच्चार करताना त्यांनी आपल्याभोवती गोळा झालेले संशयाचे सर्व मळभ दूर हटवले.


भाजपच्या आणि विशेष करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष विजय मिळवल्यापासूनच आमदार सत्यजीत तांबे राजकीय संशयाच्या भोवर्‍यात अडकले होते. त्यानंतरच्या कालावधीतही त्यांची मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक वारंवार समोर आली. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी थोरात यांच्या प्रचार व्यवस्थेकडून मिळालेल्या कार्यक्रमाशिवाय अन्य राजकीय कार्यक्रमांपासून अंतर ठेवल्याने आणि त्यातच थोरात यांचा अनपेक्षित पराभव झाल्याने त्याचे खापरही आमदार तांबे यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या निवडणुकीनंतरही त्यांनी थेट सरकारच्या धोरणांवर टीका टाळण्याचे सत्र कायम ठेवल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही सुरु झाल्या. मध्यंतरीच्या काळात तर, सोशल माध्यमातून काहींनी त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही जाहीर केल्याने राज्यात राजकीय वावटळंही उठली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यातून ती ‘राजकीय धूळ’ असल्याचे उघड झाले असून मामांना ओलांडून जाणार नाही हे भाच्याने ठासून स्पष्ट केले आहे.


गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजीत तांबे यांनी स्थानिक काँग्रेसच्या सचिवपदापासून युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत संघटनात्मक जबाबदार्‍या यशस्वीपणे पेलल्या. दरम्यानच्या काळात त्यांना दोनवेळा अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करण्याची संधीही मिळाली. दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी वडीलांच्या जागी आपल्याला उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली होती. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्ष त्यावर निर्णय घेवू शकला नाही. परिणाम नाशिकची जागा महाविकास आघाडीला गमवावी लागली. तांबे पिता-पूत्राच्या या भूमिकेमुळे काँग्रेसने दोघांचेही पक्षातून निलंबन केले, जे आजही कायम आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा तब्बल चार दशकानंतर पराभव झाल्याने त्याचे खापर सत्यजीत तांबे यांच्या माथी मारुन काहींनी त्यांना पद्धतशीर राजकीय बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र त्यांनी मुंबईत केलेल्या वरील वक्तव्याने गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या भोवती जमा झालेले संशयाचे ढग निवळण्यासह त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळाला आहे.

Visits: 312 Today: 3 Total: 1100457

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *