संगमनेरच्या फ्लॉवरला परराज्यातून मोठी मागणी! चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आनंदी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला इतरत्र कवडीमोल भाव असतांना संगमनेरात मात्र शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या फ्लॉवरला चांगला दर मिळत असल्याने फ्लॉवर उत्पादक शेतकरी आनंदात आहेत.

सध्या तालुक्यातील समनापुर फाटा तसेच साकुर हे गाव फ्लॉवर चे हब बनले आहे. संगमनेर आणि साकुर येथील फ्लॉवरची दिल्ली, जयपुर, ग्वाल्हेर, गोरखपुर, लखनऊ, भोपाल, बनारस, कानपूर, अहमदाबाद, पटना या परराज्यातील शहरात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहे. अनेक राज्यातील व्यापारी संगमनेर येथे फ्लॉवर खरेदी करण्यासाठी येत असतात. येथील फ्लॉवरला अनेक ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. साकुर भागात माळराणावरील मुरमाट जमिनी असल्याने साकुर येथील शेतीमालाला जास्त मागणी होत आहे. यावर्षी फ्लॉवरला २० रुपयापासून ते ३५ रुपये पर्यंत भाव असल्याने अनेक शेतकरी समाधानी आहेत. अजूनही फ्लॉवरला साकुर येथे २२ ते २५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे तसेच संगमनेरला १८ ते २० रुपये किलो प्रमाणे भाव मिळत आहे.संगमनेरच्या तुलनेत साकुरच्या मालाला जास्त मागणी असते.

कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेर शहराच्या पूर्वेला असणाऱ्या समनापुर चौफुली परिसरात फ्लॉवर खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने अवास्तव उभे असतात. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. संगमनेर बाजार समितीने फ्लॉवरच्या खरेदी विक्रीसाठी वडगाव पान येथे जागा उपलब्ध करून दिली असतानाही व्यापारी आणि शेतकरी समनापुर येथेच माल खरेदी विक्री साठी येत असल्याने येथील रस्त्यावर तुंबळ गर्दी असते, त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी येथील खरेदी विक्री बंद करून ती वडगाव पान उपबाजार आवारात सुरू करावी अशी मागणी होत आहे.

Visits: 136 Today: 3 Total: 1108940
