आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून   ७ शाळांना ८७ लाख ५० हजार रुपये मंजूर

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक गुणवत्तेच्या होण्यासाठी संगमनेर तालुक्यात विशेष योजना राबवण्यात आली असून आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून तालुक्यातील सात शाळांना ८७ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सहकार, शिक्षण, व्यापार, शेती यांसह विविध विकास कामांमध्ये राज्यात अग्रगण्य म्हणून ओळखला जातो. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे महत्त्वाचे माध्यम असल्याने ग्रामीण शिक्षणावर अधिक भर देण्याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विविध योजना राबवल्या आहेत.हाच वारसा पुढे नेताना आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सह विविध शाळांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून निधी देऊन सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. याचबरोबर नव्याने जिल्हा नियोजन समितीतून जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत तालुक्यातील सात शाळांना प्रत्येकी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे.या निधी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली, पेमगिरी, येळोशी, पारेगाव खुर्द, समनापुर, मालदाड, घोडमाळ वस्ती तळेगाव दिघे या शाळांना प्रत्येकी १२ लाख ५० हजार रुपयांचा  निधी मिळाला असून त्यातून शाळा खोल्या इमारतींची कामे केली जाणार आहेत. यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यातील शाळांना हा निधी मिळवून दिल्याबद्दल पेमगिरी, येळोशी, समनापुर, मालदाड ,तळेगाव दिघे, पारेगाव खुर्द या गावातील नागरिकांनी आ.सत्यजित तांबे यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत.

प्राथमिक शिक्षण अधिक गुणवत्तेचे होणे गरजेचे : आ.तांबे
प्रत्येकाच्या प्रगतीमध्ये शिक्षणाचे अत्यंत मोठे योगदान असून प्राथमिक शिक्षण हा पाया आहे.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अनेक गुणवंत विद्यार्थी निर्माण होत आहेत. यासाठी चांगल्या सुविधांसह नवीन तंत्रज्ञानाचा वापरही जिल्हा परिषद शाळेमध्ये केला गेला पाहिजे. यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळेंना व प्राथमिक शिक्षणासाठी अधिकचा निधी दिला पाहिजे. भाषा यावर वाद करण्यापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
Visits: 77 Today: 2 Total: 1101296

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *