साकुरला महाराजस्व अभियानास नागरिकांचा प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, साकुर
महाराष्ट्र शासन तसेच महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राज्यभर राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील साकुर मंडलांतरर्गंत येणाऱ्या गावांसाठी येथील तलाठी कार्यालयात या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना सुलभपणे देता यावा यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले.या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्रांसह विविध दाखले तसेच श्रावणबाळ, संजय गांधी निराधार  इत्यादी योजना व ॲग्रीस्टॅक नोंदणी, पीएम किसान योजना, फेरफ़ार नोंदीसाठी अर्ज स्वीकृती, जिवंत ७/१२ मोहीम, वारस नोंदी वगैरे व भो. वर्ग २ जमिनीचे भो. वर्ग १ मध्ये रुपांतर करणे आदि योजनांचा समावेश होता.
 शिबीर यशस्वी करण्यासाठी महसुल विभागाच्या वतीने मंडलाधिकारी वनिता सातपुते, ग्राम महसुल अधिकारी सोमनाथ शेरमाळे, अभिषेक गोर्डे, लक्ष्मण गोंदके, बी. पारधी, कोतवाल शिवा कातोरे यांनी परिश्रम घेतले.भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात दाखल्यांचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले.
या अभियानाच्या पार्श्वभूमीवर  विविध प्रकारचे दाखले प्राप्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या अभियानामुळे तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्याचा नागरिकांचा त्रास वाचला आहे. असा उपक्रम पुन्हा राबवण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Visits: 75 Today: 1 Total: 1099302

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *