‘ती’ शस्त्र फिर्यादी व साक्षीदारांच्या धाकासाठीच! संगमनेरचे ‘लव्ह जिहाद’ प्रकरण; मुख्य सूत्रधाराचा जामीन रद्द..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
हिंदू मुलींना फसवून त्यांचे बळजबरीने अपहरण, धर्मांतरण आणि निकाह लावणारी टोळी तयार करणार्या आणि या मोहीमेअंतर्गत पठारभागातील एका अल्पवयीन मुलीला फसवून वयात येताच तिचे अपहरण आणि अत्याचार घडवून आणण्याच्या प्रकरणातील सूत्रधार युसुफ दादा चौगुले याचा जामीन अखेर रद्द करण्यात आला आहे. घटनेपासून तब्बल नऊ महिने कारागृहात असलेल्या आरोपीला दोन महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळाला होता. मात्र त्यानंतर लागलीच त्याने मध्यप्रदेशमध्ये जावून शस्त्र खरेदी केली आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे त्याच्याकडून न्यायालयाच्या अटींचा भंग झाल्याचा ठपका ठेवताना घारगाव पोलिसांनी त्याचा जामीन रद्द करण्याबाबत संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरील सविस्तर सुनावणीत सरकारी पक्षाने जोरदार युक्तिवाद करताना शस्त्र खरेदीमागील आरोपाचा हेतू सिद्ध करण्यात यश मिळवल्याने अतिरीक्त जिल्हा न्यायाधिश दिलीप घुमरे यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून मंजूर झालेला जामीन रद्द करीत आरोपीला तत्काळ न्यायालयीन कोठडीत घेण्याचे आदेश दिले आहेत.
पठारभागातील एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीला मंचर बसस्थानक परिसरात बोलावून गेल्यावर्षी 7 जुलैरोजी आरोपी युसुफ दादा चौगुले याने शादाब रशीद तांबोळी याच्या माध्यमातून तिचे अपहरण केले होते. या प्रकरणात सुरुवातीला चौगुलेने स्वतःची कार वापरली. त्यानंतर शादाबसह अपहृत तरुणीला अन्य साथीदारांच्या मदतीने मुंबईला पाठवून तेथे तिचे बळजबरीने धर्मांतरण घडवून तिचा निकाह लावून देण्यात आला. त्यानंतर सलग तीन दिवस आरोपी शादाब तांबोळी याने मुंबईत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या प्रकरणावरुन संगमनेर तालुक्यात जातीय तणाव निर्माण झाल्याने 10 जुलैरोजी आरोपी शादाब पीडित तरुणीसह घारगाव पोलिसांना शरण आला. मात्र या कालावधीत अपहृत तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
स्वास्थ मिळाल्यानंतर 27 जुलैरोजी पीडित तरुणीने घारगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सहाजणांवर अपहरण, अत्याचार, मारहाण, धमकी अशा वेगवेगळ्या कारणांसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याच दिवशी या प्रकरणाचा सूत्रधार युसुफ दादा चौगुले याला श्रीरामपूरातून अटक केली. तेव्हापासून गेल्या 22 एप्रिलपर्यंत सलग नऊ महिने तो कारागृहातच कैद होता. जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने त्याला कडक समज देत अटी व शर्तींच्या अधिन राहून कोणताही गुन्हा करणार नाही या बोलीवर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर अवघ्या 20 दिवसांतच त्याला मोठ्या प्रमाणात शस्त्रांची तस्करी करताना मध्यप्रदेशात अटक झाल्याने एकंदरीत या प्रकारातून मोठे गांभीर्य उभे राहीले होते.
गेल्या 16 मे रोजी मध्यप्रदेश पोलिसांनी युसुफ चौगुलेसह राहुल वसंत आढाव व गणेश चंद्रभान गायकवाड यांच्यावर शस्त्रतस्करीची कारवाई केल्याचे समजल्यानंतर संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, घारगावचे निरीक्षक विलास पुजारी यांनी वरला (जि.बडवाणी) पोलिसांशी संपर्क साधून माहिती आणि कागदपत्रांची देवाणघेवाण केली. त्यानंतर पोलिसांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात लव्ह जिहाद प्रकरण, त्यावर सर्वोच्च न्यायालयातून मिळालेला जामीन, त्यातील शर्ती, मध्यप्रदेश पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आणि पोलिसांचे म्हणणे असा सविस्तर अहवाल सादर केला. त्यावरुन न्यायालयाने आरोपी युसुफ चौगुले याला नोटीस बजावून म्हणणे सादर करण्यास सांगितल्यानंतर त्याने आपली बाजू मांडण्यासाठी संगमनेरच्या न्यायालयात विधिज्ञही दिला.
सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष या दोघांनीही संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. यावेळी सुरुवातीला बचाव पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला जामीन रद्द करण्याचा या न्यायालयाला अधिकार नसल्याचा आणि मध्यप्रदेशामध्ये झालेल्या कारवाईशी आरोपीचा संबंध नसल्याचाही दावा करण्यात आला. मात्र सरकारी पक्षाने विविध दाखल्यांसह तो खोडल्यानंतर आरोपीकडून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दबाव निर्माण केल्याने पोलिसांनी जामीनअर्ज रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याचा व घारगाव पोलीस एका ‘समुदाय विशेष’ला लक्ष्य करीत असल्याचा मुद्दाही तापवला गेला, मात्र न्यायालयाने तो देखील फेटाळला. या प्रकरणातील पीडिताही न्यायालयासमोर हजर झाली व तिनेही आरोपीच्या जामीनाला विरोध करताना आरोपी प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे व त्याच्याकडून तक्रार मागे घेण्याबाबत वारंवार धमकावले जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आरोपीने आपल्यावर धाक निर्माण करण्यासाठीच गावठी कट्टे खरेदी केल्याची बाबही पीडितेने न्यायालयासमोर सांगितली.
दोन्ही बाजूचा सविस्तर युक्तिवाद, पीडितेची बाजू ऐकल्यानंतर अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश दिलीप घुमरे यांनी आरोपीचा जामीनअर्ज रद्द करीत असल्याचा निर्णय जाहीर केला. या शिवाय आरोपी युसुफ दादा चौगुले याला तत्काळ ताब्यात घेवून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेशही दिले. आरोपीला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यातून घेण्यासाठी आणि त्याला संगमनेरच्या न्यायालयीन कोठडीत डांबण्यासाठी आवश्यक असलेले ‘प्रॉडक्शन वॉरंट’ही जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले, त्यामुळे संगमनेरच्या लव्ह जिहाद प्रकरणाचा सूत्रधार युसुफ दादा चौगुले याला आता या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत गजाआडच रहावे लागण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात त्याच्या विरोधातील आरोपपत्र यापूर्वीच न्यायालयात दाखल झालेले आहे.
गेल्यावर्षी 7 जुलै 2024 रोजी घडलेल्या या प्रकरणाची तक्रार 27 जुलैरोजी दाखल झाल्यानंतर त्या दिवशी आरोपी युसुफ दादा चौगुले याला घारगाव पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता. या दरम्यान त्याने संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयासह छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठातही जामीनासाठी विनवणी केली, मात्र ती फेटाळण्यात आली. त्या विरोधात त्याने फेब्रुवारी 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने त्याच्या अर्जावर विचार करताना योग्य त्या अटी व शर्तींसह त्याला 22 एप्रिल रोजी सशर्त जामीन मंजूर करताना अटी व शर्तींसाठी ट्रायल कोर्टात जाण्यास सांगितले होते. त्यानुसार संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयानेच त्याला जामीन दिला होता. आता याच न्यायालयाने अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी त्याचा जामीन रद्द केला आहे. त्यामुळे प्रस्तूत प्रकरणाच्या निकालापर्यंत त्याला कारागृहातच खितपत पडावे लागण्याची शक्यता आहे.