आदिम जमातीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या : आ.डॉ. लहामटे

नायक वृत्तसेवा, अकोले 
आदिम जमातीतील कातकरी, ठाकर, पारधी समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी मुलांच्या वसतीगृह प्रवेशात प्राधान्य द्यावे असे आवाहन राजुर येथे आयोजित बैठकीत आ. डाॅ.किरण लहामटे यांनी केले.
शासकीय व अनुदानित आश्रमशाळा अकोले तसेच जिल्ह्यातील  आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सोईसुविधांबाबत आश्रम शाळेतील मुख्याध्यापक गृहपाल व वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक शनिवारी तालुक्यातील राजुर येथील प्रकल्प कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.सदर आढावा बैठकीत आदिम जमातीतील कतकरी, ठाकर, पारधी समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी मुलांच्या वसतीगृह प्रवेशात प्राधान्य द्यावे असे आवाहन  आयोजित बैठकीत आ. डाॅ.किरण लहामटे यांनी केले.सदर आढावा बैठकीत शासकीय आश्रम शाळेतील गरम पाण्याची सुविधा,विद्यार्थी प्रमाणात संडास, बाथरूम या  पायाभूत सुविधांबाबत तसेच दर्जेदार शासननियमानुसार भोजन देणे,चांगल्याप्रकारची विद्यार्थी निवास व्यवस्था, विद्यार्थी सुरक्षा, या बाबत शासकीय व अनुदानित आश्रम शाळानिहाय आढावा घेण्यात आला.
आदिवासी आश्रम शाळेसाठी नेमलेले वैद्यकीय पथक व ॲब्युलन्स सेवा सदैव तत्पर ठेवून मुलांना स्थानिक पातळीवर तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे व औषधोपचार मिळणेबाबत वैद्यकीय पथकाने फक्त आश्रमशाळेवरच लक्ष केंद्रित करणे विषयी उपस्थित वैद्यकीय पथकांना अवगत केले तसेच एकाही आश्रमशाळेतील विद्यार्थी वैद्यकीय सुविधांपासून वंचित रहाणार नाही या बाबत खबरदारी घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. शहरी भागातील आदिवासी मुला-मुलींच्या वसतीगृहांच्या प्रवेश क्षमतेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा.असे आ. डॉ.लहामटे यांनी सुचित केले.कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित ठेवू नये असेही आवाहन आढावा बैठकीत करण्यात आले.तसेच वसतीगृहात विद्यार्थी शिस्तबद्ध कसा राहील यासाठी गृहपालांनी प्रयत्न करुन संघटनात्मक राजकारणापासून वसतीगृह विद्यार्थी वेगळे कसे रहातील यासाठी गृहपालांनी वसतीगृह परीसरात असणे आवश्यक असल्याचे आ. डाॅ.किरण लहामटे यांनी सांगितले.आढावा बैठकीसाठी राजूर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी  देवकन्या बोकडे, दिपक कालेकर, मनोजकुमार पैठणकर, तुषार पवार, हे सहा.प्रकल्प अधिकारी, सुनिल मोरे, शाम कांबळे हे कार्यालयीन अधिक्षक, लेखाधिकारी संजय सोनवणे तसेच विविध विभागाचे कर्मचारी,वैद्यकीय विभागाचे अधिकारी,  जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित आश्रम शाळांचे मुख्याध्यापक,  सर्व आदिवासी मुला-मुलींचे वसतीगृहाचे  गृहपाल उपस्थित होते.
आढावा बैठकीत आ. डॉ. लहामटे यांनी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी उपस्थित ठेवावेत. सर्व विद्यार्थी, पालक यांना संपर्क साधावा. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांना निमंत्रित करण्यात यावे. नवागतांचे स्वागत अभिनव पद्धतीने करण्यात यावे असे सूचित करून आश्रमशाळेतील व वसतीगृहातील सोईसुविधांबाबत आढावा घेण्यात आला.
Visits: 199 Today: 1 Total: 2168793

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *