नायक वृत्तसेवा, धांदरफळ
महिलांनी चूल आणि मूल त्याच बरोबर मोबाईल मध्ये गुंतून न राहता समाज विकासासाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या तथा स्वदेश महिला मंचच्या अध्यक्षा संगीता बाळासाहेब देशमाने यांनी केले.
दंडकारण्य वृक्षसंवर्धन अभियानांतर्गत  माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा  डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे निशा कोकणे, प्राजक्ता  घुले, संगीता देशमाने व सरपंच उज्वला देशमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व ग्रामपंचायत महिला सदस्य मंडळ तसेच महिलांनी ‘उत्सव नारीशक्तीचा, सोहळा सौभाग्य दिनाचा’ या कार्यक्रमात सहभाग नोंदवत वटवृक्षाची पूजा करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संगीता देशमाने बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या की, वृक्ष आणि महिला यांचे अतूट नाते आहे. या माध्यमातून गेल्या अकरा वर्षापासून स्वदेश महिला मंच विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमातून महिला, युवक, युवती यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. वटपौर्णिमा उत्सव साजरा करतांना ज्या वृक्षाला सात वर्षांपूर्वी घरातल्या कुंडीतून रामेश्वर मंदिर परिसरामध्ये ज्याचे रोपण केले, त्या वृक्षाच्या सावलीत महिला एकत्र खाली बसू शकतात,या पाठीमागची संकल्पना हीच आहे की, महिलांनी चूल आणि मूल, त्याचबरोबर मोबाईल यामध्ये गुंतून न राहता समाज विकासासाठी आपले योगदान द्यावे.  जागतिक तापमान वाढीचा धोका लक्षात घेऊन महिलांनी घराच्या गच्चीवर किंवा मोकळ्या जागेत परसबागेत छोटे छोटे वृक्ष लावून आपल्या कुटुंबांना सेंद्रिय भाजीपाला अथवा जे आयुर्वेदिक वृक्ष आहे त्यांचे रोपण करावे. वट वृक्षासारखा वृक्ष हा सर्वाधिक जास्त ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे, म्हणून वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने  रामेश्वर मंदिर परिसरात हा वृक्षारोपणाचा संवर्धन सोहळा म्हणजेच आपण लावलेल्या वृक्षाच्या छायेमध्ये बसून ऑक्सिजन घेणे म्हणजे आनंद सोहळा असल्याचे त्या म्हणाल्या. वृक्षारोपणाशिवाय जीवन अधुरे आहे.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संत तुकारामांच्या अभिवाचनाप्रमाणे वृक्ष  खऱ्या अर्थाने आपले चांगले मित्र होऊ शकतात आणि आपल्याला जीवनदान देऊ शकतात, यासाठी वृक्षारोपण केले पाहिजे. यासाठी धांदरफळ ग्रामपंचायत व दंडकारण्य मोहिमेमध्ये सहभाग घेऊन माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच उज्वला देशमाने, महिला सदस्यां, रामेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ, मालपाणी उद्योग समूह यांच्या माध्यमातून  हा वृक्षारोपण सोहळा संपन्न होत असल्याचे संगीता बाळासाहेब देशमाने यांनी सांगितले.