पंतप्रधान देशाला उद्देशून बोलणार म्हटल्यावर लोकांना भीती वाटते ः वाड्रा उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांनी साईबाबांचे घेतले दर्शन; माध्यमांशी साधला संवाद

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबांची शिकवणूक आणि राहुल गांधी यांची विचारसरणी एकच आहे. ते देशातील सामान्य लोकांच्या आकांक्षाचे प्रतीक आहेत. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे देशाची प्रगती आणि नव्या तंत्रज्ञानाबाबतचे स्वप्न ते पूर्ण करतील. केंद्र सरकारच्या अपयशाबाबत बोलतो म्हणून आम्हाला ट्रोल केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून बोलणार ही बातमी कळताच लोकांना भीती वाटते, अशी टीका उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांनी केली.

रविवारी (ता.30) त्यांनी येथे येऊन साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, सुमित शेळके, माजी नगरसेवक सचिन चौगुले, शहर उपाध्यक्ष अमृत गायके, श्रीकांत अहिरे आदी उपस्थित होते.

वाड्रा म्हणाले, मोदी देशाला संबोधून काही बोलणार असे जाहीर झाले की लोकांना भीती वाटते. आता आपल्यापुढे आणखी काय वाढवून ठेवले असे लोकांना वाटते. याउलट स्व. राजीव गांधी यांच्यावर लोकांनी मनापासून प्रेम केले. त्यांच्या भोवताली लोकांचा गराडा असायचा. त्यांनी देशात नवे तंत्रज्ञान आणले त्यातून देशाची प्रगती साधली. राहुल यांच्या पदयात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. त्यात महिलांची संख्या लक्षणीय असते. बेरोजगारी आणि महागाई असे अनेक प्रश्न देशासमोर आहेत. राहुल लोकांना सोबत घेऊन पुढे निघाले आहेत. त्यातून आज ना उद्या परिवर्तन होणार आहे. आम्हाला त्याबद्दल विश्वास वाटतो आहे. आम्ही केंद्र सरकारच्या अपयशा बाबत बोलतो म्हणून आम्हाला ट्रोल केले जाते. राहुल, प्रियंकासह आम्ही सर्वजण एकत्र आहोत. या ट्रोल केले जाते याची फिकीर न करता एकत्र राहून बोलत राहू. राहुल गांधी यांच्या सोबत लोक आहेत. आमचे काम यापुढेही सुरूच ठेवणार आहोत. लोकांचे प्रश्न हाती घेऊन राहुल संघर्ष करीत आहेत. त्यांना जनसमर्थन लाभते आहे, असेही ते म्हणाले.
