अवकाळी पावसाने केली पालिकेच्या विकास कामांची पोलखोल! प्रशासकांनी लावली शहराची वाट; पाणी वाहून नेणारी व्यवस्था ठरली कुचकामी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवडाभरापासून संगमनेर शहर व उपनगरात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने पालिकेच्या विकासकामांची पोलखोल केली आहे. प्रशासक राजमध्ये सर्वाधिकार हाती आलेल्या मुख्याधिकार्यांनी नियोजनशून्य पद्धतीने एकामागून एक विकासकामांचा सपाटा लावला. मात्र त्यातून सामान्य संगमनेरकरांना दिलासा मिळण्याऐवजी मनस्तापच सहन करावा लागत असल्याचे चित्र अवकाळीच्या निमित्ताने शहराच्या प्रत्येक रस्त्यावर आणि गल्लीबोळात बघायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे कोट्यवधीचा खर्च करुन शहरातील भूयारी गटारांची कामे झाल्यानंतर प्रशासकांना उपरती झाल्याने अवघ्या काही दिवसांतच दुसर्यांदा रस्ते खोदण्यात आले व त्यात पावसाचे पाणी वाहून नेणार्या व्यवस्थेच्या नावाखाली थातूरमातूर पाईप गाडून प्रत्येक घरापुढे स्वतंत्र चेंबर काढले गेले. त्यातून रस्त्यावरुन वाहणार्या पाण्याचा निचरा होणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवकाळी पावसाच्या पाण्यात चेंबरच बुडाल्याने सदरील यंत्रणा पूर्णतः कुचकामी ठरल्याचेही स्पष्ट झाले आहे. या शिवाय पावसाळा तोंडावर असूनही खोदलेल्या प्रमुख रस्त्यांसह काही अंतर्गत रस्त्यांची कामे अद्यापही अर्धवट असल्याने सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करुन चिखल तुडवावा लागत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांचा वापर करणारा प्रत्येकजण पालिकेच्या नावाने बोटं मोडीत असून प्रशासकांनी विकासाच्या नावाखाली शहराची वाट लावल्याचा आरोपही आता होवू लागला आहे.

संगमनेरसह राज्यातील 248 नगरपालिकांमधील लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होवून आता चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. संगमनेरच्या पालिकेवर डिसेंबर 2021 पासून प्रशासकांचे राज्य असून आजवरच्या त्यांच्या कारकीर्दीत विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधीचा चुराडा केला गेला आहे. मात्र त्यातून सामान्य करदात्याला कोणताही दिलासा मिळाला नसून उलट पालिकेच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराने मोठा मनस्ताप सहन करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे विद्यमान प्रशासक तथा मुख्याधिकार्यांच्या कारकीर्दीत कचर्याच्या विलगीकरणापासून सुरु झालेला त्रास आता पाण्याचे डबके आणि चिखलाने माखलेल्या रस्त्यांपर्यंत येवून पोहोचला आहे. मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक नसलेल्या प्रशासकांनी नागरी त्रासाकडे डोळेझाक सुरु केल्याने शहरात त्यांच्याविषयी संताप निर्माण झाला आहे. कोट्यवधीचा खर्च करुनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने पालिकेचा कारभारही चव्हाट्यावर आला असून शहराचे मालक झालेल्या मुख्याधिकार्यांबाबत संशयही निर्माण झाला आहे.

अतिक्रमणांची भरमार असलेल्या नवीन नगररस्त्यावरुन वाहणार्या नाल्यावर बेसुमार अतिक्रमणं झाली आहेत. त्यामुळे या नाल्याचा प्रवाह भर टाकून संकुचित केला गेल्याने दरवर्षी पावसाळ्यात या संपूर्ण रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त होते. त्यातून आजवर अनेकदा या रस्त्यावरील व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरुन मोठे आर्थिक नुकसान झाल्याचीही असंख्य उदाहरणे आहेत. मात्र अतिक्रमणांबाबत आणि ओढ्या-नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहातील अडथळ्यांबाबत पालिकेकडे कोणतेही शाश्वत पर्याय नसल्याने दरवर्षी होणारा हा त्रास आजही कायम आहे. विशेष म्हणजे दीड-दोन महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करीत पालिका प्रशासकांनी या रस्त्याच्या कामाला हात घालून सुरुवातीला गटाराचे व त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा रस्ता फोडून पावसाचे पाणी वाहून नेणार्या वाहीन्यांची कामे उरकली.

नियोजनशून्य पद्धतीने करण्यात आलेल्या या कामानंतर अनेक दिवस खोदलेला रस्ता तसाच राहील्याने वाहनांच्या वर्दळीतून धुळीचे प्रचंड लोळ उठून अनेकांना श्वसनाचे आजार जडले तर व्यावसायिकांचे नुकसानही झाल्याने त्यांचा संतापही अनावर झाला. त्यानंतर विलंबाने पालिकेकडून अवघ्या एका बाजूचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येवून उर्वरीत संपूर्ण रस्ता तसाच सोडून देण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असतानाच आता अवकाळी पावसाने पालिकेच्या कथीत पावसाचे पाणी वाहून नेणार्या वाहीन्यांची पोल खोलली आहे. गेल्या आठ दिवसांपासून नियमितपणे सुरु असलेल्या पावसाने या रस्त्याचे वारंवार ओढ्यात रुपांतर होत असून पाऊस सुरु असताना चक्क रस्त्यावरुन गुडघाभर पाणी वाहत आहे. त्यातून भरधाव जाणार्या वाहनांमुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाण्याचे फवारे उडून शाब्दीक चकमकी आणि भांडणंही नित्याची झाली आहेत. आश्चर्य म्हणजे या रस्त्यावरही पावसाच्या पाण्यासाठी ‘विशेष’ व्यवस्था केली गेली आहे. मात्र प्रत्यक्ष पावसात त्याचेही पितळ उघडे पडले आहे.

अशीच अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ते जूना कटारिया कॉर्नर आणि शारदा पतसंस्थेपासून बाजारपेठेतील रस्त्यावरही बघायला मिळत असून पाऊस सुरु असताना नूतन रस्त्यांवरुन वाहणारे प्रचंड पाणी आणि उघडल्यानंतर जागोजागी साचलेल्या तळ्यांमध्ये सामान्य नागरिकांच्या करातून जमा झालेले कोट्यवधी रुपये डोळ्यादेखत बुडताना बघण्याची वेळ सामान्यांवर आली आहे. याशिवाय नवीन अकोले बायपास रस्त्याचे काम तर गेल्या चार महिन्यांपासून सुरु असूनही हा रस्ता आजही डांबरीकरणाशिवाय अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य असून परिसरात राहणार्या दाट लोकसंख्येला नाहक त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातंर्गत रस्त्यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नसून गटार अथवा पावसाच्या पाण्यासाठी खोदून ठेवलेले काही रस्ते आजही माती आणि मुरुम टाकून बुजवल्याच्या अवस्थेतच आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याने अशा रस्त्यांवर प्रचंड चिखल निर्माण झाला असून पादचारी, विद्यार्थी, महिला आणि वाहनचालकांना कसरत करीत मार्ग काढण्याची वेळ आली आहे.

एकंदरीत प्रशासकांच्या राज्यात शहरात वारंवार केली जाणारी गटारांची कामे आणि कथीतरुपाने पावसाचे पाणी वाहून नेणारी व्यवस्था पूर्णतः कूचकामी ठरली असून प्रशासकांनी मिळालेल्या संधीचे ‘सोनं’ करीत ठेकेदारांशी संगनमत केल्याचे उघड आरोप आता होवू लागले आहेत. त्यातूनच संबंधित ठेकेदारांनी पूर्ण कामाची निविदा भरुनही महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही एकही कामं पूर्ण केल्याचे दिसून येत नाही. त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य माणसांनाच भोगावे लागत असल्याने शहरात प्रशासकांच्या कारभाराबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. संगमनेर तालुक्यातील विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी एकीकडे चढाओढ लागलेली असताना दुसरीकडे पालिका प्रशासक मनमानी पद्धतीने नागरिकांना त्रास देण्याचा उद्योग करीत असूनही लोकप्रतिनिधी त्यावर काहीच बोलत नसल्याने आश्चर्यही निर्माण झाले आहे.

अर्धवट कामांना आचारसंहितेचा फटका!
नवीन नगररोड, अकोले बायपास रस्ता या प्रचंड रहदारीच्या रस्त्यांसह शहरातील अनेक भागातील रस्त्यांची कामे आजही अर्धवट आणि अपूर्णावस्थेत आहेत. अवकाळी पाऊस थांबताच प्रलंबित असलेली सर्व कामे पूर्ण केली जातील असे राजकीय आश्वासनही पालिका प्रशासकांकडून दिले जात आहे. मात्र सध्या सुरु असलेला अवकाळी पाऊस पुढे महिना अखेरपर्यंत सुरु राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर आठवडाभरातच मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रस्ते खोदणे अथवा त्यांचे डांबरीकरण करण्याची कामे अशक्य आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचेही आदेश दिलेले असल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पालिका प्रशासकांकडे अवकाळीनंतर मान्सूनच्या आगमनापर्यंतचा मर्यादित कालावधी शिल्लक राहणार असून त्या कालावधीत नियोजन करुनच अर्धवट व अपूर्ण कामे पूर्ण करावी लागणार आहेत, मात्र प्रशासकांचा एकूण कारभार पाहता संगमनेरकरांना त्यातूनही दिलासा मिळण्याची शक्यता खूप विरळ मानली जात आहे.

