जलसंपदाकडून विजयादशमीला आढळा प्रकल्पाचे पूजन
जलसंपदाकडून विजयादशमीला आढळा प्रकल्पाचे पूजन
नायक वृत्तसेवा, अकोले
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीला शस्रांची पूजा करण्याचे संकेत आहे. या संकेतानुसार जलसंपदा विभागाने मध्यम प्रकल्प असलेल्या आढळा धरणावरील विमोचक व द्वारांची विजयादशमीला (रविवार ता.25) पूजा करुन अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
धरणावरील विमोचकातून शेतीला सिंचनाचे पाणी पुरविण्यात येते. तसेच ज्या द्वारातून धरणात पावसामुळे जादा होणारे पाणी धरणाला धोका होऊ नये म्हणून नदीपात्रात सोडले जाते त्यांची धरणावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधून पूजा करण्याची अनोखी कल्पना जलसंपदा कर्मचार्यांनी मांडली. त्यास विजयादशमीचा शुभमुहूर्त साधून प्रत्यक्ष साकार केली. सदर पूजन कालवा निरीक्षक मयूर देशमुख, दफ्तर कारकून योगेश पवार, मुरलीधर शेळके, यू.एन.आभाळे आदिंनी केले. विशेष म्हणजे विजयादशमीच्या दिवशी एखाद्या धरणाची पूजा करण्याची घटना महाराष्ट्रात अद्यापही घडलेली नाही. गणोरे (ता.अकोले) सिंचन शाखेतील जलसंपदा कर्मचार्यांनी आढळा धरणाची पूजा ही स्वंयप्रेरणेने केली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने कर्मचार्यांचे अभिनंदन करुन या जलप्रेमींना बळ द्यावे, असे आवाहन समाज परिवर्तन केंद्राचे सरचिटणीस, संचालक वाघाड, पाणी वापर संस्थेचे लक्ष्मीकांत वाघवकर यांनी केले आहे.