पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी अनेकांकडून ‘लॉबिंग’! काँग्रेससह ठाकरे गटातही चलबिचल; शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार?..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणार्या महायुतीने यावेळी संगमनेरमध्येही परिवर्तन घडवल्याने शिवसेनेचा तालुक्यातील भाव वधारला आहे. त्यातच गेल्या मोठ्या कालावधीपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आता दृष्टीपथात दिसू लागल्याने संगमनेरच्या राजकीय वर्तुळातील हालचाली वाढल्या आहेत. त्यातून येणार्या कालावधीत शिवसेनेतील इनकमिंग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कधीकाळी अर्धाडझन नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असलेल्या स्थानिक शिवसेनेला गतवैभव प्राप्त होण्याची शक्यता असल्याने काँग्रेससह ठाकरेगटातील काहींनी आपल्या नावाचे ‘लॉबिंग’ करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून संगमनेर तालुक्याचा राजकीय इतिहास बदलण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना आणि संगमनेर हे नातं तसं खूप जुनं आहे. ‘मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी’ असं बिरुद घेवून स्थापन झालेली शिवसेना 1980 च्या दशकात महानगराच्या सीमा ओलांडून संगमनेरात पोहोचली. राजेंद्र जोर्वेकर हे त्यावेळी ठाकरे विचारांच्या पालखीचे पहिले मानकरी ठरले. जातीय हिंसाचाराचा डाग सोसणार्या शहरातील तरुणांना एका झेंड्याखाली आणण्याचे काम त्यावेळी त्यांच्या हातून घडले. रावसाहेब गुंजाळ, आप्पा केसेकर, जयवंत पवार, बंडू कोळपकर, नारायण वाकचौरे, एकनाथ मेहेत्रे, कैलास वाकचौरे, मुजीब शेख, अर्जुन काशिद, अशोक सातपुते, बाबासाहेब कुटे, दिलीप साळगट, नरेश माळवे, दिनेश फटांगरे, विकास डमाळे, अमोल कवडे अशा कितीतरी निष्ठावान शिवसैनिकांनी नंतरच्या कालावधीत तालुक्याच्या कानाकोपर्यात त्याचा प्रचार-प्रसार करुन सर्वसामान्य माणसांच्या मनात स्थान मिळवले. त्यातून काँग्रेसच्या विरोधात स्थानिक पातळीवर शिवसेना हा भक्कम राजकीय पक्ष उभा राहीला.
स्थानिक शिवसेनेसाठी 1990 ते 2000 हा दहा वर्षांचा काळ सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्यावेळी शहरप्रमुख असलेल्या आप्पा केसेकर यांची लोकप्रियता शिगेला होती. 2001 साली राज्यात पहिल्यांदाच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला. त्यावेळी संगमनेरमधून आप्पा केसेकर यांच्यासाठीच जोरदार आग्रह सुरु होता. मात्र युतीतील काही शुक्राचार्यांना केसेकरांची वाढती लोकप्रियता खुपल्याने त्यांनी वरीष्ठांना चुकीचे अहवाल पाठवून शिवसेनेसाठी जवळजवळ एकतर्फी वाटणार्या या निवडणुकीत विरजन कालवले आणि अखेर संगमनेरसाठी भाजपच्या ज्ञानेश्वर करपे यांच्या नावाची घोषणा झाली. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अढळ निष्ठा असल्याने आप्पा केसेकर यांनी संधी समोर दिसत असताना आणि अनेक कार्यकर्त्यांकडून अपक्ष लढण्याचा आग्रह सुरु असतानाही पक्षादेश पाळण्याचा निर्णय घेतला. तिरंगी लढत झालेल्या त्यावेळच्या निवडणुकीत करपे यांचा अवघ्या 43 मतांनी निसटता पराभव करीत काँग्रेसच्या विश्वास मुर्तडक यांनी सत्ता कायम राखली.
त्यानंतर आप्पा केसेकर भविष्यातील राजकारणात अडथळा ठरणार हे जवळजवळ स्पष्ट दिसू लागल्याने त्यांच्याविरोधात मोठे षडयंत्र उभे करण्यात आले आणि संबंध नसलेल्या गुन्ह्यात ओढून त्यांना तब्बल 37 दिवस कारागृहात डांबले गेले. तेव्हापासून संगमनेरच्या शिवसेनेला घरघर लागली जी आजही कायम आहे. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आणि येथूनच स्थानिक शिवसेनेचे अध:पतन सुरु झाले जे आजही कायम आहे. 2016 साली पालिका निवडणुकीत उशिराने जाग आलेल्या शिवसेनेने आप्पा केसेकर यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र दुर्दैवाने त्यावेळी भाजपशी असलेल्या संबंधात कटुता आल्याने राज्यात त्यावेळच्या निवडणुका दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले.
त्यावेळी शिवसेनेकडून उमेदवारी करणार्या आप्पा केसेकर यांना साडेनऊ हजार, तर भाजपच्या ज्ञानेश्वर करपे यांना अवघी साडेचार हजार मतं मिळाली. त्यावेळी काँग्रेसकडून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या दुर्गा तांबे यांना या दोघांच्या एकत्रित मतांपेक्षा अवघी एकहजार मतं अधिक होती. तर, राष्ट्रवादीच्या शौकत जहागीरदार यांना तिसर्या क्रमांकाची तब्बल साडेसात हजार मतं पडली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवल्यास पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला जावू शकतो अशी स्थिती वारंवार निर्माण झाली आहे. मात्र काही स्थानिक महत्त्वकांक्षी पुढार्यांनी आपलेच घोडे दामटवल्याने आजवर नेमक्या उमेदवाराच्या अभावाने पालिकेची सत्ता महायुतीसाठी दिवास्वप्नंच ठरली आहे.
यावेळी मात्र तालुक्याने इतिहास घडवताना काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्त्वालाच पराभव दाखवला आहे. त्यामुळे आगामी कालावधीत होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘त्या’ महत्त्वकांक्षी पुढार्यांसह दोन्ही पक्षातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय होताना दिसत असून त्यांच्यासह अद्यापपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातच निष्ठा पाजळणार्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही बड्या पुढार्यांनी नगराध्यक्षाच्या शब्दासह शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आपल्या नावाचे जोरदार ‘लॉबिंग’ करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या एका माजी नगराध्यक्षांच्या सुपूत्राने निवडणूक निकालानंतर केलेली लोणीची वारी आणि त्यानंतर भररस्त्यात भाजपनेते डॉ.सुजय विखे-पाटील यांना हार घालून सत्कार करण्याचा प्रसंग खूप बोलका असून आगामी काळात पक्षांतराला ऊत येण्याचे संकेत देणारा ठरला आहे.
संगमनेरात शिवसेनेची पाळेमुळे रुजून जवळपास पाच दशकांचा काळ लोटला आहे. पूर्वी जातीय हिंसाचाराचे केंद्र राहिलेल्या या शहरात शिवसेनेचे मोठे प्राबल्य होते. मात्र दोन हजारच्या दशकानंतर घडलेल्या विविध राजकीय घडामोडी, आप्पा केसेकर सारख्या निष्ठावान शिवसैनिकाला भोगावा लागलेला तुरुंगवास, त्यातून त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि नंतर महत्त्वकांक्षी लोकांची वाढत गेलेली संख्या यामुळे कधीकाळी भारदस्त विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेचा आज पालिका सभागृहात एकही सदस्य नाही. आता हा दुष्काळ संपण्याची चिन्हे दिसू लागताच पक्षाला लयास नेणार्यांसह अन्य पक्षातील महत्त्वकांक्षी पुढार्यांकडून लॉबिंग सुरु झाले असून पक्ष त्याला कशापद्धतीने सामोरा जातो यावर आगामी निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असेल.