आधी स्वतःच्या कारखान्याच्या वजन काट्याची गॅरंटी घ्यावी! ‘गणेश’चे उपाध्यक्ष विजय दंडवतेंची विरोधकांवर सडकून टीका


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासद, ऊस उत्पादक शेतकर्‍यांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच चांगला भाव मिळेल. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना चांगला भाव देण्यासाठी ‘गणेश’चे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. मात्र, विरोधकांनी आधी स्वतःच्या कारखान्याच्या वजन काट्याची गॅरंटी घ्यावी, अशी टीका गणेश साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केली.

युवा नेते विवेक कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना गणेश साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की गणेश कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मंत्री विखे पाटील यांना जळीस्थळी फक्त विवेक कोल्हे हे नाव दिसू लागले आहे. वास्तविक पाहता विवेक कोल्हे यांनी वारंवार आपल्या वक्तव्यात विखे पाटलांचा आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे.

विवेक कोल्हे हे सुसंस्कृत युवा नेते आहेत. ते नेहमीच ज्येष्ठांचा आदर करतात. सहकारी संस्थेत राजकारण करायचे नसते, सभासदांचे हित जोपासायचे असते, याची शिकवण त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेली असून, त्यानुसारच ते सदैव जनसेवेसाठी कार्यरत आहेत. एका सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे भांडवल करून त्याचा संबंध विधानसभा निवडणुकीशी किंवा पक्षीय राजकारणाशी जोडणे विखे पाटलांना शोभणारे नाही. सातत्याने शेतकर्‍यांच्या, जनतेच्या हिताचा विचार करणारे विवेक कोल्हे यांच्या वयाचा व अनुभवाचा दाखला देऊन स्वतःचे अपयश लपवणे हे हास्यास्पद आहे, अशी टीका विजय दंडवते यांनी केली आहे.

कोल्हे कुटुंबाकडे जितक्या काळ सत्ता राहिली, त्याकाळात त्यांनी सत्तेचा वापर फक्त जनतेच्या विकासाचे शेकडो प्रश्न मार्गी लावण्यासाठीच केला. व्यक्तिद्वेष न बाळगता, दडपशाही व दबावाचे राजकारण न करता कोल्हे यांनी नेहमी जनतेच्या सोबत राहण्याची भूमिका घेतलेली आहे. कुणाचे बोट धरून राजकारण करणे हा कोल्हे कुटुंबाचा पिंड नाही, तर विकासाचे बोट धरण्याची कोल्हे कुटुंबाची संस्कृती आहे. कोल्हे कुटुंबाने आजपर्यंत अनेकदा अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. मात्र, तालुक्या-तालुक्यातील नेते खुडवण्याचे काम कधीही केले नाही, तर नेत्यांना, कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांना वाढविण्याची भूमिका ठेवली असल्याचा टोलाही दंडवते यांनी लगावला आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 23145

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *