भोंदूबाबाचा महिलेवर उदीसदृश्य पदार्थ टाकून अत्याचार आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल; ४ ऑगस्टपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
होमहवन करून तुमच्या कुटुंबाची अडचण सोडवतो असे सांगून एका भोंदूबाबाने महिला घरी एकटी पाहून तिच्यावर उदीसदृश्य पदार्थ टाकून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भोंदूबाबा विरोधात अत्याचार व जादूटोणा कायद्यांतर्गत आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरुन एक कुटुंब आले आहे. येथे हे कुटुंब दुसर्‍याची शेती वाट्याने करुन प्रपंच चालवत होते. परंतु या कुटुंबाला मागील काही दिवसांपासून अनेक घरगुती अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नातेवाईकाच्या माध्यमातून ओळख झालेल्या शिवाजी पांडे (रा. शिरापूर) याने या कुटुंबाला होमहवन करुन तुमची अडचणीतून सुटका करुन देतो असे सांगितले. त्यामुळे या भोंदूबाबाबरोबर या कुटुंबाची ओळख वाढली होती.

याच ओळखीचा फायदा घेत भोंदूबाबा शिवाजी पांडे हा सोमवारी (ता.३१) सादतपूर परिसरात आला होता. यावेळी महिलेचा पती हा कामानिमित्त शेतात गेल्याचा फायदा घेऊन या भोंदूबाबाने घरात एकट्या असलेल्या महिलेच्या अंगावर उदीसदृष्य पदार्थ टाकून तिच्या मनाविरुद्ध अत्याचार केला. याबाबत पीडित महिलेने आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी शिवाजी पांडे याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम ३७६ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समूळ उच्चाटन करणे अधिनियम २०१३ कलम ३(१), (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी तत्काळ हवालदार बाबासाहेब पाटोळे, पोलीस नाईक विनोद गंभीरे, ढोकणे, पथवे व वाघ यांना सूचना देऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर मोठ्या शिताफीने पथकाने शिरापूर येथे मध्यरात्री ३ वाजता सापळा लावून आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *