डॉ.सुजय विखेंची घोषणा वचपा काढण्यासाठी की थोरातांना रोखण्यासाठी? विखे-थोरातांचा राजकीय संघर्ष टोकावर; आगामी विधानसभेत रंगणार तुल्यबळ लढत..

चंद्रकांत शिंदे-पाटील, संगमनेर
विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघात कोण कोणत्या पक्षाकडून लढणार, कोण कुठून उमेदवारी करणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. विशेषतः संगमनेर आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाची चर्चा गेल्या महिनाभरापासून राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा लढण्याचे संकेत दिल्याने जिल्ह्यातील राजकीय चर्चेला धार चढली आहे. त्यातून विखे पाटील खरोखरी संगमनेरातून लढतील का?, की केवळ माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांना शिर्डीपासून दूर ठेवण्यासाठी विखे पिता-पुत्रांनी टाकलेला हा राजकीय डाव आहे अशीही शंका निर्माण झाली आहे.


संगमनेरचे लोकप्रतिनिधी माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, विद्यमान महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर जिल्ह्याबरोबरच राज्यालाही नवीन नाही. काही वर्षांपूर्वी जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांची सहमती एक्सप्रेस सुसाट होती. मात्र ती फारकाळ चालली नाही. दोघेही एकाच पक्षात असताना या दोघांचे कधीही जमले नाही. या दरम्यान या दोन्ही दिग्गजांनी कधी छुप्या पद्धतीने तर, कधी उघडउघड एकमेकांवर कुरघोड्या करीत जिल्ह्यात आपापले स्वतंत्र गट निर्माण करुन दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून या दोघांमध्ये आपणच जिल्ह्याचे ‘कारभारी’ असल्याचे चित्रही उभे करण्याचा प्रयत्न झाला.


दरम्यानच्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पूत्र डॉ.सुजय पाठोपाठ भाजपाचा रस्ता धरला आणि भाजपाच्या तिकिटावर त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विधानसभा गाठली. त्यानंतर खर्‍याअर्थी विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्षाला धार चढू लागली. दोघांचेही पक्ष भिन्न असल्याने आणि दोघेही एकमेकांचे सख्खे शेजारी असल्याने त्यांनी एकमेकांच्या मतदारसंघात डोकवायला सुरुवात केली. तेथील विरोधकांना ताकद देवून आपल्या गटात ओढण्याचे प्रयत्न सुरु झाले.


एकीकडे यासर्व घडामोडी सुरु असतानाच दुसरीकडे शिर्डी मतदारसंघातील गणेश साखर कारखान्याची निवडणूक लागली. त्यात आमदार बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच माजीमंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक यांच्या सोबतीने गणेश कारखान्यावरील विखे पाटलांची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर याच परिसरात झालेल्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसह साई संस्थांनच्या कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीतही थोरात-कोल्हे यांनी विखे पाटलांना धोबीपछाड दिली. या सर्व घडामोडीतून शिर्डीतील विखे पाटलांच्या ताकदीवरच घाव घालण्याचे प्रयत्न झाले.


कारखान्याचा पराभव जिव्हारी लागल्याने मंत्री विखे पाटलांनी गणेश कारखान्याला जिल्हा बँकेकडून मिळणारा कर्ज पुरवठा रोखल्याचीही चर्चा झाली. त्यामुळे थोरात-कोल्हे विरुद्ध विखे पिता-पूत्र यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिणेत डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पराभवासाठी थोरातांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. या यंत्रणेचे नेतृत्त्वही त्यांनी स्वतः केल्याने अटीतटीच्या वाटणार्‍या या मतदार संघात नीलेश लंके यांच्या गळ्यात खासदारकी पडली. दक्षिणेत झालेला हाच पराभव मंत्री राधाकृष्ण आणि डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासाठी गणेशपेक्षा खूप मोठा आणि जिव्हारी लागणारा ठरला. त्यातून थोरातांच्या प्रयत्नाने माजी खासदार झालेल्या डॉ.सुजय यांनी त्यांच्या विरोधात संगमनेर विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित करुन राज्याचे लक्ष केंद्रीत केले आहे.


या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या पाच वर्षात विखे विरुद्ध थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक टोकदार झाला आहे. या संघर्षाचा नवा अध्याय येणार्‍या विधानसभा निवडणुकीत बघायला मिळू शकतो. डॉ.सुजय विखे पाटील यांनी संगमनेरातून निवडणूक लढवण्याबाबत केलेले वक्तव्य अतिशय बोलके असून पक्षाने संधी दिली तर, संगमनेर लढवण्यास आवडेल असे मोठे विधान करुन त्यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे. असे घडल्यास राज्यातील 288 मतदार संघात संगमनेर विधानसभेची लढत लक्ष्यवेधी ठरण्याची शक्यता आहे.


एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना खुद्द महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात थोरात-कोल्हे यांच्या पक्षविरहित आघाडीने मोठ्या प्रमाणात पाय रोवले आहेत. गणेश कारखान्यानंतर दक्षिणेचा पराभव आणि आता शिर्डीतुनही विखेंना पराभूत करण्यासाठी या दोघांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्यातच विखे पाटलांचे पारंपरिक विरोधक मानल्या जाणार्‍या डॉ.राजेंद्र पिपाडा यांनीही विखे पाटीलांच्या विरोधात दंड थोपटताना थोरातांचा राजकीय मंच गाठल्याने विखेंचे टेन्शन वाढले आहे. त्यातून विधानसभेलाही लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पाटलांनी नवी व्यूहरचना आखली असण्याची दाट शक्यता आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांचे शिर्डीवरील लक्ष कमी झाले तरच शिर्डीची निवडणूक सोपी असेल, अन्यथा दगा होण्याची भीती असल्याने डॉ.सुजय विखे पाटील यांनी संगमनेरातून निवडणूक लढण्याची घोषणा केली असावी अशाही चर्चा आता रंगात येत आहेत.

तब्बल आठवेळा संगमनेरातून चढत्या मताधिक्क्याने विजय मिळवणार्‍या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात भाजपने खरोखरी डॉ.सुजय विखे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यास येथील लढत रंगतदार होईल हे निश्‍चित. मात्र सलग चाळीस वर्ष तालुक्याचे नेतृत्त्व करणार्‍या, जिल्ह्यात संगमनेरचा सहकार आदर्श ठरवणार्‍या थोरातांसमोर ते आव्हान उभे करु शकतील का? हा प्रश्‍न आहे. बाळासाहेब थोरात यांनी 1985 पासून तब्बल आठवेळा संगमनेरातून विजय मिळवला आहे. 1990 साली वसंतराव गुंजाळ यांनी दिलेली कडवी झूंज वगळता त्यानंतर त्यांच्यासमोर आजवर कोणीही आव्हान उभे करु शकले नाही. त्यावेळी झालेल्या चुरशीच्या लढतीत थोरात यांचा अवघ्या 4 हजार 862 इतक्या मतांनी निसटता विजय झाला होता. मात्र त्यानंतर आजपर्यंत त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही.


1990 सालचा ‘तो’ अपवाद वगळता थोरातांसमोर कोणताही प्रतिस्पर्धी तग धरु शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. अगदी 2014 साली देशात निर्माण झालेल्या मोदी लाटेतही त्यांनी आपला गड शाबूत ठेवला होता. आता डॉ.सुजय विखे पाटील यांनी संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजपा, थोरात यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, या सर्व गोष्टी प्रत्यक्षात घडतील का? अशी शंकाही त्यातून निर्माण होत आहे.


विखे पाटलांनी यापूर्वी संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांना सपाटून पराभव बघावा लागला. त्यामुळे डॉ.सुजय विखे पाटील विधानसभेला संगममनेरातून लढले तरीही ते थोरातांचा पराभव करु शकतील का? याची मात्र कोणतीही शाश्‍वती नाही. संगमनेरात काँग्रेस पक्षापेक्षा थोरातांचे नाव अधिक बलवान आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मूशीतून घडलेल्या बाळासाहेबांनी आदर्श सहकाराच्या जोरावर तालुक्यात सुसंस्कृत राजकारण निर्माण केले आहे. संगमनेरचे राजकारण आजवर व्यक्ति केंद्रीतच असल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे. त्यातच थोरातांनी सहकारातून असंख्य संस्था फुलवताना त्याचा विस्तारही केल्याने खेडोपाडी त्यांची नाळ जोडली गेली आहे. अशा स्थितीत त्यांच्या मतदार संघात येवून त्यांच्या समोरच आव्हान उभे करण्याची खेळी कितपत यशस्वी होईल याबाबत मात्र शंका आहे.


याशिवाय समाजातील सर्व घटकांशी थोरात यांनी स्नेहाचे संबंध निर्माण केले आहेत. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षात त्यांच्यासमोर कोणीही मातब्बर निर्माण होवू शकला नाही. संगमनेर मतदारसंघात थोरातांची शाश्‍वत मतपेढी आहे. 40 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी तालुक्याला विकासाची गती दिली आहे. निळवंडे धरण आणि दुष्काळी भागातून गेलेले कालवे यातून तालुक्याला आता समृद्धीचे स्वप्नु पडू लागले आहे. जटील मानल्या गेलेल्या संगमनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही त्यांनी सोडवला आहे. त्यामुळे सलग चार दशके लोकप्रतिनिधी असतांनाही त्यांच्याबाबत मतदारांमध्ये नकारात्मक वातावरण तयार होवू शकलेले नाही. अशा स्थितीत डॉ.सुजय विखे पाटील यांची संगमनेर लढवण्याची घोषणा थोरातांच्या पराभवाऐवजी त्यांना आपल्याच मतदार संघात गुंतवून ठेवण्याची खेळी असण्याचीच अधिक शक्यता दिसून येते.


माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरातांप्रमाणेच विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 1995 पासून सलग सहावेळा शिर्डीतून विजयी झाले आहेत. त्यांना त्यांच्याच मतदार संघात जावून रोखणे थोरात-कोल्हे-घोगरे-पिपाडा या चौकडीला जमेल का अशीही शंका आहे. संगमनेर मतदारसंघातील 28 गावे शिर्डीला जोडलेली आहेत. या गावातील काही ग्रामपंचायतीमध्ये विखे पाटीलांनी आपले वर्चस्वही निर्माण केले आहे. पण ही ताकद विखे पाटलांची व्यक्तिगत असून भाजपाचा त्याच्याशी संबंध नसल्याचेही लपून राहिलेले नाही. अगदी थोरातांचे मूळ गाव असलेले जोर्वेही विखेंच्या मतदारसंघात आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील अनेकजण प्रवरा उद्योग समूहात सेवेत असल्याने विखे पाटलांना या गावांमधून पाठबळ मिळत असल्याचे बोलले जाते. त्यांच्या याच संस्थात्मक राजकारणाचा त्यांना शिर्डीत फायदा होऊ शकतो. त्यामुळे ज्याप्रकारे संगमनेरमधून थोरातांसमोर आव्हान उभे करणं म्हणजे दिवास्वप्नं ठरु शकतं तसे ते शिर्डीतही ठरण्याची अधिक शक्यता आहे.


1991 मध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत यशवंतराव गडाख यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केला होता. हा पराभव विखें पाटलांच्या जिव्हारी लागला, त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. गडाख आणि शरद पवारांनी आचारसंहितेचा भंग केला असा आरोप त्यांनी केला आणि हा निकाल विखे पाटलांच्या बाजूने लागून गडाखांची खासदारकी रद्द झाली होती. आता 2024 मध्ये नीलेश लंकेंकडून पराभव झाल्यानंतरही डॉ.सुजय विखे पाटील यांनी न्यायालयाची पायरी चढत 40 मतदान केंद्रावरच्या ईव्हीएम मशीनची तपासणी करण्याची मागणी केली होती. विखेंच्या पराभवात बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा होता. महाविकास आघाडीचा भाग म्हणून नीलेश लंकेच्या विजयासाठी त्यांनी रसद आणि यंत्रणा पुरवली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी डॉ.सुजय विखे पाटील संगमनेरमधून आव्हान देऊ पाहत आहेत.

विखे पाटीलांचे भाजपमधील राजकीय वजन पाहता डॉ.सुजय विखे पाटील यांच्या इच्छेला मुरड घालणे भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे त्यांच्याकडून राज्यसभा अथवा विधानपरिषदेवर दावा सांगण्यापूर्वीच भाजपाने जाणीवपूर्वक एका दगडात दोन पक्षी मारण्याची राजकीय खेळी केली असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. डॉ.सुजय यांनी राहुरीतून निवडणूक लढवावी अशीही मागणी आहे. संगमनेरपेक्षा राहुरीत त्यांची ताकदही अधिक आहे. असे असताना त्यांच्याकडून संगमनेरातून निवडणूक लढविण्याची घोषणा भाजपाच्याच इशार्‍याने झाल्याचीही चर्चा आहे.

Visits: 83 Today: 2 Total: 114637

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *