राज्यात राष्ट्रपती राजवटीसारखी स्थिती : आमदार थोरात बदलापूर प्रकरणी मूक निदर्शने; जबाबदारच बेजबाबदार झाल्याचा घणाघात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून कायदा व सुव्यवस्था राहीली नसून महिलांंवरील अत्याचारांसह एकामागून एक घटना समोर येत आहेत. बदलापूरमधील शाळेत घडलेली घटना लांच्छनास्पद असून इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही संस्थाचालकांनी सदरचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणं अतिशय धक्कादायक आहे. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडित मुलींच्या पालकांना बारातास बसवून ठेवण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक असून यामागे मंत्रालयातील कोणाचा हात आहे का याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने आज रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध करण्यासह शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात आज सरकार नावाचा कोणताही धाक उरलेला नसून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचा घणाघाती टोला माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेरात लगावला.
बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन राज्यातील महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी आघाडीच्या बंदला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने राजकीय पक्षांनी बंद पुकारणे घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा देत बंद करण्याचा प्रयत्न करणार्यांवर कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यामुळे आघाडीने आजचा बंद मागे घेत दुपारी 11 ते 12 यावेळेत तोंडावर काळीफित बांधून व हातात काळे झेंडे घेवून या घटनेचा निषेधार्थ आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकाजवळ आंदोलन केले, यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, एकवीरा फाऊंडेशनच्या संस्थापक जयश्री थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शिवसेनेचे शहरप्रमुख आप्पा केसेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना थोरात पुढे म्हणाले की, बदलापूरची घटना अतिशय लांच्छनास्पद आहे. इतका भयानक प्रकार घडल्यानंतर खरेतर संस्थेनेच पुढाकार घेवून कारवाई करण्याची गरज असताना सुरुवातीला संस्थाचालकांनीच प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही पीडितांचे पालक ठाम राहिल्यानंतर त्यांना तक्रार देण्यासाठी तब्बल बारा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं. हा सगळा घटनाक्रम शासनातील अथवा मंत्रालयातील कोणाच्या मदतीशिवाय कसा घडू शकतो अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. या गंभीर घटनेनंतर ज्यांनी अतिशय जबाबदारीने वागायला पाहिजे होते तेच बेजबाबदारपणे वागले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती इतकी ढासळली आहे की राज्यात राष्ट्रपती शासन लावण्यासारखी स्थिती निर्माण झाल्याची घणाघाती टीकाही थोरात यांनी यावेळी केली.
राज्यात शासनाचे अस्तित्वच दिसत नसून मंत्रालय केवळ टक्केवारी मिळवण्याचे ठिकाणं बनले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आता विधानसभेची निवडणूकही लांबणीवर टाकली आहे. त्यातून लोकांमधील रोष उफाळून बाहेर पडतो, महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत, राज नवनवीन घटना समोर येत आहेत आणि आमच्यावरच राजकारण करीत असल्याचे आरोप केले जातात हे हास्यास्पद असल्याचे सांगत बदलापूरमध्ये जमा झालेली माणसं राजकारण करीत होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर प्रशासनावर पकड नसेल तर सरकारने राजीनामा देवून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे असा टोलाही त्यांनी पुन्हा लगावला.
पोलीस ठाण्यात जावून आमदार गोळीबार करतात, शिक्षणाची पंढरी समजल्या जाणार्या शहरात अमली पदार्थांचा हैदोस बघायला मिळतो, महिला व मुलींवरील अत्याचारात सतत होत असलेली वाढ पाहता हे सरकार सत्तेवर राहण्यास लायक नसल्याचे स्पष्ट झाले असून राज्याचे गृहमंत्री व सपूर्ण मंत्रीमंडळच या बिघडलेल्या व्यवस्थेला जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी गर्दी केली होती. पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्यासह शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.