पस्तीस हजाराच्या विसर्गातही ‘प्रवरा’ पात्रातच संकुचित! सोळा वर्षांतील सर्वाधीक प्रवाह; संगमनेरच्या वाळुतस्करांची कमाल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर सुरु असलेल्या तुफान पावसामुळे मुळा, प्रवरा व आढळा या तिनही नद्यांना महापूर आला आहे. गेल्या 48 तासांत झालेल्या तुफान पावसाने शनिवारी सायंकाळपासून भंडारदर्यापाठोपाठ निळवंडे धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला गेल्याने ठिकठिकाणी नदीपात्रावर असलेले पूल पाण्याखाली गेले असून काही गावात पूरस्थिती निर्माण झालेली असताना एरव्ही इतक्या विसर्गात पूराच्या पाण्यात अडकणार्या संगमनेर शहराला मात्र वाळू तस्करांच्या कृपेने कोणतीही तोशीस लागलेली नाही. विशेष म्हणजे यापूर्वी 2008 साली भंडारदरा धरणातून 30 हजार 918 क्यूसेकचा प्रवाह सोडण्यात आला होता, त्यावेळी चंद्रशेखर चौकातील देशपांडे वाड्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले होते. त्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी रविवारी सायंकाळी निळवंडे धरणातून 30 हजार 775 क्यूसेक पाणी सोडले गेले. मात्र यावेळच्या पाण्याचा प्रवाह नदीपात्रालगच्या गंगामाई मंदिराच्या भिंतीलाही स्पर्श करु शकले नाही.
गेल्या आठवडाभरापूर्वी धरणांच्या पाणलोटात परतलेल्या मान्सूनने तुफान वृष्टी करताना जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे या मोठ्या जलाशयांसह उत्तरेतील सगळेच छोटे-मोठे पाटबंधारे प्रकल्प तुडूंब भरले आहेत. त्याचा परिणाम उत्तर नगरजिल्ह्यातील नद्या प्रवाहित होण्यात झाला. मात्र गेल्या 48 तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे धरणासह नदीकाठावरील गावांच्या सुरक्षिततेसाठी धरण व्यवस्थापनाने एका मर्यादीत पातळीवर धरणातील पाणीसाठा नियंत्रित करुन आवक होत असलेल्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु केला.
शनिवारी (ता.3) सकाळी भंडारदर्यातून 5 हजार 270 क्यूसेकने निळवंडे धरणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजता त्यात आणखी वाढ करुन विसर्ग 7 हजार 444 क्यूसेक करण्यात आला. या दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने अवघ्या तासाभरातच त्यात वाढ करुन सायंकाळी सातच्या सुमारास 9 हजार 582 क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पावसाला प्रचंड जोर चढून भंडारदर्यातील पाणीसाठा फुगू लागल्याने धरणाचा वक्राकृती सांडवा पुन्हा वरती उचलण्यात येवून त्याद्वारे सुरुवातीला 17 हजार 794 क्यूसेक तर, तासाभराने रात्री दहाच्या सुमारास 21 हजार 854 क्यूसेकने पाणी सोडले गेले. त्यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढल्याने या धरणातून शनिवारी रात्री 9 वाजता सुरुवातीला 800 क्यूसेक व नंतर दहा वाजता 1 हजार 780 क्यूसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला.
शनिवारी दिवसासह रात्रभर घाटघर, रतनवाडी, पांजरे आणि भंडारदरा परिसरात उच्चांकी पाऊस कोसळल्याने रविवारी (ता.4) सकाळी 6 वाजता भंडारदर्यातून तब्बल 27 हजार 114 क्यूसेकचा विसर्ग सोडण्यात आला. तर निळवंडे धरणाच्या विसर्गातही मोठी वाढ होवून तो 15 हजार 597 क्यूसेकवर नेण्यात आला. रविवारी दुपारी बारा वाजता भंडारदर्याचा विसर्ग कायम ठेवून निळवंड्याचा विसर्ग 21 हजार 855 क्यूसेक करण्यात आला. रविवारीही दिवसभर पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने सायंकाळी 7 वाजता भंडारदर्यातून 25 हजार 394 क्यूसेक तर, निळवंडे धरणातून 30 हजार 775 इतका विक्रमी विसर्ग सुरु करण्यात आला. यावेळी आढळा धरणाच्या सांडव्यावरुन 4 हजार 70 क्यूसेकचा ओव्हरफ्लो नदीपात्रात पडत होता, तर लहितजवळभल मुळापात्रातून 30 हजार 125 क्यूसेक पाणी वाहत होते.
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास निळवंडे धरणातून 30 हजार 775 इतका प्रचंड विसर्ग वाढवला गेल्याने व मंगळापूरनजीक त्यात आढळा नदीचे चार हजार क्यूसेक आणि निळवंडे ते संगमनेर पर्यंतच्या ओढ्या-नाल्यांमधून वाहणार्या पाण्यासह आज पहाटेच्या सुमारास संगमनेरच्या नदीपात्रातून 35 हजार क्यूसेकहून अधिक पाणी वाहत होते. यापूर्वी 19 सप्टेंबर 2008 साली भंडारदरा धरणातून 30 हजार 918 क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी त्यात ओढ्या-नाल्यांसह आढळानदीचे पाणी मिळून संगमनेरनजीकच्या पात्रातून 35 हजारांहून अधिक पाणी वाहीले. या पाण्याने प्रवराकाठासह म्हाळुंगीच्या पात्रालगत राहणार्या वसाहतींमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास भाग पाडले होते. शिवाय त्यावेळी पाण्याचा प्रवाह थेट चंद्रशेखर चौकातील गिरीश देशपांडे यांच्याही वाड्याच्या पुढे गेला होता.
त्यानंतर आजवर भंडारदरा अथवा निळवंडे या दोन्ही धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. मात्र या कालावधीत संगमनेरला ‘पूरमुक्त’ करण्याचा चंग बांधून राजकीय आशीर्वादाने जन्माला आलेल्या वाळू तस्करांनी गेल्या 18 वर्षात संगमनेरचे नदीपात्र असे पोखरुन काढले की गेल्या हजारों वर्षांपासून वाहणार्या प्रवरेने आपल्या पात्रात साठवून ठेवलेला गौणखनिजाचा ठेवा पूर्णतः उपसण्यात आला. त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक शुद्धीकरणावर परिणाम होण्यासह जमिनीत पाण्याचा निचरा होण्याचीही प्रक्रिया थांबल्याने कधीनव्हे ते नदीकाठावरीलच विहिरी तळाला जाण्यास सुरुवात झाली, मात्र वाळू तस्करांचा संकल्प खंडीत होवू शकला नाही.
अखेर तब्बल 18 वर्षांनी पुन्हा एकदा रविवारी (ता.4) सायंकाळी सात वाजता निळवंडे धरणातून विक्रमी 30 हजार 775 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यात आढळेतूनही 4 हजार 70 क्यूसेक पाणी वाहत असल्याने ओढ्या-नाल्यांसह तेही प्रवरेच्या पात्रात मिसळून संगमनेरनजीक जवळपास 35 ते 38 हजार क्यूसेकचा प्रवाह वाहण्याची आणि यावेळी नदीकाठावरील वसाहतींना त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. पालिकेनेही रुग्णवाहिकेचा वापर करुन नदीकाठावर दवंडी पिटवून लोकांना सावधान केले. मात्र त्या इशार्याची संगमनेरकरांना गरजच भासली नाही.
संगमनेरातील वाळू तस्करांनी गेल्या दोन दशकांत प्रचंड परिश्रम करुन संगमनेर तालुक्यातून वाहणार्या प्रवरामाईचे जागोजागी लचके तोडले. त्याचा परिणाम या कालावधीत संगमनेरचे नदीपात्र त्याच्या नैसर्गिक उंचीपेक्षा जवळपास 25 ते 35 फूटापर्यंत खाली गेले. त्यामुळे 2008 साली सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रमाणात यंदाही पाणी सोडले गेल्याने बहुतेकांना त्यासाली निर्माण झालेली पूरस्थिती आठवली व त्यांनी त्यावरील प्राथमिक उपायायोजना म्हणून दवंडीही पिटवली. पण वाळू तस्करांची मेहनत रंगात आलेली होती. त्यामुळे नदीपात्रातून 35 हजारपेक्षा अधिक क्यूसेकचा प्रवाह वाहत असतानाही या पाण्याला नदीकाठावरच्या गंगामाई मंदिराच्या भिंतीही स्पर्श करता आला नाही. म्हणूनच इतक्या मोठ्या विसर्गानंतरही संगमनेर शहरातील कोणाही नागरिकाला नदीकाठावरील आपले घर सोडून अन्य कोठेही आश्रय घेण्याची वेळ आली नाही.
2008 साली भंडारदरा पाणलोट क्षेत्रात झालेल्या तुफान पावसामुळे 19 सप्टेंबर 2008 रोजी धरणातून 30 हजार 918 क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यात ओढ्या-नाल्यांसह आढळानदीचे पाणी मिसळून जवळपास 35 हजार क्यूसेक पाण्यातच त्यावेळी नदीकाठावरील लोकांना सुरक्षित स्थळावर हलवण्यासह त्यांच्या आश्रयाची व्यवस्था करावी लागली होती. त्यावेळी पुराच्या पाण्याने चंद्रशेखर चौकातील देशपांडेवाडाही ओलांडला होता. मात्र यावेळी तितक्याच प्रमाणात पाणी वाहुनही प्रवरामाई संकुचितच राहिली, त्यामुळे प्रशासनाची धावपळ वाचण्यासह नदीकाठावरील लोकांनाही हायसे झाले. त्यामागे वाळू तस्करांची दोन दशकांची मेहनत कारणीभूत असल्याची चर्चा सध्या संगमनेरात सुरु आहे.