‘लव्ह जिहाद’ प्रकरणात आणखी दोघे गजाआड! साकूरसह मुंबईतील एकाचा समावेश; सूत्रधाराला ‘वाढीव’ कोठडी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या पठारभागातून गेल्या आठवड्यात समोर आलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून पीडित तरुणीला चाकणहून मुंबईत घेवून जाणार्‍या कारचालकासह मुंबईत आरोपींची बडदास्त ठेवणार्‍या एकाला घारगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता तीन झाली असून गुन्हा दाखल झाल्यापासूनच कारागृहात असलेला या प्रकरणाचा सूत्रधार युसुफ चौगुले याला न्यायालयाने तिसर्‍यांदा वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. आज भल्या पहाटे पोलिसांनी मुंबईत छापा घालून आदिल शेख याच्यासह साकूरमधील अमर पटेल या दोघांना अटक केली असून त्या दोघांनाही न्यायालयाने मंगळवारपर्यंत कोठडीत पाठवले आहे. आदिल शेख याचा संगमनेरातील एका राजकीय युवा नेत्याशी संबंध असल्याचेही समोर येत आहे.


गेल्या महिन्यात 7 जुलैरोजी पठारभागातील एका 19 वर्षीय तरुणीचे मंचरला (जि.पुणे) बोलावून आरोपी युसुफ दादा चौगुले व शादाब तांबोळी (दोघेही रा.घारगाव) यांनी बळजबरीने अपहरण करुन तिला खासगी वाहनातून पुण्याच्या दिशेने नेले. यावेळी पीडित तरुणीने त्यांना विरोध केला असता युसुफ चौगुले याने पाण्यातून तिला गुंगीचे औषध पाजले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला मंचरहून पुण्याकडे नेताना चाकणजवळ वाहनांची अदलाबदल करुन चौगुले याने आरोपी शादाब आणि पीडित तरुणीला दुसर्‍या वाहनात बसवून मुंबईच्या दिशेने रवाना केले.


सदरील वाहनात एक महिला आणि चालक असल्याचा उल्लेख पीडितेने आपल्या फिर्यादीत केला होता. त्यानुसार पोलीस त्या दोघांचाही शोध घेत असताना सदरील वाहन साकूरमध्ये राहणार्‍या अमर पटेल याचे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो प्रत्येकवेळी गुंगारा देत होत. आज पहाटेच्या सुमारास आरोपी पटेल साकूरमध्ये आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरावर छापा घातला आणि हालचाल करण्यापूर्वीच त्याच्या मुसक्या आवळीत त्याला कारागृहात डांबले आहे.


आरोपी अमर पटेल याने एका महिलेच्या मदतीने शादाब व पीडित तरुणीला मुंबईतील आदिल शेख या अन्य एका आरोपीकडे नेले. आदिल शेख यानेच त्या दोघांची सानपाडा येथील लॉजमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आणि त्यामुळेच आरोपी शादाबला सलग तीन दिवस पीडितेवर शारीरिक अत्याचार करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. याच आदिल शेख याने आयाज पठाण नावाच्या त्याच्या साथीदारासह अन्य तिघांची मदत घेवून पीडितेला बांद्रा येथे नेवून तिचे धर्मांतरण घडवले होते.


नव्याने लागू झालेल्या भारतीय न्यायसंहितेनुसार एखाद्या गंभीर गुन्ह्यात प्रत्यक्ष गुन्हा करणार्‍यासह त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणार्‍यांनाही सहआरोपी केले जाते. त्या सूत्रानुसार मूळ फिर्यादीत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार युसुफ चौगुले, शादाब तांबोळी, कुणाल शिरोळे व आयाज पठाण या चौघांचा उल्लेख असला तरीही प्रत्यक्षात पोलीस आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार एकूण नऊ आरोपींचा शोध घेत असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे.


गेल्या 26 जुलैरोजी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांकडून एकएक कडी जोडून आरोपींचा माग काढला जात असून आज पहाटे चाकणहून एका महिलेच्या मदतीने आरोपी शादाब तांबोळी आणि पीडितेला बेशुद्ध अवस्थेत मुंबईला घेवून जाणारा अमर पटेल घरात असल्याची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी छापा घालीत त्याच्या मुसक्या आवळल्या. तर, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस कर्मचारी सुभाष बोडखे व प्रमोद गाडेकर यांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने आरोपी आदिल शेख याच्या मुसक्या आवळल्या. या दोघांनाही काही वेळापूर्वी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना मंगळवारपर्यंत (ता.6) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यासोबतच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या युसुफ चौगुले याची पोलीस कोठडी मंगळवारपर्यंत वाढवण्यात आली आहे.


संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणार्‍या या प्रकरणातील मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौगुले हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या ग्रंथालय विभागाचा उत्तर महाराष्ट्र प्रमुख असल्याचे समोर आल्यानंतर आता या प्रकरणात मुंबईतून अटक करण्यात आलेला आदिल शेख याचा संगमनेरातील एका मोठ्या युवा नेत्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींनी आपल्या राजकीय वलयाचाही वापर केल्याचे समोर येवू लागले आहे.

Visits: 45 Today: 1 Total: 112895

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *