केसापूर येथे महिलेचा विनयभंग करुन जबर मारहाण राहुरी पोलिसांत झाला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील केसापूर येथे शौचालयासमोर काट्या टाकू नको, असे म्हटल्याचा राग येऊन महिलेस शिवीगाळ करून कुर्हाडीने घाव घालत जखमी केले. तसेच लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राहुरी पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, केसापूर येथे विकास दामोधर पुजारी, द्रौपदाबाई पुजारी, अर्चना विकास पुजारी व त्यांच्या दोन मुली हे घराच्या मागे असलेल्या शौचालयासमोर काट्या टाकत होते. त्यावेळी पीडित महिला आमच्या शौचालयासमोर काट्या टाकू नका असे म्हटली असता आरोपींना त्याचा राग आल्याने त्या सर्वांनी महिलेस शिवीगाळ केली. कुर्हाडीचे घाव घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असताना महिलेने तो वार तिच्या डाव्या हनुवटीवर घेतला.
या प्रकारात महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी त्या महिलेचा पती आला असता त्यासही तुझाही काटा काढतो म्हणून द्रौपदाबाई पुजारी हिने दगडाने मारहाण केली. तसेच अर्चना पुजारी हिनेही महिलेच्या आणि पतीच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलींनी दगडफेक करून मारहाण केली. तुम्ही आता वाचला असला तरी तुमचा काटा काढणार आहे अशी धमकी दिली. यातील जखमी महिलेस कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवून तो राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यावरुन पोलिसांनी विकास दामोधर पुजारी, द्रौपदाबाई पुजारी, अर्चना विकास पुजारी व त्यांच्या दोन मुली यांच्याविरुद्ध गुरनं.224/2023 भादंवि कलम 307, 354 अ, 323, 143, 147, 148,149, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.