संगमनेरच्या जलजीवन अभियानात चोरट्यांचे विघ्न! पुन्हा पाईपची चोरी; आठ दिवसांत 75 लाखांवर मारला डल्ला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुढील वर्षापर्यंत देशातील प्रत्येक घरात नळजोडणी आणि त्याद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात जलजीवन अभियान सुरु केले आहे. त्या अनुषंगाने संगमनेर तालुक्यातील ग्रामीणभागात युद्धपातळीवर कामे सुरु असतांना आता त्यात चोरट्यांनी विघ्न आणले आहे. या अभियानातंर्गत तालुक्यातील घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी पाईपवरच चोरट्यांनी हात साफ करायला सुरुवात केल्याने ठेकेदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चारच दिवसांत याबाबत दोन तक्रारी दाखल झाल्या असून त्यातून तब्बल 75 लाख रुपये किंमतीचे 850 लोखंडी पाईपच चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे वेगात सुरु असलेल्या या अभियानाला खिळ बसली असून असेच प्रकार कोपरगाव व राहाता तालुक्यातूनही समोर आल्याने यामागे मोठे ‘रॅकेट’ कार्यरत असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सदरील प्रकार गांभीर्याने घेवून पाईपचोरीचा हा अनोखा प्रकार उघड करण्याची गरज आहे.


केंद्र सरकारने 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याची महत्त्वकांक्षी योजना जाहीर केली होती. त्यानंतर देशात कोविड संक्रमण सुरु झाल्याने दीर्घकाळ या योजनेतून होणारी कामे थंडावली होती. मात्र आता या अभियानाच्या कामांनी देशासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये वेग घेतल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही एकूण 901 पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात आला असून पाण्याचा उद्भव प्राप्त असलेल्या सातशेहून अधिक योजनांचे काम सुरु झाले, तर काही योजनांचे काम पूर्णही झाले आहे. संगमनेर तालुक्यातही या अभियानानुसार युद्धपातळीवर कामे सुरु असतांना सदरील कामाचा ठेका घेणार्‍या आर.एम.कातोरे यांना मात्र त्याचा मोठा फटका बसला आहे.


गेल्या शुक्रवारी (ता.4) या अभियानातंर्गत वेल्हाळे भागातील पाणी पुरवठ्यासाठी मागवण्यात आलेल्या एकूण पाईपमधून चक्क 30 लाख 3 हजार 784 रुपये किंमतीचे 320 पाईप वेल्हाळे येथील भांड मळ्याजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळून चोरीला गेल्याची घटना ताजी असतांनाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी चोरट्यांनी कातोरे यांनाच लक्ष्य करीत तिगांव शिवारातील पाण्याच्या टाकीजवळ उतरवून ठेवलेले एक-दोन नव्हेतर तब्बल 528 पाईप पुन्हा एकदा चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. या पाईपची किंमत 43 लाख पाच हजार 523 इतकी असून प्रत्येकी एका पाईपचे वजन 115 किलो तर त्याची किंमत 9 हजार 391 इतकी आहे.


याबाबत मंगळवारी (ता.8) रात्री उशिराने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अभियंता सचिन रेवगडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सातपुते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या अवघ्या चारच दिवसांत एकाच ठेकेदाराचे एकूण 848 लोखंडी पाईप चोरीला गेले असून त्याची एकत्रित किंमत 73 लाख नऊ हजार 307 रुपये इतकी आहे. यातील वेल्हाळे येथील घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही उपलब्ध आहे, मात्र पोलिसांना अद्यापही चोरट्यांचा माग काढता आलेला नाही. तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील या दोन घटनांमधून चोरट्यांनी थेट मालट्रकचा वापर करुन केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेच्या कामातच खिळ घालण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.


‘हर घर जल’ या योजनेनुसार राज्यात जलजीवन मिशन युद्धपातळीवर राबविले जात आहे. मात्र जिल्ह्यातील या योजनेच्या कामात आता चोरट्यांनी विघ्न आणले असून संगमनेरसह यापूर्वी कोपरगाव व राहाता तालुक्यातील कामाच्या ठिकाणांहूनही अशाच पद्धतीने पाईपची चोरी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महत्त्वकांक्षी अभियानाला खिळ बसण्याची शक्यता असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी असे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र तपास पथकाची नेमणूक करुन पाईप चोरीचे रॅकेट उघड करण्याची गरज आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 23168

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *