म्हाळुंगी नदीपात्रातून निघतोय गांजाचा धूर! शहर पोलिसांची थातुरमातूर कारवाई; बाकी सबकुछ आलबेल आहे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठीत एक म्हण आहे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ तशी काहीशी गत बुधवारी संगमनेरात अनुभवायला मिळाली. वाळूच्या कारवाईत काही हाती लागतंय का याची चाचपणी करीत नदीकाठावर फिरणार्‍या शहर पोलिसांच्या पथकाला अचानक म्हाळुंगीच्या पात्रातून कडवट वासाचा धूर दिसू लागला. वासावरुन जळणारा पदार्थ ‘गांजा’ असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस पथकाने लागलीच धुराच्या दिशेने झडप घातली. या कारवाईत आधीच नशेत तर्राट झालेल्या दोघांना फारकाही हालचाल न करताच सहज पकडण्यात आले. त्याचवेळी हा प्रकार पाहणार्‍या मद्यपीने भरपात्रातच आरडाओरड आणि शिवीगाळ सुरु केली. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ‘दमात’ घेत ठाणं गाठलं. एरव्ही चोरीचे एकापेक्षा अधिक गुन्हे समोर आल्यास आपली फाटलेली झाकण्यासाठी एकाच गुन्ह्यात बाकीचे घुसवणार्‍या पोलिसांनी यावेळी मात्र पथकातील सगळ्याच कर्मचार्‍यांना ‘न्याय‘ देत एकाच परिसरात केलेल्या कारवाईचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आणि स्वतःच आपली पाठही थोपटून घेतली.


त्याचे झाले असे की, बुधवारी (ता.17) मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सकाळपासूनच शहरालगतच्या परिसरात गस्त घालून समाजविघातक वृत्तींचा शोध सुरु केला होता. मोठ्या सणांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यालयाकडून तसाही अतिरीक्त बंदोबस्त प्राप्त झालेलाच असतो, तसा मोहरमसाठीही राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी संगमनेरात दाखल झालेली होती. त्यामुळे संवेदनशील ठिकाणांवर त्यांची नेमणूक करुन स्थानिक पोलीस निवांतच होते. त्यामुळे मिळालेल्या फावल्या वेळेत काहीतरी करावं या विचाराने पोलिसांची काही पथकं समाजविघातक प्रवृत्तींचा शोध घेण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या दिशेला पांगली.


एका पथकाने प्रवरा परिसरातील आडव्या नदीपासून संगमनेर खुर्दच्या पुलापर्यंत घिरट्या झालून पाहील्या, मात्र सद्यस्थितीत पोलिसांपेक्षा गुन्हेगार आणि तस्करांचा ‘गोपनीय’ विभाग अधिक ‘सक्षम’ असल्याने पोलिसांच्या दृष्टीत नदीपात्राचे चित्र येण्याआधीच सगळे तस्कर रफूचक्कर झाले. त्यामुळे नद्यांच्या भोवती ‘सावज’ शोधणार्‍या पोलिसांचा हिरमोड झाला. त्यातून प्रवरेच्या पात्रात नाहीतर म्हाळुंगीच्या पात्रात तरी काहीतरी हाती लागेल या आशेने पोलीस पथकाने आपला मोर्चा अवैध व्यावसायिक, वाळू चोर, गुन्हेगार यांचे आश्रयस्थान बनलेल्या म्हाळुंगीच्या कोरड्या ठाक पात्राकडे वळवला.


यावेळी पालिकेने धक्का भिंतीच्या नावाखाली सरकारी खर्चातून संरक्षित केलेल्या ‘खासगी’ जमिनींच्या आडोशाला धुराचे छोटे-छोटे लोळ उठत असल्याचे चित्र पोलीस पथकाने पाहिले. तसाही ‘या’ धुराचा आणि पोलिसांचा संबंध खूप जवळचा असल्याने झुडपाच्या आडोशाने निघणारा धूर कशाचा आहे हे ओळखण्यास पोलिसांना क्षणही लागला नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने गेल्यास वरिष्ठांची ‘खपा’ होईल या हेतूने कारवाईचा निर्णय झाला आणि साध्या वेशातील पोलिसांच्या पथकाने अचानक धूर निघणार्‍या आडोशावर झडप घातली. यावेळी दोघे ढगाळ वातावरणात ‘दम मारो दम..’ असं गुणगुणत गांजा भरलेली चिलम ओढीत असल्याचे दिसताच दोघा गंजडींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. कदाचित या गदारोळात पथक येण्यापूर्वीच बाकीची मंडळी पसार झाली असावी, त्यामुळे पथकाच्या हाती केवळ गांजा ओढून तर्रर झालेले दोघे लागले.


हा सगळा प्रकार काही अंतरावर असलेल्या आणि सध्या आखाडाचा महिना असल्याने दिवसरात्र दारुच्या नशेत झिंगाट होणार्‍या एका तळीरामाने पाहिला. एकतर छापा घालणारे पोलीस साध्या वेशात आणि त्यातही दुचाकी वाहनांवरुन आल्याने त्याला पोलिसांचा सुगावा लागण्याची शक्यताही नव्हती. त्यामुळे दोन गटात काहीतरी धुमश्‍चक्री झाल्याचा विचार करुन दारुच्या नशेत त्याने तेथूनच आरडाओरड आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पोलीस पथकाने तळीरामाचा नाद नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले, पण त्यामुळे त्याचे मनोबल वाढल्याने आणि आसपास बघ्यांचीही गर्दी वाढू लागल्याने पोलिसांना त्याच्यावर कारवाई करणं भाग पडलं.


खरेतर हे तिघेही दोन वेगवेगळ्या नशा करताना एकाच परिसरात आढळून आले. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांचा पाहुणचार आणि मग एकत्रित गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाणं क्रमप्राप्त होतं. मात्र पोलिसांनी आपलीच पाठ थोपटून घेण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आणि एकाच चिलममधून धुराचे नळकांडे सोडणार्‍या दोघांवर दोघा स्वतंत्र फिर्यादीमार्फत एकाच कलमान्वये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. त्यातील पहिल्या प्रकरणाची फिर्याद पोलीस काँन्स्टेबल रोहिदास शीरसाठ यांनी दिली, तर दुसरी काँन्स्टेबल विशाल करपे यांच्या नावावर नोंदवली गेली. या कारवाईत दूरवरुनच सहभागी झालेल्या तळीरामावर पथकातील तिसरे काँन्स्टेबल अजीत कुर्‍हे यांनी तक्रार नोंदवली.


त्यावरुन शहर पोलिसांनी म्हाळुंगीच्या नदीपात्रात गांजा पिणार्‍या राजेश सोमनाथ दिघे (वय 29, रा.शिवरामनगर, कासारवाडी) व पांडूरंग सावळीराम आसवले (वय 49, रा.नॅशनल शाळेजवळ, कोल्हेवाडी रोड) या दोघांवर गुंगीकारक औषधी व द्रव्य आणि मनावर परिणाम करणार्‍या पदार्थ विरोधी अधिनियमाच्या कलम 27 प्रमाणे तर, पोलिसांना पाहुन शिवीगाळ आणि आरडाओरड करणार्‍या जफर उमर कुरेशी (वय 32, रा.भारतनगर) याच्यावर दारुबंदी कायद्याच्या कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल केला आणि एका झटक्याच कशा तीन कारवाया केल्या अशा बढाया मारीत आपलीच पाठ थोपटून घेतली. मात्र या धुरप्रवण क्षेत्रापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेला गांजाचा साठेदार व नदीकाठीच असलेला भलामोठा जुगाराचा अड्डा पोलिसांना दिसलाच नाही.


एरव्ही सोनसाखळी चोरीच्या घटना असोत अथवा चोरीच्या त्या एकाचवेळी अधिक प्रमाणात समोर आल्यात की पोलीस चलाखीने त्यातील एकाची फिर्याद नोंदवून उर्वरीत गुन्ह्यांना त्यातच घुसवतात व आपल्या हद्दितील गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे आभाशी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या प्रकरणात मात्र एकाच चिलममधून धूर काढणार्‍या दोघांवर एकाच कलमान्वये दोन स्वतंत्र तर, हा प्रकार पाहुन दारुच्या नशेत आरडाओरड करणार्‍या तिसर्‍यावर दारुबंदी कायद्याचे हत्यार वापरुन तिसरा गुन्हा नोंदवण्यात आला. यावरुन पोलिसांची मर्दुमकीही अधोरेखीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *