संगमनेरच्या शिवप्रेमींना परिवहन महामंडळाचा ठेंगा! मागणी सोळाशे फूटांची; मंजुरी मात्र अवघ्या अठ्ठ्याहत्तर फूट जागेची..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर बसस्थानकाच्या दर्शनीभागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकासाठी जागा मिळावी या संगमनेरकरांच्या मागणीवर राज्य परिवहन महामंडळाने अखेर निर्णय घेतला खरा, मात्र त्यातून शिवप्रेमींची घोर निराशाच झाल्याचे जळजळीत वास्तवही आता समोर आले आहे. वास्तविक संगमनेर नगरपरिषदेने पाच वर्षांपूर्वी पाठवलेल्या आपल्या प्रस्तावातून या स्मारकासाठी किमान पाचशे मीटर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात मात्र महामंडळाने अवघी 24 मीटर जागा देण्याची तयारी दाखवली आहे. धक्कादायक म्हणजे सदरची जागाही बसस्थानकाच्या उत्तरेकडील चंदूकाका सराफ यांच्या दालनाशेजारील प्रवेशद्वारासमोर असल्याने महामंडळाने हजारों शिवभक्तांना एकप्रकारे ठेंगाच दाखवला आहे. सोमवारी याबाबतचा निर्णय समोर आल्यापासून शहरात भाजप व काँग्रेसमध्ये श्रेयासाठी थयथयाट सुरु आहे, मात्र एवढ्याशा जागेत पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारक कसे होणार? याबाबत मात्र कोणीही बोलायला तयार नाही.
पूर्वी केवळ गावठाणापर्यंत मर्यादीत असलेल्या संगमनेर शहराचा व्याप आज आसपासच्या घुलेवाडी, गुंजाळवाडी, वेल्हाळे, राजापूर, ढोलेवाडी, कासारवाडी, सुकेवाडी, कुरण अशा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. सन 1980 साली अस्तित्वात असलेल्या संगमनेर बसस्थानकावर सूर्यास्तानंतर कोणतीही बस येत नसतं. त्यामुळे अंधार पडल्यानंतर अरगडे गल्लीतील मारुती मंदिराची मर्यादा ओलांडून अभावानेच कोणी गावाबाहेर पाऊल ठेवीत असे. बसस्थानकातून शहरात येण्याचे प्रवेशद्वार असलेल्या याच ठिकाणी तत्कालीन नगराध्यक्ष नूरमोहंमद पहेलवान यांनी शिवरायांची अर्धाकृती प्रतिमा उभारली. त्यावेळी शहराच्या मर्यादीत विस्तारामुळे शिवरायांचे आज अस्तित्वात असलेले स्मारक म्हणजेच त्यावेळी शहराचे प्रवेशद्वारच होते. मात्र गेल्या पाच दशकांत शहराचा प्रचंड विस्तार झाला असून आसपासच्या उपनगरांमध्ये शेकडों घरे आणि आस्थापना निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे शहराच्या विस्ताराच्या तुलनेत आजचे शिवस्मारक खूपच छोटे आणि अविकसित दिसू लागल्याने संगमनेरकर शिवप्रेमींनी विस्तारीत आणि भव्य स्मारकाची वेळोवेळी मागणी केली. त्याचा आधार घेत सन 2018 साली संगमनेर नगरपरिषदेने सभागृहात ठराव घेवून संगमनेर बसस्थानकाच्या दर्शनीभागात शिवप्रतिमेसह भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. या ठरावानंतर वर्षभराने 13 मार्च 2019 रोजी या निर्णयाच्या ठरावप्रतिसह राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभाग नियंत्रकांशी पत्रव्यवहार करुन त्यांच्याकडे प्रस्तावित स्मारकासाठी किमान 300 ते 500 चौरस मीटर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली.
पालिकेच्या या प्रस्तावात सद्यस्थितीत असलेल्या शिवरायांच्या अर्धाकृती स्मारकाची जागा रस्ता रुंदीकरणाच्या वेळी मोकळी करावी लागणार असल्याचा उल्लेख करीत पालिकेने शिवस्मारकासाठी पर्यायी जागांचा शोध घेतल्याचे म्हंटले आहे. संगमनेर बसस्थानकाच्या पुढील भागातील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे बसस्थानकाचा परिसर पूर्णतः मोकळा झाल्याने विस्तीर्ण जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आल्याचे व त्यातील किमान 300 ते 500 चौरस मीटर (975 ते 1625 फूट) जागा स्मारकाच्या कामासाठी देण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यानंतरच्या घटनाक्रमात शहरातील प्रत्येक विषयाची ‘चुंबळ’ उचलणार्या काहींसह काही संघटना व पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह भाजप व शिवसेना या पक्षांचीही एन्ट्री झाली. पालिकेकडूनही त्याबाबत स्मरणासाठी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र यासर्व गोष्टींना पाच वर्षांहून अधिक काळ उलटूनही महामंडळाकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यातच गेल्या जानेवारीत संगमनेरात आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एककोटी रुपयांचा निधी जाहीर करीत संगमनेरात शिवरायांच्या पूर्णाकृती प्रतिमेसह भव्य स्मारकाची घोषणा केली आणि या विषयाने राजकीय वळण घेतले. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनीही या विषयात आघाडी घेत वेळोवेळी मंत्र्यांच्या दारातील उंबरे झीझवले. तर, आमदार सत्यजित तांबे यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेत परिवहन महामंडळाची जागा मिळण्याबाबतचे पत्र त्यांच्या हाती सोपवले.
अखेर गेल्या सोमवारी (ता.15) या विषयी राज्य परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळानी बैठक घेवून संगमनेर बसस्थानकाच्या प्रवाशीद्वारातील (चंदूकाका सराफ यांच्या दालनाशेजारी प्रवेशद्वार.) 4 मीटर बाय 6 मीटर (24 चौरस मीटर/78 फूट) जागा देण्याचा निर्णय घेतला व त्याबाबतची माहितीही संचालक मंडळाच्या ठरावासह अहमदनगरच्या विभाग नियंत्रकांना पाठवण्यात आली. सदरच्या ठरावाची आणि मंजुरीची प्रत हाती लागताच थोरात-तांबे यांच्यासह भाजपचे स्थानिक कार्यकर्ते सोशल माध्यमातून श्रेयासाठी पुढे सरसावले. त्यातून संगमनेरात श्रेयवादाची नवी लढाईच सुरु झाल्याचे चित्र दिसत असताना प्रत्यक्षात वस्तुस्थितीकडे मात्र कोणीच लक्ष दिले नसल्याचेही समोर आले.
राज्य परिवहन महामंडळाने ठराव केलेली जागा अनपेक्षित ठिकाणी असून ती अवघी 78 चौरस फूटच असल्याने इतक्याशा जागेत केवळ शिवरायांची अश्वारुढ प्रतिमाच बसू शकेल, मग स्मारकाचे काय?. त्यामुळे श्रेयासाठी लढणार्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती समजावून घेत शिवाजी महाराजांना राजकीय पक्षांच्या कक्षेत बांधण्याऐवजी एक संगमनेरकर शिवप्रेमी म्हणून अपेक्षित असलेल्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील 1600 चौरस फूट जागेसाठी एकत्रित लढा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी कोण पुढाकार घेते आणि त्याचे श्रेय लाटते हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाने देवू केलेली जागा शिवस्मारकासाठी अयोग्य आणि अतिशय तोकडी आहे. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकांची भव्य प्रतिमा आणि त्याला शोभेल असे स्मारक उभारण्यासाठी येवले चहासमोरील किमान दीड हजार चौरस फूट जागा मिळणं अपेक्षित आहे. काहीजणांकडून या भागात पुरेशी जागा नसल्याचे चित्र उभे केले जात असले तरीही याच जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसह डॉ.आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम व शिवजयंतीचा उत्सवही दिमाखदार पद्धतीने साजरा झाला आहे याकडेही पहावं लागेल. एकंदरीतच बहुप्रतिक्षीत शिवस्मारकासाठी बसस्थानकावरील जागा मंजुर झाली असली तरीही शिवप्रेमींना ती पटणारी नसल्याने संगमनेरच्या शिवस्मारकाचा विषय यापुढेही तेवतच राहणार आहे हे मात्र निश्चित.