‘अखेर’ डॉ.योगेश निघुते याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अटकेचा मार्ग झाला मोकळा; कोणत्याही क्षणी पोलिसांकडून अटकेची शक्यता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बहुचर्चित डॉक्टर पूनम निघुते आत्महत्या प्रकरणात अखेर डॉ.योगेश निघुते याला न्यायालयाकडून प्राप्त झालेले अटकेपासूनचे तात्पुरते संरक्षण संपुष्टात आले आहे. या प्रकरणात आपल्याला गजाआड व्हावे लागणार याची पूर्वकल्पना असल्याने डॉक्टर निघुतेने अटकपूर्व जामिनासाठी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र घाटी रुग्णालयाकडून उत्तरीय तपासणीचा सविस्तर अहवाल अप्राप्त असल्याने तो प्राप्त होईपर्यंत म्हणजेच 18 सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने त्याला अटकेपासून संरक्षण दिले होते. गेल्या शनिवारी त्याची मुदत संपल्यावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. यावर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज तो जाहीर करताना न्यायालयाने डॉक्टर योगेश निघुतेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पोलिसांना आता त्याला अटक करावी लागणार आहे.

गेल्या महिन्यात 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संगमनेरातील सर्वपरिचित बालरोग तज्ज्ञ डॉक्टर योगेश निघुते याची पत्नी डॉक्टर पूनम यांनी आपल्या राहत्या घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना समोर आल्यानंतर संगमनेर शहरासह जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडून उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. जालना येथील माहेर असलेल्या डॉक्टर पूनम यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ संगमनेरात धाव घेऊन आपल्या मुलीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला व डॉक्टर निघुते हा संगमनेरचा मूळ रहिवासी असल्याने त्याच्या दबावाचा शवविच्छेदन अहवालावर प्रभाव पडण्याची भीती व्यक्त केली होती. त्यांच्या मागणीनुसार संगमनेर पोलिसांनी मयत डॉक्टर पूनम यांची उत्तरीय तपासणी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानंतर डॉक्टर पूनम यांच्यावर जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी 31 ऑगस्ट रोजी त्यांचे बंधू शरद कोलते यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल करुन डॉक्टर योगेश निघुते याच्याकडून आपल्या बहिणीचा पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीत डॉक्टर योगेश हा सतत आपल्या पत्नीवर संशय घेत असल्याचाही उल्लेख करुन काही दाखलेही देण्यात आले तसेच, त्यांच्या वडिलांकडून वेळोवेळी पाठविण्यात आलेल्या पैशांचे विवरणही देण्यात आले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेपासून बचाव करण्यासाठी डॉ.योगेश याने विधीज्ञ अतुल आंधळे यांच्या मार्फत अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर 9 सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर युक्तिवाद झाला. या याप्रकरणी सुनावणी सुरु होतात सरकारी पक्षाचे वकील बी.जी.कोल्हे यांनी आरोपीला 18 सप्टेंबर पर्यंत अटक करणार नसल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे फिर्यादी पक्षाने सरकारी वकिलांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त करीत आक्षेप अर्ज दाखल केला होता. मात्र सरकारी वकिलांची नेमणूक हा न्यायालयाचा कक्षेबाहेरील विषय असल्याने न्यायालयाने त्यांना योग्य ठिकाणी तक्रार दाखल करण्याची समज देत दाखल झालेला अर्ज निकाली काढला. तसेच, या प्रकरणातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी घाटी रुग्णालयाकडून अद्यापही शवविच्छेदन अहवाल अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे सांगत तोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर निर्णय देताना डॉक्टर योगेश निघुते याला 18 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. गेल्या शनिवारी त्याची मुदत संपली त्याच दिवशी दोन्ही बाजूने न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी सरकारी पक्ष व त्यांना साहाय्य करणाऱ्या उच्च न्यायालयातील विधिज्ञ आनंद बायस व संगमनेर येथील वकील राजू बबनराव खरे यांनी मयत डॉक्टर पूनम व योगेश निघुते यांच्यातील संभाषणाच्या ऑडियो क्लिप्ससह प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी दोघात झालेल्या वादाचे सीसीटीव्ही फुटेजही न्यायालयात सादर केल्याने फिर्यादी पक्षाची बाजू भक्कम झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सोमवारी (ता.20) यावर निर्णय देण्याचे जाहीर केले.

त्यानुसार संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.वाय.भोसले यांनी आज दुपारी निकाल जाहीर केला असून डॉक्टर योगेश निघुते याला अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात दाखल असलेल्या हुंडाबळीचे कलम 498 (अ) व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम 306 नुसार आरोपीची पोलीस चौकशी होण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले. त्यामुळे 18 तारखेपर्यंत डॉक्टर योगेश याला देण्यात आलेले अटकेपासूनचे संरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे गजाच्या दिशेने जाणारा त्याचा मार्गही आता प्रशस्त झाला असून पोलिसांकडून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी अद्यापही डॉक्टर योगेश निघुते याच्यासमोर उच्च व सर्वोच्च न्यायालय अशा दोन पायऱ्या शिल्लक आहेत. मात्र फिर्यादी पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर सादर केलेले ठोस पुरावे पाहता त्याला अटकेपासून संरक्षण मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

वास्तविक सदरची घटना घडून वीस दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. फिर्यादी पक्षाने शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मयत डॉक्टर पूनम यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर मारहाणीच्या खुणा असल्याचे सांगण्यात आले आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात विच्छेदन झाल्यानंतर डॉक्टर पूनम यांचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे समोर आले असले तरीही फिर्यादीत दाखल असलेल्या मारहाणीच्या खुणांबाबत सविस्तर अहवालाची प्रतीक्षा असल्याने आणि तो अजूनही प्राप्त नसल्याने तो मिळेपर्यंत डॉक्टर योगेश याला पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता कमी होती. मात्र अटकेच्या भीतीने गुन्हा दाखल होताच त्याने न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाकडून त्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल प्राप्त नसला तरीही फिर्यादी पक्षाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने त्याला अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्याने डॉक्टर योगेश निघुते याला कोणत्याही क्षणी गजांच्या आड जावे लागणार आहे.

