विखेंच्या भरवशावर ‘महायुती’चे पदाधिकारी बेभान! ‘रसद’ मिळवण्यातच धन्यता; ‘मेरा बुथ – सबसे मजबुत’चा फज्जा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसर्‍या टर्मसाठी चारशे पारची हवा भरुन दिल्लीतून उधळलेला भाजपचा ‘वारु’ महाराष्ट्रात मात्र थंडावला. त्यामुळे सलग दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून देणार्‍या महाराष्ट्रात महायुतीची अक्षरशः दाणादाण उडाली. प्रत्येक निवडणुकीत सर्वोत्तम वाटणारी भाजपची निवडणूक यंत्रणाही यावेळी कुचकामी ठरल्याने आगामी कालावधीत त्याची मीमांसा क्रमप्राप्त ठरत असतानाच हक्काचा मतदार संघ असूनही शिर्डीत झालेला पराभवही चर्चेत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखा मातब्बर नेता हाताशी असूनही जिल्ह्यातील महायुतीचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा असून ‘काही’ निष्क्रिय पदाधिकार्‍यांनी केवळ विखेंच्या रसदीसाठीच शक्ती घालवल्याने संगमनेरात ‘मेरा बुथ, सबसे मजबुत’ आणि ‘पन्ना प्रमुख’ या सारख्या संकल्पनांचा फज्जा उडाल्याचेही दिसून आले.


18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर होवून आता आठवडा उलटला आहे. या निवडणुकीत चारशे पारचा नारा देणार्‍या भाजपला मित्र पक्षांना सोबत घेवून तिनशेचा आकडाही ओलांडता आला नाही. गेल्या पंचवार्षिकमध्ये जिल्ह्यातील दोन्ही जागांसह राज्यातून तब्बल 41 जागा पटकावणार्‍या महायुतीला यावेळी अवघ्या 17 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 23 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांना पहिल्यांदाच मित्रपक्षांच्या टेकूवर आधारीत असलेले सरकार स्थापन करावे लागले. गेल्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीचा परिणाम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात असताना त्याची जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामाही देवू केला, मात्र केंद्रीय नेतृत्त्वाने अद्याप पिछेहाट झालेल्या राज्यांची मीमांसा सुरु केली नसल्याने तुर्त फडणवीसांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.


भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्त्वाने राज्यातील पराभवाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली असताना शिर्डीच्या इतिहासातील सलग तिनही निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे मताधिक्क्य मिळवून देणार्‍या संगमनेर तालुक्यातील मतदारांच्या बदललेल्या कलाची मीमांसाही क्रमप्राप्त ठरणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या संगमनेर शहर व तालुका कार्यकारणीने कोणतेही काम केले नसल्याची जोरदार टीका सध्या सुरु असून केवळ पदांना चिकटून बसलेले स्थानिक पदाधिकारी या कालावधीत आपल्या खासगी उद्योगांमध्येच व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या बाबतीतही असेच चित्र असून सध्या संगमनेर तालुकाप्रमुख वगळता या पक्षाचेही तालुक्यात बारा वाजल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुतीच्या वरीष्ठांनी शिर्डीतील पराभवाची मीमांसा करुन महायुती उमेदवाराची पिछेहाट होण्यास कारणीभूत ठरलेल्या स्थानिक पदाधिकार्‍यांना घरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे.


संगमनेर तालुका गेल्या तीन पंचवार्षिकपासून महायुतीच्या पाठीशी होता, मात्र या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष केवळ कागदावरच राहिल्याने शहरातील नगण्य आघाडी वगळता यावेळी तालुक्याने ‘इंडिया’ आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना 30 हजार 573 मतांची घसघशीत आघाडी दिली आहे. यावेळी तालुक्याने महायुतीच्या विरोधात केलेले मतदान मागील तिनही निवडणुकांपेक्षा खूप अधिक आहे. खरेतर शिस्तप्रिय पक्ष अशी भाजपची ओळख सांगितली जाते. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाकडून केले जाणारे नियोजनही अगदी जमीनस्तरावरील असते. बुथ प्रमुखांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संबंध प्रस्थापित करण्यासह पन्ना लिडर (पान प्रमुख) या संकल्पनेनुसार एका कार्यकर्त्याकडे प्रत्येकी 30 मतदारांची जबाबदारी दिली जाते.


केंद्र आणि राज्याच्या नेतृत्त्वाने सोपवलेल्या नियोजनानुसार कामकाज होतंय की नाही याची वेळोवेळी पडताळणी करण्याची जबाबदारीही जिल्ह्यापासून तालुकास्तरापर्यंत केली जाते. यावेळी मात्र अशी कोणतीही व्यवस्था कार्यान्वीत असल्याचे दिसून आले नाही. वास्तविक शिर्डीची जागा शिवसेनेच्या वाट्याला असताना भाजपसह शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या खांद्यावरही मोठी जबाबदारी होती. मात्र प्रत्यक्षात तालुकाप्रमुख वगळता अस्तित्त्वच नसलेल्या या पक्षाची संपूर्ण मदार भाजपवरच अवलंबून होती. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी या गोष्टी हेरुन काम करण्याची गरज असताना त्यांनी केवळ लोणीच्या वार्‍या करुन रसद मिळवण्यात आणि ती फस्त करण्यातच धन्यता मानली.

त्यामुळे आधीच ‘गायब’ खासदार अशी ओळख असलेल्या सदाशिव लोखंडे यांच्या तिसर्‍या टर्ममध्ये कार्यकर्तेही ‘गायब’ झाल्याने त्यांचा पराभव जवळजवळ तेव्हाच निश्‍चित झाला होता. मात्र गेल्या दोनवेळ प्रमाणे यावेळीही आपण मोदी लाटेवर स्वार होवून संसद गाठू अशी त्यांना आशा होती. शिर्डीच्या आणि खास करुन संगमनेर-अकोल्याच्या मतदारांनी मात्र ती सपशेल फोल ठरवली. यावेळी संगमनेर तालुक्यातील 2 लाख 79 हजार 791 मतदारांमधील 1 लाख 84 हजार 31 मतदारांनी (64.77 टक्के) आपला हक्क बजावला होता. त्यातील 97 हजार 561 मतदारांनी (53 टक्के) आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना, 66 हजार 988 मतदारांनी (36.40 टक्के) महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांना, तर 10 हजार 923 मतदारांनी (6 टक्के) वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांना मतदान केले.


संगमनेर तालुक्यातील एकूण 278 मतदान केंद्रांमधील तब्बल 202 मतदान केंद्रांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारला भरभरुन मतदान केले. तर, सुकेवाडीतील चार आणि तळेगांव, घुलेवाडी व कासारा दुमाला येथील प्रत्येकी तीन मतदान केंद्रांसह मालदाड, मिरपूर, वडगावपान, ढोलेवाडी, गुंजाळवाडी (रहाणे आखाडा) या पाच गावांमधील प्रत्येकी दोन तर, रायते, संगमनेर खुर्द, खांडगाव, पेमगिरी, हिवरगाव पावसा, मालुंजे, खांबे, चिंचोली गुरव, निमोण, कर्‍हे, नान्नज, तिगांव, कौठे कमळेश्‍वर, कासारे, माळेगाव हवेली, निळवंडे व समनापूर या गावांमधील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांना आघाडी मिळाली. शहरातील एकूण 48 मतदान केंद्रांमधील सर्वाधीक 31 मतदान केंद्रात महायुतीच्या उमेदवाराला 13 हजार 467 मतदान झाले, तर आघाडीच्या वाकचौरेंना अवघी 6 हजार 871 मते मिळाली.


तर शहरातील मुस्लिम बहुल भागातील एकूण 17 मतदार केंद्रांमध्ये महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांना केवळ 2 हजार 370 मते तर, आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना तब्बल 10 हजार 189 मतांचे भरघोस दान मिळाले. शहरातील एकूण 48 मतदान केंद्र मिळून लोखंडे यांना 15 हजार 837 तर भाऊसाहेब वाकचौरे यांना 17 हजार 60 मते मिळाल्याने शहरातूनही आघाडीला किरकोळ 2 हजार 223 मतांची आघाडी मिळाली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे व आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रभागातूनही लोखंडे यांना 381 मतांची आघाडी मिळाली. या मतदान केंद्रात लोखंडे यांना 1 हजार 372 तर वाकचौरे यांना 991 मते मिळाली.


शहरातील पानसरे मळा, ज्ञानमाता विद्यालय, सेंट मेरी हायस्कूल, अँग्लो उर्द्ू शाळा, डी.एड्.कॉलेज, अंजुमन हायस्कूल अशा 12 मतदान केंद्रातून वाकचौरे यांच्या पारड्यात 7 हजार 773 तर लोखंडे यांच्या पारड्यात अवघी 1 हजार 167 मतं पडली. नायकवाडपूरा परिसरातील डि.एड्.कॉलेजमधील एकमेव मतदान केंद्रात लोखंडे यांना सर्वात कमी म्हणजे अवघी 7 तर वाकचौरे यांना 641 मतं मिळाली, तर लोखंडे यांना मालपाणी विद्यालयातील 147 क्रमांकाच्या मतदान केंद्रात सर्वाधीक 701 तर वाकचौरे यांना अवघी 220 मतं मिळाली. यासोबतच पेटीट विद्यालय (बी.एड्.कॉलेज), आंबरे पाटील विद्यालय, सह्याद्री विद्यालय, मेहेर विद्यालय, सराफ विद्यालय, आदर्श शाळा, पेटीट विद्यालय, कल्पना चावला शाळा (चव्हाणपूरा) व फुले विद्यालयानेही लोखंडेच्या पारड्यात अधिक मतदान केले.


एकंदरीत आकडेवारीवरुन गेल्या तीन पंचवार्षिक प्रमाणे यंदा संगमनेर शहरासह तालुक्याने महायुतीला मतदान केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामागे महायुतीच्या बहुतेक पदाधिकार्‍यांनी काहीच काम केले नसल्याचे बोलले जात आहे. संगमनेरात भाजप कार्यकर्त्यांची संख्या खूप कमी असून जितके कार्यकर्ते त्यांच्या निम्मे गट अशी येथील भाजपची दयनीय अवस्था आहे. मोदी लाटेचा प्रभाव गृहीत धरुन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह खूद्द महायुतीच्या उमेदवारानेही मतदारांच्या भेटीगाठी घेण्याकडे, त्यांना पक्षाची व सरकारची धोरणं, निर्णय पटवून देण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निवडून आल्यानंतर गायब होणारा खासदार अशी प्रतिमा रुजलेल्या सदाशिव लोखंडे यांच्याबद्दलची लोकांमधील नाराजी उफाळून आली आणि त्यातूनच गेल्या तीन पंचवार्षिकपासून महायुतीच्या ताब्यात असलेला शिर्डी लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीच्या दावणीला बांधला गेला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकमेव सभेशिवाय संगमनेरकडे महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे निवडणुकीदरम्यान दिसून आले. मंत्री दादा भुसे यांची धावती भेट वगळता महायुतीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून केवळ ‘रसद’ प्राप्त करुन घेण्यातच धन्यता मानली आणि उमेदवाराला मोदी लाटेच्या भरवशावर सोडून दिल्याने गेल्या तिनही निवडणुकांमध्ये भरीव मताधिक्क्य देणार्‍या संगमनेर तालुक्यातून महायुतीच्या उमेदवाराची मोठी पिछेहाट झाल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, मात्र कोणतेही काम न करणार्‍या संगमनेरच्या पदाधिकार्‍यांनी शिर्डीच्या पराभवाकडे दुर्लक्ष करुन रविवारी शपथ सोहळ्याचे औचित्य साधून मनसोक्त नृत्य केल्याचे विरोधाभासी चित्रही बघायला मिळाले.


जिल्ह्याचे पालमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अहमदनगर दक्षिणसह शिर्डी लोकसभेची जबाबदारी देण्यात आली होती. दक्षिणेतून त्यांचे सुपूत्र डॉ.सुजय निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या दरम्यान मंत्री विखे अहमदनगरमध्येच अडकून पडले होते. मात्र त्यांनी शिर्डीच्या उमेदवारासाठी आपल्या कुशल यंत्रणेसह आर्थिक रसद कमी पडू दिली नाही. प्रत्यक्षात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामच केले नसल्याने शिर्डी लोकसभा मतदार संघातील संगमनेर व अकोले या दोन मोठ्या विधानसभा मतदार संघांमधील मतदारांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसला आणि तब्बल दोन दशकांनंतर हा मतदार संघ इंडिया आघाडीने खेचून घेतला. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संगमनेरातील गटबाजी थोपवण्यासह निष्क्रिय पदाधिकार्‍यांची हकालपट्टी न झाल्यास महायुतीच्या वाट्याला आलेली अपयशाची श्रृंखला कायम राहण्याचीच अधिक शक्यता आहे.

Visits: 13 Today: 2 Total: 27365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *