संगमनेर तालुक्यातील निमोणमध्ये भीषण अपघातात दोघे ठार! मयत दोघेही नाशिक जिल्ह्यातील; गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्यावर उपचार सुरु..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील निमोण शिवारात भीषण अपघात घडल्याचे वृत्त समोर आले असून बालाजी नमकीन कंपनीच्या कंटेनरने दुचाकीला चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सिन्नर तालुक्यातील दोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संगमनेर तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेण्यात आला आहे. या घटनेत नाशिक जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर जखमी झालेल्या तिसऱ्याची परिस्थिती अतिशय नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना काही वेळापूर्वी तालुक्यामधील निमोण गावातून जाणाऱ्या नांदूर शिंगोटे-लोणी रस्त्यावर घडली. या घटनेत पल्सर दुचाकी वरुन जाणाऱ्या तिघांची बालाजी कंपनीच्या नमकीनची वाहतूक करणाऱ्या कंटेनर (क्र.जी.जे.15/ए.व्ही.6656) सोबत समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की धडक झाल्यानंतर काही अंतरापर्यंत दुचाकीला घेवून कंटेनर फरफटत पुढे गेला. या भयानक घटनेत दुचाकी वरील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय 30) व युवराज धोंडीबा मेंगाळ (वय 29, दोघेही रा.नांदूर शिंगोटे) हे दोघेही जागीच ठार झाले, तर अकोले तालुक्यातील गर्दणी येथील रहिवासी संदीप संतोष आगिवले हा गंभीर जखमी झाला असून असून त्याच्यावर सिन्नर तालुक्यातील दोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मयतांचे शव विच्छेदनासाठी संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात तर जखमीला नजीकच्या दोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेतला आहे. या घटनेनंतर काही काळ नांदूर शिंगोटे ते लोणी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी ती सुरळीत केली आहे. या घटनेने सिन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Visits: 112 Today: 2 Total: 439726