‘एलसीबी’कडून संगमनेर पोलिसांची पोलखोल जमजम कॉलनीत मोठा छापा; तिघा कसायांना अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील जमजम कॉलनी परिसरात घातलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस आणि त्याची वाहतूक करणारी दोन वाहने असा सुमारे 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत तिघा कसायांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षात संगमनेरातील गोवंश कत्तलखाने सतत चर्चेत येत असून शहर पोलिसांनी वेळोवेळी ते कडोकोट बंद असल्याचे आभाशी चित्र उभे केले होते, मात्र एलसीबीच्या या कारवाईने त्याची पोलखोल झाली असून शहर पोलिसांचा खोटारडेपणाही उघड झाला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (ता.19) पहाटे सव्वादोन वाजता जुन्या जोर्वे रस्त्यावरील जमजम कॉलनीत सदरची कारवाई केली. या भागात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल सुरु असल्याची माहिती अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. त्यानुसार पथकाने संगमनेरात येवून मिळालेल्या माहितीच्या आधारे जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक सहामध्ये असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा घातला. यावेळी तेथे उभ्या असलेल्या दोन पिकअप वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस भरुन सदरची वाहने रवाना करण्यासाठी सज्ज होत असल्याचे पोलीस पथकाला आढळले.


या कारवाईत पत्र्याच्या शेडजवळच असलेल्या तिघां कसायांच्या जागेवरच मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आले आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरुन एम.एच.17/बी.डी.4182 या पिकअपमध्ये 1 हजार 500 किलो तर एम.एच.11/ए.जी.3246 या दुसर्‍या पिकअपमध्ये 1 हजार 400 किलो कापलेल्या गोवंशाचे मांस आढळून आले. या छाप्यात पोलिसांनी 12 लाख रुपये मूल्य असलेल्या दोन पिकअप वाहनांसह 8 लाख 70 हजार रुपयांचे गोवंशाचे 2 हजार 900 किलो मांस व दोन हजार रुपये किंमतीची जनावरे कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे असा एकूण 20 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे हेड काँन्स्टेबल सचिन आडबल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी रैय्यान शेरखान पठाण (वय 21, रा.रहेमत नगर), सलमान हरुन मनियार (वय 34, रा.मोमीनपूरा) व राझिक अब्दुल रज्जाक शेख (वय 38, रा.अलकानगर) या तिघांवर भारतीय दंडसंहितेसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील विविध तरतुदींप्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून तिघाही कसायांना अटकही झाली आहे. या कारवाईने शहरातील बेकायदा कत्तलखाना चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


खरेतर राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून आजवर येथील बेकायदा साखळी कत्तलखान्यांवर एकामागून एक शेकडों वेळा कारवाया करण्यात आल्या आहेत. शेकडों कसायांवर गुन्हे दाखल होवून हजारो गोवंश जनावरांच्या मानेवर सुरा चालवून कापलेले लाखों रुपयांचे गोवंशाचे मांस, हजारों जिवंत जनावरे, वाहने आणि मुद्देमालही जप्त झाला आहे. मात्र इतकं सगळं होवूनही येथील कत्तलखाने कधीही बंद होवू शकले नसल्याचे वेळोवेळी समोरही आले आहे. 2 ऑक्टोबर 2021 रोजी नगर पोलिसांनी केलेली कारवाई आजवरची सर्वात मोठी मानली जाते. या कारवाईनंतर शहरातील जातीय तणावही वाढला होता. मात्र आता तो इतिहास झाला असून स्थानिक पोलिसांसाठी ‘एटीएम’ ठरलेल्या या संपूर्ण भागातील कसाई पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून ठळकपणे समोर आले आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हेड काँन्स्टेबल सचिन आडबल, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदिवे, संतोष लोंढे, अतुल लोटके, संतोष खैरे, रणजीत जाधव, रवी घुंगासे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, विशाल तनपुरे व उमाकांत गावडे यांचा समावेश होता. 

राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमबजावणी सुरु होवून 10 वर्षांचा काळ लोटला आहे. या कालावधीत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जवळपास आठ पोलीस निरीक्षक आले आणि गेले, मात्र या प्रत्येकाचे संबंध येथील कत्तलखान्यांशी जोडले गेले हे विशेष. दोन वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या आणि सध्या संगमनेरातच वास्तव्य करुन निवृत्तीचा ‘उपभोग’ घेत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने तर या उद्योगातून इतकी माया गोळा केली की आजही कत्तलखान्यांचा विषय निघाल्यावर ‘त्या’ अधिकार्‍याचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले जाते. यावरुन संगमनेरचे कत्तलखाने पोलिसांसाठी ‘एटीएम’ बनल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे.

Visits: 140 Today: 1 Total: 434821

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *