अजित पवार गणेश साखर कारखाना निवडणुकीत लक्ष घालणार विखेंकडून सत्ता काढून घेण्यासाठी स्थानिक शिलेदारांना देणार ताकद


नायक वृत्तसेवा, राहाता
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अकोले तालुक्यातील अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालून ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची 28 वर्षांची सत्ता उलथवून लावली. पिचड यांनी पवार कुटुंबियांना धोका देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने पवार यांनी ही खेळी खेळल्याचे मानले जाते. आता अजित पवार आणखी एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार आहे. राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. तेथे भाजपचे नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता आहे. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात त्यांचे पारंपरिक राजकीय स्पर्धक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उतरणार आहेतच, शिवाय स्वत: अजित पवारही आपल्या स्थानिक शिलेदारांमार्फत या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे सांगण्यात येते.

राहाता तालुक्यातील या महत्वाच्या साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री शंकर कोल्हे आणि शिवाजी कोते यांचे अनेक वर्षे वर्चस्व होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथील सत्ता विखे पाटील यांच्या समर्थकांकडे आहे. आता त्यांच्याविरोधात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसनेही मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व अजित पवार यांचे खंदे समर्थक संग्राम कोते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना पवार यांच्याकडून साथ आणि रसद मिळणार असल्याचे सांगण्यात येते. कोते म्हणाले, कारखान्याचा तोटा वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत 25 कोटींवरून तोटा 110 कोटींवर गेला आहे. सभासदांच्या हितासाठी आणि कारखाना सुरळीत चालावा यासाठी आम्ही यात लक्ष घातले आहे. वडील अ‍ॅड. शिवाजी कोते 25 वर्षे या कारखान्याचे संचालक होते.

पिचड यांच्याप्रमाणेच विखे यांच्याविरोधात अजित पवार गणेश कारखान्यात कोते यांना साथ देण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2022 मध्ये अकोले तालुक्यातील अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. त्यावेळी स्वत: अजित पवार यांनी येथे येऊन प्रचारसभा घेतल्या होत्या. एकदा निवडणूक पुढे ढकलली जाऊनही शेवटी पिचड पिता-पुत्राकडून सत्ता काबीज करण्यास पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅननला यश आले. त्याप्रमाणे आता पवार विखे यांच्याकडून गणेश कारखान्याची सत्ता काढून घेण्यासाठी स्थानिक शिलेदारांना ताकद देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक यावेळी गाजण्याची शक्यता आहे.

Visits: 129 Today: 1 Total: 1110748

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *